चांगुलपणाच्या ‘अँटीबॉडीज’ही गरजेच्या!

>> योगेश मिश्र

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्यास या आजारावर विजय मिळविता येतो असे सांगितले जाते. परंतु अँटीबॉडीज केवळ औषधाच्या दुकानात मिळत नाहीत तर अन्यत्रही मिळतात. मोबाईल स्क्रीनवर एखाद्याचे नाव पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा अँटीबॉडीज तयार होतात. संकटकाळी कुणी खांद्यावर हात ठेवला तरी अँटीबॉडीज तयार होतात. आपल्या दोस्तीच्या अँटीबॉडीजमुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे एक नवीन काम आपण केले पाहिजे.

सध्या कोरोनाच्या महामारीची भीती आपल्या सर्वांच्या मनात मूळ धरून बसली आहे. परंतु कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असते ती उमेद. चिमण्या पंखांच्या नव्हे तर उमेदीच्या सहाय्याने उडतात असे म्हटले जाते. म्हणूनच ज्या पक्ष्याची उमेद मोठी त्याची भरारी उंच असते. त्यामुळेच सध्याच्या काळात आपण आपल्याला भीतीकडे नेणाऱया प्रत्येक गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. एक वेळ विषाणूपासून बचाव शक्य आहे; परंतु जी भीती आपल्या मनात खोलवर रुतून बसली आहे, त्यापासून बचाव अशक्य आहे. भीतीपेक्षा धोकादायक विषाणू या जगात कोणताही नाही. प्रत्येक समस्या कमकुवत व्यक्तीसाठी ‘भीती’ आहे तर ज्ञानी माणसासाठी ‘संधी’ आहे. समस्येचे संधीत रूपांतर व्हायचे असेल तर विचार बदलला पाहिजे. विचार बदलण्यासाठी वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे-ऐकणे आणि सोशल मीडियावर महामारीच्या संदर्भातील मजकूर वाचणे बंद केले पाहिजे. असा मजकूर सोशल मीडियावर स्वतःसुद्धा टाकू नये. कोणतीही पोस्ट टाकण्यापूर्वी ती माहिती खरी आहे का, याची खातरजमा केली पाहिजे. गुगलकडे असे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे.

जगण्यासाठी दीर्घायुष्याबरोबरच दुर्दम्य इच्छाशक्तीही हवी. स्टिफन हॉकिंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत. हॉकिंग एकवीस वर्षांचे असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की, एका महाभयानक आजारामुळे आता त्यांच्या आयुष्यातील दोनच वर्षे उरली आहेत. डॉक्टरांची भविष्यवाणी खोटी ठरवणाऱया हॉकिंग यांना पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नार्ड शॉ जेव्हा आजारी पडले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, अंडी आणि मांस खाल्ले नाही, तर ते बचावणार नाहीत. परंतु ते प्राणिप्रेमी होते. डॉक्टरांच्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ही इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी विचार बदलणे गरजेचे आहे.

पुस्तके वाचणे, चित्रपट पाहणे, योगाभ्यास करून एका महिन्यात पंधरा किलो वजन घटविणे आणि चेहऱयावर लहान मुलांसारखी टवटवी आणणे शक्य आहे. आवडत्या व्यक्तीशी प्रदीर्घ गप्पा माराव्यात. आपले छंद जोपासावेत. भय आणि गर्दीची मानसिकता सर्वांच्याच लक्षात येत नाही. भीतीदायक कोणत्याही गोष्टीत रस घेऊ नये. सामान्यतः भीतीच्या भावनेतही लोकांना रस असतोच. भीतीमध्ये आनंद मिळत नसता तर भुताखेतांचे चित्रपट पाहायला लोक का गेले असते? भीती हेसुद्धा एकप्रकारचे आत्मसंमोहन आहे. त्यामुळे शरीरात रासायनिक बदल घडून येऊ लागतात. हा बदल कधी कधी इतका विषारी होतो की त्यामुळे प्राणही जाऊ शकतो. घबराट (पॅनिक) ही हिंदुस्थानींची खूप जुनी सवय आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच आतील लोकांना उतरू न देता लोक स्वतः आधी आत घुसू लागतात. रेल्वे चुकण्याची भीती त्यांना वाटत असते. रस्त्यावरूनसुद्धा लोक जागा मिळेल तिकडे घुसतात. काही सेकंद कोंडी झाली तरी हॉर्न वाजवू लागतात. जणूकाही थोडा उशीर झाला तर बॉम्बस्फोटच होणार आहे! लॉकडाऊन लागणार, अशी बातमी मिळताच बाजारात खरेदीसाठी अशी झुंबड उडते जणू जीव गेला तर परत मिळेल; पण भाजीपाला परत मिळणार नाही. अशा सवयी असतील तर कोरोनाला आपण हरवू शकणार नाही. केवळ दोन टक्के लोकांनाच रुग्णालयात ठेवण्याची आणि ऑक्सिजन देण्याची गरज भासते. केवळ पाच टक्के लोकांनाच रेमडेसिवीर देण्याची गरज असते. आपण आपल्या सवयी बदलल्या तर आपल्याकडे असणारी यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यास पुरेशी ठरू शकते.

इस्रायलने तेथील सामूहिक लसीकरण मोहिमेला यश मिळाल्यानंतर कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणली. मास्कमुक्त जीवनास परवानगी दिली. शिक्षण क्षेत्र पूर्ववत सुरू केले. सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी शाळेत परतले. इस्रायलमधील लसीकरण मोहीम जगात अव्वल ठरली असून कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण लोकसंख्येला या देशाने सज्ज केले.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्यास या आजारावर विजय मिळविता येतो असे सांगितले जाते. परंतु अँटीबॉडीज केवळ औषधाच्या दुकानात मिळत नाहीत तर अन्यत्रही मिळतात. मोबाईल स्क्रीनवर एखाद्याचे नाव पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा अँटीबॉडीज तयार होतात. संकटकाळी कुणी खांद्यावर हात ठेवला तरी अँटीबॉडीज तयार होतात. आपल्या दोस्तीच्या अँटीबॉडीजमुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे एक नवीन काम आपण केले पाहिजे ते म्हणजे स्वतःची आणि इतरांची भीती घालवली पाहिजे. नियम पाळून, एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना आधार दिला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या