
>> वैश्विक
आपल्या पृथ्वीचे उत्तर-दक्षिण असे दोन गोलार्ध दाखवणारी जागा म्हणजे विषुववृत्त. विषुववृत्त श्रीलंकेच्या खालून जाते आणि आपण उत्तर गोलार्धात 19 ते 20 अंशांवर राहतो. उत्तरेला उज्जैन येथून कर्कवृत्त जाते. ते विषुववृत्ताच्या उत्तरेला साडेतेवीस अक्षांशावर आहे. तसेच दक्षिण गोलार्धात साडेतेवीस अक्षांशावर असलेल्या वृत्ताला मकरवृत्त म्हणतात.
पृथ्वीचे अक्षांश-रेखांश या रेषा काही दाखवता येण्यासारख्या नसतात, परंतु सूर्याच्या भासमान चलनाने त्यांचं अस्तित्व लक्षात येतं. यासाठी आकाशाचा दिवसाही थोडासा अभ्यास करायला हवा. कारण रात्रीचं ताऱयांनी खच्चून भरलेलं आकाश सर्वांनाच मोहित करतं, परंतु दिवसाच्या आकाशात सूर्याकडे पाहणंही कठीण आणि विशिष्ट गॉगलविना तसं पाहणंही धोक्याचं, परंतु सूर्योदय आणि सूर्यास्त आपण नक्कीच पाहू शकतो. अनेक पर्यटन स्थळांवर ‘सन-राईज’ आणि ‘सन-सेट’ पॉइंटस्वर पर्यटकांची त्या त्या वेळी गर्दी होते. कन्याकुमारीला पौर्णिमेच्या दिवशी पूर्वेच्या सागरातून उगवणारा चंद्र आणि पश्चिम सागरात बुडणारा सूर्य एकाच वेळी दिसतो.
काही आठवडय़ांपूर्वी आपण सूर्याचा ‘ऍनॅलेमा’ किंवा भासमान मार्ग आपल्यासाठी इंग्लिश आठ (8) या आकाराचा कसा दिसतो ते जाणून घेतलं होतं. वर्षभर सूर्य आकाशात कसा फिरतो त्याचं एक साधी काठी रोवून निरीक्षण केलं की काठीच्या सावलीच्या टोकाच्या बिंदूंची नोंद करून त्याची जोडणी केली की इंग्लिश ‘आठ’चा आकडा येईल. पण त्यासाठी वर्षभराचं निरीक्षण आणि दिवसाचं निरभ्र आकाशही असायला हवं.
आपल्याकडे चार महिने पावसाळय़ात तशी स्थिती कशी असणार! पृथ्वीचं विषुववृत्त आकाशापर्यंत नेले की त्याला ‘सेलेस्टिअल इक्वेटर’ किंवा वैषुविक वृत्त असं म्हणतात. साधारण 19, 20, 21 मार्च या दिवसांत सूर्य बरोबर त्यावर येतो व पृथ्वीवरच्या विषुववृत्तीय प्रदेशात (केन्या वगैरे) त्या दिवशी बरोबर 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. मात्र त्यापासून दूरच्या अक्षांशांवर राहणाऱया प्रदेशात त्यात थोडा थोडा फरक पडतो. या वर्षी विषुवदिन 20 मार्चला आहे. त्या दिवशी विषुववृत्तावर उभं राहिल्यास सूर्य मध्यान्हीच्या वेळेला बरोबर डोक्यावर येईल. आपण 19 अक्षांशावर असल्याने आपल्याकडे एकदा मे आणि नंतर जुलैमध्ये सूर्य डोक्यावर येऊन सावली पायात पडेल.
सूर्य विषुववृत्तावर आला म्हणजे त्याच्या उत्तरायनाचे तीन महिने किंवा निम्मे दिवस संपले. आता तो (साधारण) उज्जैनपर्यंत उत्तरकडे जाईल आणि 22 जून रोजी दक्षिणायन सुरू होईल. त्यामुळेच 20 मार्च ते 20 सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात आपल्याकडे दिवसाची वेळ जास्त असते. 22 डिसेंबरनंतर ‘मोठा’ होणारा दिवस आता अधिकाधिक प्रकाशमान असेल. मग पुन्हा 22 सप्टेंबरनंतर रात्र मोठी होताना जाणवेल. यापैकी जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळय़ातच गेल्याने आपल्याला त्याचा फारसा अंदाज येत नाही. पण जिथे पाऊस नसेल तिथे उत्तर गोलार्धात हे सहा महिने तापदायक ठरतात.
पृथ्वीच्या साडेतेवीस अंश कललेल्या अक्षामुळे सूर्याचे हे ‘न चालताही चालणे’ पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ऋतुचक्राचा अनुभवही येतो. या ऋतुचक्राचे सुंदर वर्णन दुर्गा भागवत यांनी याच नावाच्या पुस्तकात केलंय. सध्या मुंबईतल्या घरातून उगवता सूर्य मला एका टॉवरच्या डाव्या बाजूला (उत्तरेला) दिसतो. काही काळापूर्वी तो त्या टॉवरच्या उजव्या बाजूला (दक्षिणेला) दिसायचा. गेल्या महिना सवा महिन्यातलं हे निरीक्षण आहे. अर्थात सूर्य क्षितिजावर उगवताना दिसणं मुंबईत कठीणच, पण तो थोडा वर आला की त्याची बदलती जागा कळते. खिडकीतून येणाऱया उन्हाची तिरीपही वेगळय़ा कोनात दिसते. असं खिडकीतून सकाळ-संध्याकाळचं थोडं जरी ऊन येत असेल तर वर्षभर त्याचं निरीक्षण केलं तर आकाशातील सूर्याचा बदलता प्रवास लक्षात येईल.
आपल्याकडे हा आंब्याच्या झाडांना मोहर येण्याचा काळ. पुढे चैत्रात वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच झाडाची नवी पालवी दिसू लागेल. रानात लालभडक फुलांचे पळस फुलतील. चाफा ऊन पिऊन वातावरणात सुगंध पसरवेल आणि कोकिळांचा मंजूळ स्वर कानी पडेल. पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या वैज्ञानिक नावाने होणारे हे काव्यात्म बदल माणसासह जीवसृष्टीवर परिणाम करतात. त्यामुळे याचा गणिती विचार करताना मनात काव्यमय अर्थही जाणून घ्यायला हरकत नाही.





























































