चांद्रविजयाची पन्नाशी!

107

>> दिलीप जोशी

रशियाचा ‘स्पुटनिक’ पहिला यशस्वी कृत्रिम उपग्रह ठरला आणि त्यांचाच युरी गागारिन अंतराळात जाणारा पहिला माणूस म्हणून मिरवला. तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या यशानंतर अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी 1960चं दशक पूर्ण होण्याच्या आत चंद्रावर माणूस उतरवण्याचा संकल्प जाहीर केला आणि त्यांच्या निधनानंतर 20 जुलै 1969 रोजी तो प्रत्यक्षात उतरला. त्या दिवशी रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी ‘ईगल’ हे चांद्रयान नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांच्यासह चंद्रावर उतरले. त्यानंतर 21 जुलैच्या पहाटे 2 वाजून 56 मिनिटांनी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेले पाऊल पहिले मानवी पाऊल ठरले. उद्या या चांद्रविजयाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.  

विज्ञानाने असाध्य ते साध्य आज केले, उमटली चंद्रावर पाऊले!’ असं एखादं भावगीत चांद्रविजयानंतर लिहिता आलं असतं. 20 जुलै 1969 हा दिवस माणसाच्या वैज्ञानिक इतिहासातला देदीप्यमान असाच ठरला. खरं तर पृथ्वीवरील घडय़ाळाचा हिशेब मांडला तर 20 जुलै 1969 रोजी रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी ‘ईगल’ हे चांद्रयान नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांच्यासह चंद्रावर उतरले. त्यानंतर सहा तासांनी म्हणजे 21 जुलैच्या पहाटे 2 वाजून 56 मिनिटांनी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेले पाऊल पहिले मानवी पाऊल ठरले. त्या क्षणी हिंदुस्थानात सकाळ होती. त्यामुळे तारखेचा संदर्भ त्यानुसार घ्यायचा. या थरारक विजयाचं समालोचन बीबीसीवर सुरू होतं. ते ऐकल्याचं आठवतं. कारण तोपर्यंत मुंबईत टी.व्ही. नव्हता. दिल्लीत होता, पण तिथे परदेशी टी.व्ही.चं थेट प्रक्षेपण त्या काळी शक्य झालं होतं की नाही ते ठाऊक नाही. उद्या या चांद्रविजयाचा सुवर्ण महोत्सव आहे!

दुसर्‍या दिवशी नील आणि एडविन यांनी चंद्र पादाक्रांत केल्याच्या वृत्तांनी जगभरची वृत्तपत्रे सजली. माणूस खर्‍या चंद्रावर पोहोचला की नाही याचा एक भंपक वादही नंतर झाला, परंतु ‘ईगल’चे अवशेष नंतरच्या यानांना चंद्रावर दिसले आणि चंद्रावर वातावरण नसल्याने तिथे उमटलेली पावलंही तशीच राहिली.

उद्या या चांद्रविजयाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. रशियाचा ‘स्पुटनिक’ पहिला यशस्वी कृत्रिम उपग्रह ठरला आणि त्यांचाच युरी गागारिन अंतराळात जाणारा पहिला माणूस म्हणून मिरवला याचं अमेरिकेला वैषम्य वाटत होतं. ते अमेरिका-रशिया (त्यावेळचे सोव्हिएत युनियन) यांच्या ‘शीतयुद्धा’चे दिवस होते. सोव्हिएत यशानंतर अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी 1960चं दशक पूर्ण होण्याच्या आत चंद्रावर माणूस उतरवण्याचा संकल्प जाहीर केला आणि त्यांच्या निधनानंतर 1969 मध्ये तो प्रत्यक्षात उतरला.

पहिल्या चांद्रवीरांनी जागतिक दौरा केला. त्यावेळी त्यांना मुंबईत पाहता आलं. हा तिसरा चांद्रवीर म्हणजे अपोलो-11 या यानाचा पायलट मायकेल कॉलिन्स होता. तो प्रत्यक्षात चंद्रस्पर्श करून आला नसला तरी त्याची कामगिरी खूप महत्त्वाची होती. ‘मेअर ट्रन्क्विलिटॅटिस’ या चंद्रावरील प्रदेशात उतरलेल्या ईगल (गरुड) यानाची भरारी जगात गाजली. त्यातून उतरलेल्या पहिल्या दोन चांद्रवीरांनी चंद्रावर 21 तास वास्तव्य केलं. चांद्रपृष्ठावर उडय़ा मारल्यासारखं चालण्याचा कोणीही कधीही न घेतलेला अनुभव गाठीशी बांधला. 16 जुलै 1969 रोजी केनेडी स्पेस सेंटरवरून उड्डाण केलेल्या अपोलो-11 ने चार दिवसांतच  चांद्रमोहीम फत्ते केली आणि 24 जुलै 1969 रोजी तिघेही चांद्रवीर पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले. आज अमेरिकेत या चांद्रविजयाचा सुवर्ण महोत्सव सुरू असेल.

त्यानंतरच्या काळात माणसाने आणखी पाच चांद्रवार्‍या केल्या. म्हणजे एकूण सहा वेळा मिळून 12 चांद्रवीर चंद्रावर उतरले. त्यांच्या 24 पावलांचे (अर्थात बुटांचे) ठसे तिथे विश्वातील माणूस नावाच्या प्राण्याचे अस्तित्व कोरून आले. अपोलो – 11च्या यशानंतर लगेच 19 नोव्हेंबर 1969 रोजी चार्ल्स कॉन्रॅड आणि ऍलन बीन हे चांद्रयात्री चंद्रावर उतरले. तत्पूर्वी अडीच वर्षे ‘सर्व्हेअर’ यान चंद्रावर गेलं होतं. त्याच्या आसपासच हे अंतराळवीर फेरफटका करून आले. तिथे व्यतीत केलेल्या 31 तास 31 मिनिटांत त्यांनी महत्त्वाची नोंद केली ती भूकंपासारख्याच ‘चांद्रकंपाची’ (मूनक्वेक) अपोलो-12 चा पायलट होता रिचर्ड गॉर्डन.

त्यानंतरचं अपोलो-13 अयशस्वी ठरलं. त्याच्या अपयशावरही हॉलीवूडने चित्रपट काढला. या अपयशाने न डगमगता अपोलो-14 वर स्वार होऊन ऍलन शेपर्ड आणि एडगर मिशेल यांनी 5 फेब्रुवारी 1971 रोजी चंद्रावर उतरून तिथे 33 तास 31 मिनिटांत अनेक प्रयोग केले आणि अपोलो-11 प्रमाणेच चंद्रावरच्या दगडमातीचे नमुने आणले. यावेळी चंद्राभोवती भ्रमण करणारा पायलट होता स्टुअर्ट.

त्यानंतरची चांद्रवारी होती अपोलो-15 मधून गेलेल्या डेव्हिड स्कॉट आणि जेम्स आयर्विन यांची. 30 जुलै 1971 रोजी चंद्रावर नुसतं ‘अवतरण’च केलं नाही, तर सोबत नेलेली चांद्रगाडी चंद्रावर चालवली. 66 तास 55 मिनिटे मेअर इम्ब्रियम या चंद्रावरील (पाणी नसलेल्या) सागरात भ्रमण करण्याचा आनंद मिळवला. मुख्य यानाचा पायलट होता आफ्रेड वॉर्डन.

पाचवी चांद्रमोहीम होती ‘अपोलो-16’ची. जॉन यंग आणि चार्ल्स डय़ूक हे चांद्रवीर त्यातून 21 एप्रिल 1972 रोजी चंद्रावर उतरले. डिस्कार्टेस या चंद्रावरील परिसरातील डॉनल्ड विवराच्या सानिध्यात त्यांनी 27 कि.मी. चांद्रप्रवास केला. एकूण 71 तास 21 मि. एवढा वेळ ते चंद्रावर होते. त्यावेळी चंद्राभोवतीच्या कक्षेत पायलट थॉमस नॅटिंगली हा यान सांभाळत होता. या यानातील चांद्रवीरांनी चंद्रावर अनेक वैज्ञानिक प्रयोग केले.

सहावी आणि शेवटची चांद्रवारी झाली ती अपोलो-17 यानातून गेलेल्या आणि 11 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर उतरलेल्या चांद्रवीरांची. युजिन सेर्नन आणि हॅरिसन श्मिट हे दोन चांद्रवीर चंद्रावरच्या टॉरस लिट्रॉ दरीत उतरून 75 तास भ्रमण करणारे आतापर्यंतचे अखेरचे चांद्रवीर ठरले. रोनाल्ड इव्हान्स त्यांचं अपोलो-17 चंद्राभोवती फिरवत राहिला. अशा या मानवी चांद्र मोहिमा. रशिया, चीन, जपान आणि हिंदुस्थाननेही चंद्रावर यानं पाठवली. 2008 मध्ये पाठवलेल्या चांद्रयान-1 च्या इम्पॅक्टरने चांगली कामगिरी केली. आता चांद्रयान-2 ने चंद्रावर उतरण्याची तयारी केली आहे. सप्टेंबरमध्ये ते यशस्वीरीत्या कामगिरी पूर्ण करील आणि आपणही चंद्रावर माणूस पाठवण्याचं ध्येय नजीकच्या भविष्यकाळात पूर्ण करू शकलो तर हिंदुस्थानी पावलंही चंद्रावर उमटतील.

आपली प्रतिक्रिया द्या