लेख – …तर लोकांना ‘स्वच्छ भारत’ पाहण्यास मिळेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेश राणे,  [email protected]

भ्रष्टाचाराचे नक्की काय होणार? हा प्रश्न आपल्या देशात अनुत्तरित आहे. भ्रष्टाचार नामक कचरा लोकांना कायम त्रस्त करत असतो. त्याची स्वच्छता करण्यासाठी राजकीय दबाव नसलेला खराटा वापरणे गरजेचे आहे. कारण भ्रष्टाचार करणारे सर्वत्र असल्याने त्याबाबत अनेकदा अळीमिळी गुपचिळी बाळगण्यात येते. एकीकडे प्रत्यक्ष कचरा, दुसरीकडे राजकीय दलदल आणि तिसरीकडे भ्रष्टाचार अशी आपल्या देशाची सध्या अवस्था आहे. तेव्हा कचरा, राजकीय आणि भ्रष्टाचाराची दलदल साफ झाल्यावरच लोकांना खऱ्या अर्थी ‘स्वच्छ भारत’ पाहण्यास मिळेल. 

महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कडक इस्त्रीच्या कपडय़ांत स्वच्छता अभियान कसे जोरात चालू असते. स्वच्छता कचऱ्याची जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती अयोग्य व चुकीच्या विचारांचीही अत्यावश्यक आहे.

राहत्या घराचा केर काढण्यासाठी केरसुणी हातात न घेणारे छायाचित्रात मात्र केर काढताना अग्रस्थानी दिसतात. कारण घरी केर काढण्यासाठी नोकर असतात. त्यामुळे रोजची स्वच्छता करण्याचे काम त्यांच्याकडे असते. छायाचित्रासाठी हातात मोठा खराटा घेण्याची नौटंकी लोकांच्या पचनी न पडणारी आहे. आधी घर स्वच्छ करण्याचे पाहिले जावे. मग रस्त्यावर उतरून खुशाल केर काढावा. दैनंदिन कामकाजाची कितीही व्यस्तता असली तरी किमान केवळ पाच मिनिटे स्वच्छतेसाठी सहज देता येतील, पण त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. मग तसे नियोजन करून ठरवता येईल की, पाच मिनिटे कार्यालयातील स्वतःची केबिन स्वच्छ करण्यासाठी देणार की राहती खोली स्वच्छ करून अस्वच्छता दूर करणार?

रोज सकाळी केर न काढता आहे त्याच कचऱ्यात वावरण्याला ‘परवशा’ केरात वावरणे म्हणतात. नवीन  दिवसाचा आरंभ आदल्या दिवशीच्या केरात वावरून करण्यासारखा गलिच्छपणा नाही. श्रीमंत ते उच्च मध्यमवर्गीयांकडे घरकामात सहाय्य करण्यासाठी मदतनीस असतात. ते जर एक दिवस आले नाहीत तर घरातील कचराही न काढणारे बहुसंख्येने आहेत. भांडी घासावी लागतील म्हणून उपाहारगृहातून पार्सल मागवून न्याहारी, भोजन केले जाते. स्वतः खाल्लेल्या ताटाची स्वच्छता ज्यांना करावीशी वाटत नाही, त्यांच्याविषयी अधिक काय बोलणार? यावरूनच समजते की, व्यक्तीतील अहंकार, पोकळ प्रतिष्ठा, आळस त्याला स्वच्छतेपासून दूर ठेवतो. मी जर घरी काम केले तर लोक काय म्हणतील? असा विचार करणारेही आहेत. काम काय केवळ घरकाम करणाऱ्या लोकांनीच करायचे का? स्वच्छतेचे खरे मानकरी तर स्वच्छता कर्मचारी, घरकाम करणारे आहेत. बाकी तर केवळ एकदिवसीय (क्षणिक) उत्साही आहेत.

शासकीय कार्यालये अस्वच्छतेची केंद्रेच म्हणावी लागतील. शासनाने डिजिटल कारभाराची हाक दिली असली तरी त्याचा वेग कासवाप्रमाणे आहे. त्यामुळे आजही फाईल्सचा ढिगारा, त्यावरील धूळ आणि त्याच टेबलाबर काम करणारा कर्मचारी असे चित्र पहायला मिळते. धुळीमुळे संसर्ग होऊन श्वसनमार्गाचे विकार बळावण्यास वाव मिळतो. त्यामुळे उपचारांसाठी होणारा खर्च आणि शरीराची होणारी ओढाताण याकडे तर लक्षच नसते. इतके शरीराला हलक्यात घेतले जाते आणि आवडीने औषधे खाण्यास, अंथरुणावर पडून राहण्यास प्राधान्य दिले जाते, असे बोलण्यास वाव आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी कचरापेटय़ा असतात. तिथे कचरा टाकताना अशा पद्धतीने टाकला जातो की, तो रस्त्यापर्यंत येतो. हे चित्र ठिकठिकाणी हमखास पाहायला मिळेल. थोडे पुढे जाऊन कचरापेटीत कचरा टाकायला अथवा ती भरल्याने त्यातील कचरा बाहेर पडत असेल तर किमान त्या कचरापेटीच्या जवळ तरी कचरा ठेवता येतो, पण तेवढेही सौजन्य नागरिकांत नाही. अशा ठिकाणाहून जाताना कचऱ्यातून वाट काढत त्यावरून उडय़ा मारत जातील, पण कचरा लांबूनच टाकण्याची अंगवळणी पडलेली सवय सोडणार नाहीत. तशी शपथच घेतलेली दिसते.

घराबाहेरील भागाची स्वच्छता करताना शेजारच्याचा कचरा अथवा पाणी आपल्या भागात आले तर त्यावरून टोकाची भांडणे करणारे शेजारी पाहायला मिळतील. असे वादाचे प्रसंग काही वेळा शाब्दिक बाचाबाचीवरून हाणामारीपर्यंतही पोहोचतात. विषय स्वच्छतेचा, पण ती राहते बाजूला आणि त्यामुळे वादाला तोंड फुटते. सामंजस्य उरलेले नाही. कचऱ्यावरून ‘तू तू मैं मैं’ होते, पण कचऱ्याला वाट करून देत स्वच्छतेचा अंगीकार करण्यासाठी एकत्र येत नाहीत.

रोगराई पसरण्याचे मूळ कारण म्हणजे अस्वच्छता होय. पावसाळ्याच्या दिवसांत तर अस्वच्छता ठळकपणे दिसते. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फैरी झडणे वर्षानुवर्षे चालू आहे, पण होत असलेली स्वच्छता यावर राज्यकर्ते आणि विरोधक यांचे कधीच एकमत होत नाही. कायम याविषयी असमाधान असते, पण सामाजिक जबाबदारी पाहता आणि लोकांचे आरोग्यहित लक्षात घेता या विषयावर सुवर्णमध्य काढण्यात यश प्राप्त करता आलेले नाही.

भारतात कचऱ्याची समस्या मोठी आहे. त्यावर मार्ग काढण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रतिदिन लाखो मेट्रिक टन कचरा गोळा होतो. त्यावर प्रक्रिया करून खत, इंधन म्हणून त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने उपाययोजना पाहिजे. क्षेपणभूमीवर कचरा गोळा करून त्याचे डोंगर तिथे तयार झाले आहेत. देशातील महानगरांत तर ही समस्या जटिल होत चालली आहे. शहरांमध्ये गगनचुंबी इमारती, मॉल्स यांची संख्या वाढत आहे. हाती पैसा खेळता राहत असल्याने वाहने वाढत आहेत, विविध आवडीनिवडी  जपल्या जात आहेत. पण अस्वच्छता, स्वच्छता, कचरा हा विषय कोणाच्या गावीसुद्धा नाही. शहरांत मुसळधार पाऊस पडला की, मग निसर्ग आरसा दाखवतो आणि बाहेर फेकलेला कचरा घरी आणून देतो.

भ्रष्टाचाराचे नक्की काय होणार? हा प्रश्न आपल्या देशात अनुत्तरित आहे. भ्रष्टाचार नामक कचरा लोकांना कायम त्रस्त करत असतो. त्याची स्वच्छता करण्यासाठी राजकीय दबाव नसलेला खराटा वापरणे गरजेचे आहे. कारण भ्रष्टाचार करणारे सर्वत्र असल्याने त्याबाबत अनेकदा अळीमिळी गुपचिळी बाळगण्यात येते. एकीकडे प्रत्यक्ष कचरा, दुसरीकडे राजकीय दलदल आणि तिसरीकडे भ्रष्टाचार अशी आपल्या देशाची सध्या अवस्था आहे. तेव्हा कचरा, राजकीय आणि भ्रष्टाचाराची दलदल साफ झाल्यावरच लोकांना खऱ्या खर्थी ‘स्वच्छ भारत’ पाहण्यास मिळेल.