लेख – कार्बनचा ‘विकास’ सोडला तरच मानवी जीवन वाचेल!

410

>> ऍड. गिरीश राऊत

मानवजातीने म्हणजे आपण प्रत्येकाने कार्बनचा विकास सोडून हरितद्रव्याची कास धरली तरच वाचू. अमेरिकेतील नासाया सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेचा अगदी अलीकडे आलेला, डोळे उघडणारा अहवाल सोबत देत आहे. यात सन 1880 पासून आतापर्यंत 1.1 अंश से.ची वाढ सरासरी तापमानात झाली असे म्हटले आहे. पण सन 1756 ला स्वयंचलित यंत्र आल्यापासून आतापर्यंत सरासरी तापमानात 1.8 अंश से.ची वाढ झाली आहे. नासा व इतर संस्था तापमानवाढीचा आकडा गेल्या दोन वर्षांपासून मागे खेचत आहेत. स्पष्टपणे हा अर्थव्यवस्थेचा विज्ञानावरील दबाव आहे.

ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा परिणाम जर्मनीत दिसला. 40टक्के वीज येत असूनही जर्मन सरकारने कोळशापासून वीज निर्मिती करणारी औष्णिक विद्युत केंद्रे सन 2038 पर्यंत म्हणजे 18 वर्षांत बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील सर्वात जुना 1950 सालचा कारखाना बंद करून सुरू केली. ही कृतीदेखील अपुरी असली तरी अशा प्रत्यक्ष कृतीची जगभर गरज आहे. ऑस्ट्रेलियातील वणव्यांबाबत काही गैरसमज पसरले आहेत.

वणवे लागले नाहीत; लावले गेले या प्रचारामागे तापमानवाढ हे कारण आहे की ‘खरे’ कारण लपवण्याचा हेतू आहे? ऑस्ट्रेलिया कोळशाची मोठी निर्यात करतो. मात्र गेल्या 50 वर्षांत अनेकदा विकासाला अडथळा नको म्हणून जंगलाला आग लावली जात होती. तेव्हा ते लपवण्याचा प्रयत्न होत राहिला. याच विकासामुळे तापमान 45 – 50 अंशावर जाऊ लागले व यावर्षी ऑस्ट्रेलियातील सर्व जंगलांत आग लागली. आता मात्र तापमानामुळे आगी लागत आहेत हे लपवणे जास्त आवश्यक बनले, कारण औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्थेवर बोट ठेवले जाणे त्यात हितसंबंध गुंतलेल्यांना नको आहे. म्हणून पूर्वीच्या उलट भूमिका घेऊन वणवे लावले जातात असे म्हणणे त्यांना भाग पडते. हितसंबंधापेक्षा हित महत्त्वाचे आहे आणि ते जंगल व पृथ्वीशी जोडले आहे. भौतिक विकास अहित करत आहे.

मांसाहाराला विरोध करणारे ‘हवामान बदल’ व तापमानवाढीस मांसाहार कारण असल्याचा जोरात प्रचार करत आहेत. त्यांनी शाकाहाराचा जरूर प्रचार करावा. पण या प्रश्नात असा प्रचार केल्याने खरी कारणे जी उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहननिर्मिती व वाहतूक आणि रासायनिक-यांत्रिक शेती आहेत त्याकडे दुर्लक्ष होते. मांसाहार लाखो वर्षे चालू आहे. त्यामुळे काही हवामान बदल झाला नाही आणि मांस उद्योग म्हणून जो प्रकार आहे तो औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे आहे. अशा प्रचारामुळे लोक खऱ्या कारणांबाबत गाफील राहतात. खरे कारण त्यांच्या पृथ्वीविरोधी जीवनशैलीत आहे.

निसर्ग शेवटी उपाय करेलच, असा भाबडा प्रचार होतो. वणव्यांनंतर पाऊस पडला व काही झाडांना पुन्हा कोंब फुटले याकडे लक्ष वेधले जाते. याबाबत समजले पाहिजे की, वणवे लागण्यास कारण असलेली तापमानवाढ तुम्ही वापरता त्या मोटारींमुळे, वीजनिर्मितीमुळे, सीमेंट स्टील व इतर हजारो अनावश्यक वस्तूंच्या निर्माण व वापरामुळे झाली. ईश्वराला का मधे आणता? त्याने तुम्हाला जीवन दिले. ते शाश्वत रहावे म्हणून त्याने निर्माण केलेली झाडे, जंगले, मातीचा थर, नद्या, डोंगर, सागर तुम्ही क्षणोक्षणी उद्ध्वस्त करत आहात. जीवसृष्टी नष्ट करत आहात, वातावरण बिघडवत आहात. त्याच्या एवढे विरूद्ध वागून पुन्हा तो दयाळू आहे म्हणून जीवनाची अपेक्षा कशी करता?

यंदा बराच अवकाळी पाऊस पडला कारण उष्णतेमुळे सध्या महासागर व दक्षिण ध्रुवावरील बर्फाची मोठय़ा प्रमाणात वाफ होत आहे. आधीच प्रचंड प्रमाणात अतिरिक्त वाफ पृथ्वीच्या वातावरणात जमा आहे. ही वाफ थंडावा मिळाल्यावर अवकाळी पाऊस किंवा गारांच्या रूपाने कोठेही कोसळत आहे. ते महाराष्ट्रातही कोसळला. पिकांचे नुकसान झाले. इंडोनेशियात व इतरत्रदेखील हेच घडले. त्यामुळे महापूर आले. मानव व इतर जीवसृष्टीची हानी झाली.

गेल्या दहा वर्षांत असा अवेळी पाऊस अनेकदा झाला, तरी अधिक दाहकतेचे वणवे अधिक क्षेत्रात लागत राहिले. गेल्या वर्षी उत्तर ध्रुवालगतच्या क्षेत्रांत वणव्यांनी हाहाकार केला म्हणून पाऊस पडला व झाडांना कोंब आले यामुळे निर्धास्त होऊ नये. ही तर पृथ्वीची शेकडो कोटी वर्षांत विकसित झालेली जीवन देण्याची क्षमता आहे, जी अजूनही पाऊस पाडत आहे व कोंब आणत आहे. परंतु या क्षमतेला मर्यादा आहे. पॅरिस करारात ती नमूद केली आहे. उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत सरासरी तापमानात 2 अंश से.ची वाढ, ही ती मर्यादा आहे. ही मर्यादा चालू वर्षी ओलांडली जात आहे. जीवन देण्याची निसर्गाची क्षमता संपुष्टात येत आहे. औद्योगिकरण तात्काळ थांबले तरच अवेळी का असेना पण पडणारा पाऊस, करोडो वर्षे विकसित झालेली जैवविविधता नाही राखू शकणार, पण किमान जीवन शाबूत ठेवू शकेल, निसर्ग आपल्याला जगवू शकेल, अन्यथा नाही.

काही धर्माची माणसे वणवे लावत आहेत असा व्हॉटस् ऍपवरील प्रचार वाचला. खरी गोष्ट ही आहे की, अर्थव्यवस्था वणवे लावत आहे व सर्व धर्मांची ‘भौतिक विकास’ व ‘प्रगती’ मानणारी बहुतांश माणसे यात सामील आहेत. जीवनाची धारणा करणे हा पृथ्वीचा धर्म आहे आणि आधुनिक औद्योगिक मानवजात आपल्या इच्छांमुळे या पृथ्वीधर्माविरुद्ध वर्तन करत आहे.

मानवजातीने म्हणजे आपण प्रत्येकाने कार्बनचा विकास सोडून हरितद्रव्याची कास धरली तरच वाचू. अमेरिकेतील ‘नासा’ या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेचा अगदी अलीकडे आलेला, डोळे उघडणारा अहवाल सोबत देत आहे. यात सन 1880 पासून आतापर्यंत 1.1 अंश से.ची वाढ सरासरी तापमानात झाली असे म्हटले आहे. पण सन 1756 ला स्वयंचलित यंत्र आल्यापासून आतापर्यंत सरासरी तापमानात 1.8 अंश से.ची वाढ झाली आहे. नासा व इतर संस्था तापमानवाढीचा आकडा गेल्या दोन वर्षांपासून मागे खेचत आहेत. स्पष्टपणे हा अर्थव्यवस्थेचा विज्ञानावरील दबाव आहे.

पृथ्वी होरपळत आहे. मन विशिष्ट साच्यात घडवल्याने जर्मनीने केलेला उपायही अनेकांना धक्कादायक वाटतो. पण हा उपायही औद्योगिकरण अपरिहार्य आहे अशा अंधश्रद्धेतून केला आहे. खरा उपाय पृथ्वीच्या दृष्टीने पृथ्वीसुसंगत बनण्यात आहे. त्यासाठी ताबडतोब कृषियुगात जाणे आवश्यक आहे.

(लेखक भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या