
>> डॉ. प्रवीण घोडेस्वार
तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कोण-कोणते नवे बदल करणे आवश्यक आहे, हा बदल होत असताना कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात, त्यावर मार्ग कसा काढता येऊ शकतो यासारख्या अनेक मुद्दय़ांचा आढावा घेण्यासाठी, त्यावर चर्चा घडून येण्यासाठी राज्य सरकारने जी नवीन समिती स्थापन केली आहे त्या समितीमध्ये मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याचा निर्णय 26 एप्रिल 2022 रोजी जाहीर केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सध्या सुरू असलेल्या 3 वर्षांच्या शिक्षणक्रमाचे रूपांतर 4 वर्षांच्या शिक्षणक्रमात करण्याची योजना आणि याबाबतचा आराखडा तयार करणे, एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे, सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा तयार करणे. या चार कारणांसाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष असून याच विद्यापीठाचे कुलसचिव समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीमध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधल्या आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील निरनिराळ्या विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, वरिष्ठ सल्लागार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. हे सर्व तज्ञ सदस्य पारंपरिक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांशी निगडित आहेत. अर्थात या समितीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.
राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1989 पासून कार्य करीत आहे. तत्कालीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक राज्यात एक मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. यास अनुसरून आपल्या राज्यात मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत नसते. परिणामी असे समाज घटक उच्च शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तसेच ज्या लोकांना नोकरी, व्यवसायामुळे महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता येणे शक्य नाही, अशांनादेखील या विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवता येते. असे अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठात शिक्षण घेऊन आपला वैयक्तिक आणि शैक्षणिक उत्कर्ष साधत आहेत. विशेषतः गृहिणींसाठी हे विद्यापीठ एक प्रकारे वरदानच ठरले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आजवर हजारो गृहिणींनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण या विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे. याचा त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात (करीअरसाठी) देखील लाभ झालेला आहे. शिवाय विद्यापीठाचे काही शिक्षणक्रम केवळ सेवांतर्गत उमेदवारांसाठीच विकसित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) शिक्षणक्रम. या शिक्षणक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनाच प्रवेश अर्ज सादर करता येतो. विशिष्ट वेतनश्रेणी मिळवण्यासाठी शिक्षकांना बी.एड. पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. त्यासाठी अशा शिक्षकांना केवळ मुक्त विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य अर्थात 36 जिल्हे असून प्रशासकीय सोयीसाठी राज्यात आठ ठिकाणी विभागीय केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
इतर विद्यापीठे आणि मुक्त विद्यापीठ यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पारंपरिक विद्यापीठात संलग्न महाविद्यालये असतात तशी मुक्त विद्यापीठात नसतात. त्याऐवजी याच पारंपरिक विद्यापीठांना संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे कार्यन्वित आहेत. या अभ्यास केंद्रावर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया होत असते. इतर विद्यापीठांत संलग्न महाविद्यालयात अनेक शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडल्या जातात. मुक्त विद्यापीठात मात्र यातल्या अनेक गोष्टी विद्यापीठ मुख्यालय आणि विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांवर होत असतात. विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रांवर आठवडय़ातून ठरावीक दिवस उपस्थित राहून शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. पारंपरिक विद्यापीठात पदवी शिक्षणक्रमासाठी संबंधित विषयाच्या तज्ञांनी लिहिलेल्या आणि खासगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा उपयोग अध्ययन-अध्यापनासाठी करण्यात येतो. मुक्त आणि दूरस्थ शिक्षण व्यवस्थेत मात्र विद्यार्थ्यांना सर्व विषयांवरील अध्ययन साहित्य पुरवण्यात येते. यांस ‘स्वयंअध्ययन साहित्य’ असे संबोधले जाते. हे अध्ययन साहित्य विकसित करण्याची जबाबदारी मुक्त विद्यापीठाची असते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ‘स्वयंअध्ययन साहित्य’ विकसित केलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि पात्रता चाचणी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, टीईटी, सेट, नेट) देणारे उमेदवार मोठय़ा प्रमाणात या दर्जेदार अध्ययन साहित्याचा लाभ घेऊन यशस्वी होतात. यास्तव अतिशय काळजीपूर्वक, काटेकोरपणे या स्वयंअध्यन साहित्याची निर्मिती करण्यात येते. यासाठी राज्यातील तसेच देशातील त्या-त्या विषयातल्या मान्यवर प्राध्यापकांचा आणि विषय तज्ञांचा सहभाग घेतला जातो. विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, संगणकशास्त्र विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, कृषी विज्ञान विद्याशाखा यांच्यामार्फत अध्ययन साहित्य विकसित करण्यात येते. सर्वसामान्य, अल्प शिक्षित शेतकऱ्यांना सहज समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणारे पुस्तके विद्यापीठाने निर्माण करून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. याचा लाभ ग्रामीण महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातून त्यांनी आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत बदल करून समाधानकारक उत्पन्न घेतले आहे.
तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कोण-कोणते नवे बदल करणे आवश्यक आहे, हा बदल होत असताना कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात, त्यावर मार्ग कसा काढता येऊ शकतो यासारख्या अनेक मुद्दय़ांचा आढावा घेण्यासाठी, त्यावर चर्चा घडून येण्यासाठी राज्य सरकारने जी नवीन समिती स्थापन केली आहे त्या समितीमध्ये मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे, असे वाटते. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने याची दखल घेऊन या समितीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व मिळेल असे पाहावे.
( लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सदस्य असून विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे प्र. संचालक आहेत.)
































































