लेख – चीन : ‘ठोशास ठोसा’ हेच योग्य धोरण

>> अनिल दत्तात्रेय साखरे

कोरोना नामक विषाणूची निर्मिती करून चीनने सगळ्या जगालाच जायबंदी केले आहे ते बघितल्यानंतर चीन कुठल्या दृष्टीने विचार करतो, योजना करतोय त्याचा अंदाज येतो. पुढील युद्ध हे स्पेसमध्ये म्हणजे एकमेकांचे अवकाशातील उपग्रह नेस्तनाबूत करणे, रासायनिक अस्त्रे वापरणे किंवा जैविक अस्त्रानेच होणार आहे. तेव्हा हिंदुस्थाननेही अशी सगळी सज्जता कुठलाही पाप-पुण्याचा विचार किंवा कुठलेही विधिनिषेध न बाळगता करायला हवी.

एक जुलै 2021 ला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपली शताब्दी पूर्ण करून अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली तिआनानमेन चौक येथे मोठा कार्यक्रम साजरा केला. वर्षभर त्या संबंधातले कार्यक्रम पुढेही साजरे होत राहणार आहेत. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने विसाव्या शतकात मूळ धरले. पहिले महायुद्धाच्या शेवटामध्ये 1917 मध्ये रशियामध्ये लेनिनच्या प्रभावी नेतृत्वाखाली साम्यवादी क्रांती झाली आणि जगातले पहिले शेतकरी आणि कामगारांचे साम्यवादी राष्ट्र अस्तित्वात आले. कार्ल मार्क्सचे स्वप्न साकार होऊन जगाला एक वेगळी विचारसरणी मिळाली. पुढे मग जगभरामध्ये साम्यवादी विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून, रशियाकडून साम्यवादी विचारांनी भारलेल्या विचारवंतांना, तज्ञांना देशोदेशी पाठवण्यात आले. त्यातीलच साम्यवादी विचार रुजलेली एक घट्ट फांदी म्हणजे चीन. त्यावेळी चीनमध्ये च्याग काई शेक यांची सत्ता होती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये चीनची समाजव्यवस्था पूर्णपणे मोडून गेली. समाजातील सर्व स्तरांत बेशिस्त, महागाई, अनैतिकता, अकार्यक्षम प्रशासन व्यवस्था, भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. त्यामुळे सरकार आणि च्याग काई शेक यांच्याविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरून माओच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. चिनी जनतेने शेक यांना पदभ्रष्ट केले आणि लाखोंच्या संख्येने चिनी नागरिकांचे बलिदान देऊन माओने सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून चीनची सत्ता सूत्रे आपल्या हाती घेतली. 1949 पासून चिनी कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय हुकूमशाही राजवट चीनमध्ये सुरू झाली.

चीन हा कृषीप्रधान देश असल्याने मोठय़ा प्रमाणावर शेतकरी वर्ग होता. मोठा जमीनदार वर्ग त्यांची प्रचंड पिळवणूक करत होता. या सर्व शेतकऱयांना माओने संघटित केले आणि त्यांच्या माध्यमातून मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान चीनमध्ये रुजवण्याचा यशस्वी असा प्रयोग केला.

माओनंतर चीनचे युती सरकार

1976 माओच्या निधनानंतर गादीवर आलेल्या डेंग झियाओ पिंग यांच्या कार्यकाळात पुढील शंभर वर्षांमध्ये चीनमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, संरक्षण क्षेत्रामध्ये करावयाच्या कामांचा आणि जागतिक राजकारणामध्ये चीनची भूमिका आणि त्यासंदर्भात आखावयाचे डावपेच यासंदर्भात एक कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यासोबतच साम्यवादी पक्षाचा मोठा विस्तार करण्यात आला आणि करोडो लोकांना पक्ष सदस्य बनवण्यात आले. मग हा पक्ष म्हणजे सत्ता आणि पक्षाचे नेते म्हणजे सत्ताधारी हे समीकरण चीनमध्ये दृढ झाले. पुढे केवळ सरकारी उद्योग-व्यवसायामुळे देशाची आणि समाजाची योग्यप्रकारे प्रगती होत नाही आणि त्यामधून समाजामध्ये देशांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चीनची साम्यवादी चौकट कायम ठेवून खासगी भांडवल आणि बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करण्यात आला. चीनच्या विकासाची नवीन नीती बनवण्यात आली.

चीनमध्ये साम्यवाद आणि भांडवलवाद हे दोन्ही एकत्र नांदू लागले. एकीकडे हे सर्व घडत असताना ज्या देशामध्ये साम्यवादी तत्त्वज्ञान प्रथम रुजले त्या रशियामध्ये मात्र मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा तसेच पारदर्शीपणाचा आग्रह धरला आणि त्यांच्या ग्लासबोस्त आणि पेरिस्राईका यांचे वारे रशियामध्ये एवढय़ा जोमाने वाहिले की त्याने रशियाची शकले करून टाकली. सर्वसाधारणप्रमाणे सध्या चीनचे जगातील धोरण खालील पाच भागांमध्ये विभागता येईल.

1) आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये चीनने मोठे रस्ते, धरणे, वीजनिर्मिती, बंदर विकास, विमानतळ बांधणे अशा पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली या राष्ट्रांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त अशी करोडो रुपयाची कर्जे देऊन, त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था पुढे मोडीत निघतील अशी व्यवस्था केली आहे.

2) जवळपास 19 राष्ट्रांशी चीनची सीमा लागून आहे. एक रशियाचा अपवाद सोडला तरी इतर सर्व राष्ट्रांसोबत चीनचा सीमावाद-तंटा आहे. सीमांवरती नियमित तणाव राहील, युद्धसदृश परिस्थिती निर्माण करून आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये हातपाय पसरणे हे चीनचे जुने धोरण आहे. तिबेटचा घास अशाच रीतीने चीनने घेतला. त्यादृष्टीने आपल्या आर्मीला सामर्थ्यशाली करणे.

3) वेगवेगळे नवीन ऍप्स निर्माण करून त्या ऍप्सच्या माध्यमातून आणि सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून वेगवेगळ्या राष्ट्रांच्या संरक्षण, अर्थ, व्यापार-उदीम खात्यांमध्ये हेरगिरी करणे.

4) आपल्या देशात उत्पादन झालेल्या हलक्या प्रतीच्या स्वस्त मालाचे देशोदेशींच्या बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर ओतून स्थानिक बाजारपेठांना भिकेला लावणे.

5) विसाव्या शतकामध्ये अमेरिकेने सामाजिक राजकीय आर्थिक संरक्षण क्षेत्रामध्ये जी जगाच्या नेतृत्वाची जगाच्या पोलिसाची भूमिका निभावली त्याला समर्थ स्पर्धक बनून अमेरिकेसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणे.

हिंदुस्थानच्या सीमेवर पाकिस्तान आणि चीनसारखे मोठे प्रबळ शत्रू एक आत्मघातकी, दहशतवादी आणि अतिरेकी कारवाया करणारा तर दुसरा सुसंस्कृत जगताचे कुठलेही नीतिनियम न पाळता आपले हातपाय पसरवणारा ड्रगन यासारखे दोन-दोन शत्रू देशाच्या दरवाजावर धडका देत आहेत. त्यामुळे त्यावर केवळ प्रतिक्रिया न देता आपल्या गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून पुढील पन्नास-शंभर वर्षांसाठी निश्चित असा कृती आराखडा तयार करणे आणि त्यानुसार अंमल करणे गरजेचे आहे. ‘महाभारत’कार महर्षी व्यासांनी आपल्या महाभारत ग्रंथात लिहूनच ठेवले आहे की ‘लभ्या धरित्री तवा विक्रमेण, प्रकर्षतंत्रा हि रणे जयश्री।’ त्याचा अर्थ असा की शक्तीपूजा केल्याशिवाय जगामध्ये चांगले सिद्धांत कधीच दृढ होत नाहीत. सामर्थ्य हेच आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला दरारा निर्माण करण्याचे साधन आहे. या सिद्धांताकडे आम्ही कधी लक्षच दिले नाही आणि त्याची शिक्षा आमच्या राष्ट्राला पुरेपूर भोगावी लागली. तेव्हा निदान आता तरी हिंदुस्थानने काळाच्या पुढचा विचार करून तैवान, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांशी सामरिक भागीदारी करावी. त्यासोबत आधुनिक शस्त्रs, अस्त्रs, अण्वस्त्रs, रासायनिक जैविक अस्त्रs यांनी स्वतःला सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे. कारण यापुढची लढाई केवळ बंदुका, तोफा, रणगाडे, विमाने, युद्धनौका, पाणबुडय़ा त्यांच्यापुरती मर्यादित नसेल. कोरोना नामक विषाणूची निर्मिती करून चीनने सगळ्या जगालाच जायबंदी केले आहे ते बघितल्यानंतर चीन कुठल्या दृष्टीने विचार करतो, योजना करतोय त्याचा अंदाज येतो. पुढील युद्ध हे स्पेसमध्ये म्हणजे एकमेकांचे अवकाशातील उपग्रह नेस्तनाबूत करणे, रासायनिक अस्त्रs वापरणे किंवा जैविक अस्त्रानेच होणार आहे. तेव्हा हिंदुस्थाननेही अशी सगळी सज्जता कुठलाही पाप-पुण्याचा विचार किंवा कुठलेही विधिनिषेध न बाळगता करायला हवी. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे डावाला प्रतिडाव, आव्हानाला प्रतिआव्हान आणि गोळीला गोळीनेच उत्तर देऊन शत्रूला नामोहरम करता येते. कारण संवाद, चर्चा, वाटाघाटी मुत्सद्देगिरी या गोष्टी चीन आणि पाकिस्तानपासून कोसो मैल दूर आहेत, त्यांना ही भाषा समजत नाही. तेव्हा त्यांना समजेल अशा भाषेत आम्हाला उत्तर द्यावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या