वेब न्यूज – ‘गेमर्स’वरील सायबर हल्ले वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्पायडरमॅन

ऑनलाइन अथवा मोबाईल, संगणकावर दिवस-दिवस गेम्स खेळत असणारे अनेक महाभाग आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. इंटरनेटवर या लोकांना ‘ही मानवाची एक वेगळीच प्रजाती आहे’ असे विनोदाने म्हटले जाते. तहानभूक हरवून हे लोक या खेळाच्या जगात रममाण झालेले असतात. मात्र आता अशा ‘गेमर्स’ची चिंता वाढवणारी एक बातमी आहे.

या ‘गेमर्स’च्या खेळाच्या व्यसनाचा फायदा घेऊन आता हॅकर्स अनेक लोकप्रिय गेम्स या गेमर्सना मोफत पुरवत आहेत. काहीसे महागडे असलेले किंवा अगदी कमी मोबदल्यातदेखील मिळणारे काही गेम्स हे फुकट मिळत असल्याने अनेक लोक त्यावर उडय़ा मारत आहेत आणि कोणताही विचार न करता ते डाऊनलोड करून घेत आहेत. मात्र अशा मोफत पुरवल्या जाणाऱया गेम्समध्ये हॅकर्सनी एक ‘क्रिप्टो मायनिंग मालवेअर’ लपवून ठेवलेला असतो. या गेम्सबरोबर तोदेखील डाऊनलोड होतो. त्याला ‘क्रॅकोनॅश’ असे संबोधले जाते. एकदा का हा मालवेअर तुमच्याकडे डाऊनलोड झाला की, त्याच्या मदतीने हॅकर्स अत्यंत गुप्तपणे ‘डिजिटल करन्सी’ बनवायला सुरुवात करतात. यासाठी ‘गेमर्स’ना प्रो-इव्होल्युशन सॉकर 2018‘ग्रंड थेफ्ट ऑटो, ‘एनबीए 2K19’ असे लोकप्रिय गेम्स मोफत देण्याचे आमिष दाखवण्यात येते.

या सर्व प्रकाराचा शोध लावणाऱया सायबर सिक्युरिटी तज्ञांच्या मते आजवर या मालवेअरच्या मदतीने तब्बल दोन मिलियन डॉलर्स म्हणजे 14 करोड रुपये हॅकर्सनी कमावले आहेत. सध्या अशा प्रकारच्या फसवणुकीचे रोजचे 800 प्रकार समोर येत आहेत, यावरून त्याची व्याप्ती लक्षात यावी. फक्त हिंदुस्थानात आजवर अशी जवळपास 14000 प्रकरणे समोर आली आहेत. हा मालवेअर इतका घातक आहे की, एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर तो विंडोजचे अपडेटदेखील बंद करून टाकतो आणि सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेले इतर प्रोग्रामदेखील काढून टाकतो आणि स्वतःला सुरक्षित करतो. त्यामुळे ‘जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते’ हे कायम लक्षात ठेवा आणि अशा सायबर हल्ल्यांपासून स्वतःला दूर ठेवा.