
>> मनमोहन रो. रोगे
‘हिंदी–चिनी भाई-भाई’ असे म्हणत केसाने गळा कापणाऱया चीनने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यापासूनच हिंदुस्थानचे अहित पाहिलेले आहे. ज्या ज्या मार्गे शक्य असेल त्या त्या मार्गे हिंदुस्थानचे नुकसान केले आहे. हिंदुस्थानच्या अंतर्गत घटनांमध्ये हस्तक्षेप करणे, आक्षेप घेण्याचा प्रयत्न चीनने नेहमीच केला. शेजारी राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानविरोधी विष पेरले. हिंदुस्थानात अतिरेकी कारवाई करणाऱया पाकिस्तानला उघड पाठिंबा देऊन नेहमीच सहाय्य केले. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नाला विरोध केला. जागतिक परिषदांमध्ये नेहमीच हिंदुस्थानविरोधी भूमिका घेतली. अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा हक्क सांगणे, हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून हिंदुस्थानी चौक्या उद्ध्वस्त करून आपल्या चौक्या बसवणे हे चीनचे नित्याचेच काम. दुर्दैवाने चीनचा प्रतिकार विचारपूर्वक, नियोजन करून केला गेला नाही. त्यापेक्षा हिंदुस्थानीयांना चीनच्या सामर्थ्याची भीती दाखवून आपल्या दुबळेपणावर, अपरिपक्वतेवर आणि नसलेल्या मुत्सद्देगिरीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला. मागील पाच वर्षांत चीनने कुठे घुसखोरी करून कोणत्या राज्यावर हक्क सांगितल्याचे वाचले नाही म्हणून चीनवर विश्वास ठेवणे ही चूकच होईल. अशा घातक, चीनची मासेमारी करणारी 10 जहाजे बेकायदेशीरपणे रत्नागिरी समुद्रात आढळल्याचे वाचले. मासेमारी करणाऱया जहाजावर सॅटेलाईट फोनची गरज नसताना वरीलपैकी काही जहाजांतून सॅटेलाईट फोनचा वापर करून संदेशवहन केले जात असल्याचे हिंदुस्थानी तटरक्षक दलाला त्यांच्या तळावर आढळल्याने चिनी जहाजांची घुसखोरी उघड झाली. चीनसारख्या धूर्त, कावेबाज आणि घातक शत्रुराष्ट्राची एक-दोन नव्हे, दहा जहाजे घुसखोरी करून रत्नागिरीपर्यंत पोहोचतात व त्यांनी सॅटेलाईट फोन वापरल्यामुळे लक्षात येते. म्हणजेच तटरक्षक दलाला ती जहाजे रत्नागिरीस पोहोचेपर्यंत कळले नाही हे किती मोठे अपयश, नाचक्की आहे? बरे, जहाजे पकडून 8 दिवस झाले तरी त्या जहाजांवर काहीही कारवाई झालेली नाही ही चीड आणणारी गोष्ट आहेच, पण देशाच्या सुरक्षिततेला चूड लावणारीदेखील आहे. चीन, पाकची ही चाचपणी तर नसेल? इतका बेफिकीरपणा, उदासीनता हे दुसऱया 26/11 चे निमंत्रण न ठरो.































































