लेख – करोना करोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

कालच मी पणतीवर हात ठेवून (दिवाळीला नवीन आणीन किंवा शेजाऱयाची ढापीन) शपथ घेतली की, ‘करोना’वर काही बोलणार नाही, ऐकणार नाही व वाचणार नाही. माणसांना बोलायला दुसरा विषय नाही. सगळेच बोलत असताना ऐकतं कोण कोण जाणे. वर्तमानपत्र ‘करोना’च्या बातम्यांनी भरलेलं असतं. ‘निर्भया’ खटल्यातील आरोपींना आता अखेर एकरकमी फाशी देणार ही महत्त्वपूर्ण बातमीदेखील ‘करोना’त हरवून गेल्येय.

मोबाईल ‘करोना’वरच्या विनोदांनी ठासून भरलाय. काय तर म्हणे, आमच्या काळी ‘दाऊद’ व ‘करोना’ ही दोन चपलाबुटांची दुकानं होती. आता एक अतिरेकी झालाय व दुसरा ‘व्हायरस’. एक माणूस म्हणतो, ‘मला नाही ‘करोना’ची भीती वाटत. माझं लग्न झालंय.’ हा वाचा ः चीन सगळा डुप्लिकेट माल हिंदुस्थानात पाठवतो, ‘व्हायरस’ मात्र ‘ओरिजनल’ पाठवलाय.

सगळे विनोद भारी आहेत, पण जिवाशी खेळणाऱया साथीच्या रोगासंबंधात विनोद करतात का? काही तारतम्य, काही भान, काही पाचपोच नको का? का आपली उचलली जीभ आणि लावली टाळय़ाला? या ‘व्हॉटस् ऍप’नं कहर मांडलाय. प्रसंग काही असो, त्यांची टीम विनोद पाडायला बसते-बुंदी पाडायला बसावं तसं. इथे सरकार गंभीर आहे, शासकीय यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्येय. देशाचा व तो चालविणाऱया शक्तींचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे. एवढा पसरलेल्या व एवढी अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचं ‘करोना’ रोखण्यातलं यश तोंडात बोट घालायला लावणारं आहे-साबणानं हात धुऊन! गोरगरीबांपर्यंत व अक्षरशत्रूंपर्यंत सरकारचे सावधानतेचे इशारे पोहोचलेत. व्यापारी स्वेच्छेनं बंद पाळतात. दुकानं शटर खाली करतायत. माणसं घराबाहेर पडायचं टाळतायत. रेल्वे प्लॅटफॉर्म ओस पडलेत. दादर, हुतात्मा चौक, जुहू बीच यांचे पेपरातील निर्मनुष्य फोटो जुन्या काळात घेऊन जातायत. मुंबई चाळीस साली अशी दिसत असेल. ‘करोना’ सोडला तर ही अशी मुंबई डोळय़ांना सुखावते. चोवीस तास घरी राहिल्यानं माणसं एकमेकांशी संवाद साधतायत. घरीच दोन्ही वेळेला जेवतायत. ते चविष्ट असल्याचा शोध त्यांना लागतोय. पोरांना बाप इतका वेळ प्रथमच भेटतोय. या खोलीतून त्या खोलीत जाताना नवरा दिसल्याचं नेत्रसुख बायकोला मिळतंय.

आता ज्योतिषीही रिंगणात उतरलेत. 24 मार्चपर्यंत ‘करोना’चा प्रभाव कमी होईल, असं भाकीत ते करतायत.

‘करोना’नं प्रचंड नुकसान केलंय. ते भरून काढण्यात किती वर्षे जातील सांगता येत नाही. मनुष्यहानी होईल ती वेगळीच.

पण जे थोडे आणि घसघशीत फायदे झालेत व जे धडे शिकायला मिळालेत त्याकडे आपण उमेदीनं बघू या.