दैवज्ञ हितवर्धक समाज – अमृत महोत्सवी वाटचाल

>> जयवंत मालणकर

विविधांगी उपक्रमांमुळे मुंबईसारख्या महानगरात दैवज्ञ हितवर्धक समाज ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. 6 जुलै 1929 रोजी या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेचा कामाचा पसारा वाढला. संस्थेच्या वास्तूचे उद्घाटन 1950 मध्ये झाले. या वास्तूचा अमृत महोत्सव आणि संस्थेचा 96वा वर्धापनदिन 6 जुलै 2025 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख.

दैवज्ञ हितवर्धक समाज, दादर या संस्थेची स्थापना 6 जुलै 1929 रोजी दादर, मुंबई येथे झाली. त्याआधी दोन वर्षे तत्कालीन समाज कार्यकर्ते या संस्थेच्या बांधणीचा महत्त्वपूर्ण अभ्यास करीत होते, मेहनत घेत होते. फार पूर्वीपासून दैवज्ञ समाज गिरगावात एकवटलेला असल्याने दैवज्ञांच्या सर्व ज्ञाती संस्था गिरगावातच होत्या. लालबाग, परळ, दादर, माटुंगा, माहीम ते थेट वांदय़ापर्यंत दैवज्ञ मंडळी मोठय़ा संख्येने राहू लागली. या मंडळींना दादर-माटुंगा परिसरात आपली एक तरी ज्ञाती संस्था असावी, असे प्रकर्षाने वाटू लागले. ही उणीव भरून काढण्यासाठी त्या काळातील नामवंत आणि बुजुर्ग मंडळी एकत्र आली. यात केवळ पेढीवाले आणि सुवर्णकारच नव्हते, तर काही नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनीअर असे उच्चशिक्षित ज्ञातीबांधवही होते.

दादर हे सर्वार्थाने सर्वांना मध्यभागी ठिकाण वाटू लागले. सर्वश्री कमलाकर मा. वेदक, शंकर हरी वैद्य, अनंत य. हरचेकर, शंकर गो. मुसलोंडकर, दामोदर गणेश हरचेकर, वासुदेव पां. भुर्पे, अनंत धोंडू भुर्पे, काशिनाथ वि. पाटणकर, अनंत रा. पावसकर, विष्णू गणेश वेदक आदी मान्यवरांनी एक पत्रक काढून दादर परिसरात ज्ञातीबांधवांची सभा घेतली. ठरल्याप्रमाणे नरसिंह चिंतामण केळकर रोड, दादर येथील मे. हरी महादेव वैद्य यांच्या पेढीवर 6 जुलै 1929 रोजी सभा झाली. हरी केशव पौडवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत दैवज्ञ हितवर्धक समाज, दादर या संस्थेची स्थापना झाली. तमाम ज्ञातीबांधवांचे स्वप्न अखेरीस पूर्ण झाले. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून हरी केशव पौडवाल यांची सर्वानुमते निवड झाली, तर संयुक्त चिटणीस म्हणून दत्तात्रय गणेश हरचेकर व कमलाकर भास्कर वेदक यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून भिकाजी दादाजी पितळे, अनंत गणेश वेदक, वसंत ना. हाटे, शंकर हरी वैद्य, वासुदेव पां. भुर्पे, सुंदर भा. वैद्य, रघुनाथ आ. कारेकर आदींची निवड झाली. या मंडळींनी भक्कम पायावर उभी केलेली संस्था 96 व्या वर्षीही दमदारपणे वाटचाल करीत आहे.

सभासद संख्या वाढू लागली आणि संस्थेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता काही मंडळींना संस्थेच्या मालकीची वास्तू असावी, असे वाटू लागले. बहुसंख्येने पाठिंबाही मिळू लागला, परंतु हे सत्यात उतरवणे सोपे नव्हते. कारण संस्थेकडे पुरेसा फंड नव्हता. संस्थेची वास्तू असावी या विचाराने सभासदांकडून भक्कम आर्थिक पाठिंबा मिळू लागला आणि 9 एप्रिल 1936 च्या कार्यकारिणी सभेत वि.आ. वेदक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. चर्चेअंती दादर परिसरात संस्थेची वास्तू असावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भारत विद्यामंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत ठरावाला मूर्तस्वरूप देण्यात आले. ठरावानुसार इमारत फंड समितीची स्थापना झाली. फंडाला शंकर हरी वैद्य यांनी रोख 20,000 रुपये देणगी दिली. कोहिनूर मिलच्या मागील महापालिकेच्या मालकीचा 640 चौ. मी. भूखंड संस्थेने मिळवला. त्या काळचे ख्यातनाम वास्तुविशारद व्ही. बी. पुडाळकर यांच्याकडे इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली. तब्बल दहा वर्षांच्या खडतर प्रवासानंतर 5 ऑगस्ट 1946 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर इमारतीची पायाभरणी झाली. बांधकाम सुरू असताना 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात संस्था आणि ज्ञातीबांधवांच्या वतीने याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर जेथे सध्याचे हरी महादेव वैद्य सभागृह आहे, तेथे ‘वंदे मातरम’च्या जयघोषात तिरंगा फडकविण्यात आला. 1950 मध्ये सदरहू टुमदार वास्तूचा उद्घाटन आणि वास्तुशांती सोहळा दिमाखात संपन्न झाला. देणगीदार वैद्य कुटुंबीयांच्या इच्छेनुसार दुसऱया मजल्यावरील सभागृहाला ‘हरी महादेव वैद्य सभागृह’ असे नाव देण्यात आले.

समाजहितार्थ स्थापन झालेल्या या संस्थेने अगदी पहिल्या वर्षापासून सामाजिक, सांस्पृतिक, क्रीडाविषयक उपक्रम हाती घेतले. दरवर्षी संस्थेच्या वतीने नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट पुण्यस्मरण, विद्यार्थी गुणगौरव, निबंध, वत्तृत्व, रांगोळी, क्रीडा स्पर्धा, संस्थेचा वर्धापनदिन, गरजू ज्ञातीबांधवांना निर्वाहार्थ आणि शैक्षणिक मदत, वधू-वर मेळावा, दैवज्ञ सुंदर – सुंदरी स्पर्धा, व्यापारी पेठ, मौजीबंधन, व्याख्यानमाला, राष्ट्रीय सण, महिलांसाठी चैत्र आणि मकरसंक्रांत, हळदीकुंपू, महिला भजन, कोजागिरी पौर्णिमा तसेच गरबा आदी उपक्रम राबविले जातात. यातील बहुतेक उपक्रमांमध्ये केवळ विद्यार्थी किंवा सेवक तरुण-तरुणीच नव्हे, तर प्रौढ वयाचे महिला-पुरुष आजही भाग घेतात हे विशेष.

गेल्या तीन पिढय़ांतील ज्ञातीबांधवांनी केवळ कार्यकर्ते बनून संस्थेसाठी म्हणजेच आपल्या समाजासाठी सातत्याने काम केले आहे, संस्थेची स्वतःची वास्तू तयार झाल्यापासून संस्था सर्वार्थाने भक्कम पायावर उभी राहिली आहे. अनेक सामाजिक, सांस्पृतिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत. आजतागायत 96 वर्षांच्या कालखंडात संस्थेच्या उपक्रमांत कधीही खंड पडला नाही याचे कारण म्हणजे संस्थेला निष्ठावंत आणि धडाडीचे कार्यकर्ते मिळत गेले. यापैकी का. त्रि. पोतदार, भाई वैद्य, भाईसाहेब मालंडकर, श्रीधर शंकर मालणकर, नाना शिरोडकर, सुरेंद्र भुर्पे तसेच संस्थेचे माजी पदाधिकारी सर्वश्री अनंत नारकर, राम भडेकर, सुभाष वैद्य, प्रदीप वैद्य, सूर्यकांत कल्याणकर, शशिकांत पावसकर, एकनाथ धामापूरकर, विजय धारगळकर आदींच्या कार्यामुळे त्यांचा विशेष नामोल्लेख करावासा वाटतो. या मंडळींनी अनेक वर्षे संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. समाजश्रेष्ठ मनोहर पालशेतकर, समाजश्रेष्ठी जगन्नाथ पेडणेकर यांचे मौलिक मार्गदर्शन संस्थेला नेहमीच मिळत आले आहे. असेच संस्थेच्या हिताचे मार्गदर्शन प्रत्येक समाजश्रेष्ठाr अगत्याने करत आहेत.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष हरचेकर, उपाध्यक्ष जगदीश कशेळकर, सचिव दीपक नागवेकर तसेच त्यांचे सहकारी पदाधिकारी, विश्वस्त संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

विविधांगी व दर्जेदार उपक्रमांमुळे मुंबईसारख्या महानगरात दैवज्ञ हितवर्धक समाज ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. 1950 मध्ये उद्घाटन झालेल्या या वास्तूचा या वर्षी विविध उपक्रम राबवून अमृत महोत्सव साजरा करीत आहे. संस्थेचा शताब्दी महोत्सवदेखील संस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्व सभासद, ज्ञातीबांधव यांच्या उपस्थितीत नक्कीच यशस्वीपणे साजरा होईल.