
>> साधना गोरे
वैशाखाच्या काहिलीत पावसाची आतुरतेने वाट पाहणारं मन भाद्रपदात ओल्या कपडय़ांच्या कुबट वासाने गुदमरायला लागतं. हा पावसाळा सरतोय की नाही, असं वाटत असतानाच कार्तिकाची सुखद हवा सुरू होते. हा बदल किंवा परिवर्तन निसर्गाचा स्थायीभाव आहे, तसा तो भाषेचाही आहे. प्रत्येक जिवंत भाषेत असे बदल सातत्याने होत असतात. मराठीत अशा अर्थ बदलाची म्हणजे अर्थ परिवर्तनाची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. अलीकडे मराठीतील ‘संपन्न’ शब्द हिंदीच्या अर्थाने वापरण्याकडे मराठी भाषिकांचा कल वाढताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी मराठीत सणांप्रमाणे वर्धापनदिन किंवा मराठी भाषा दिन यांसारखे कार्यक्रमही ‘साजरे’ केले जायचे. अलीकडे मात्र हिंदीप्रमाणे मराठीतही कार्यक्रम ‘संपन्न’ होऊ लागलेले आपण मोठय़ा प्रमाणात ऐकतो, वाचतो आहोत. हा बदल किती मोठय़ा प्रमाणात होऊ घातला आहे. यासाठी गुगलची साक्ष घेता येईल. गुगलवर ‘संपन्न झाला’ हे शब्द टाकून शोध घेतल्यास एक-दोन नव्हे, तब्बल दहा पानी परिणाम आढळून येतात. पैकी एखाददुसरा परिणामच हा मराठीतील ‘संपन्न’चा मूळ अर्थ दर्शविणारा आहे.
मराठी आणि हिंदी, दोन्ही भाषांमधील ‘संपन्न’चे मूळ संस्कृतमध्ये असले तरी दोन्ही भाषांनी आपापल्या प्रकृतीनुसार त्याचे भिन्न अर्थ स्वीकारल्याचं दिसतं. ‘संपन्न’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘समापन्न’ शब्दात आहे. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ युक्त, सहित, पूर्णत्व, समाप्त असा होतो. पैकी युक्त, सहित या अर्थच्छटा स्वीकारून ‘वैभवसंपन्न’, ‘प्रतिभासंपन्न’ असे शब्दप्रयोग मराठीत केले जाऊ लागले. मात्र वैभवाच्या संदर्भात त्याचा वापर अधिक वाढून हळूहळू श्रीमंत, वैभवशाली असा अर्थसंकोच झाला असावा. हिंदी भाषेत ‘समापन्न’ शब्दाच्या पूर्णत्व, समाप्त या अर्थच्छटेवर भर दिला जातो. अलीकडे मराठीनेही हिंदीतील याच अर्थाने ‘संपन्न’ शब्द वापरण्यास सुरुवात केलेली दिसते. ‘यातायात’, ‘उदंड’, ‘चेष्टा’ हे शब्दही मराठी आणि हिंदीत अशा प्रकारे भिन्न अर्थाने वापरले जातात.
हिंदीचं अनुकरण करण्याच्या आधी मराठीत कार्यक्रमासाठी ‘साजरा झाला / केला’ असे शब्दप्रयोग सर्रास रूढ होते. या ‘साजरा’ची विविध शब्दप्रयोगांत गुंफलेली रूपं पाहणं मोठं गमतीचं आहे. ‘हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतून किंवा ‘एक लाजरा अन् साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं’ या जगदीश खेबूडकरांच्या गीतातून ‘साजरा-लाजरा’ यांचा अनुप्रास मनात इतका घट्ट रुजलाय की, एक उच्चारला की दुसरा शब्दही आठवतोच! ‘साजरा’ शब्दाचा सुंदर, देखणा या अर्थापर्यंत झालेला प्रवास पाहण्यासाठी आपल्याला ‘सज – साज – सजणे’ ही साखळी लक्षात घ्यावी लागते. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते ‘सजणे’, ‘साजरा’ या शब्दाचं मूळ ‘सज्ज – सस्ज’ या संस्कृत शब्दांत आहे. त्याचा मूळ अर्थ धनुष्याची दोरी वगैरे ताणून लढण्याच्या तयारीत असणे, असा आहे. कालांतराने त्याचे सामान्यीकरण होऊन कोणत्याही गोष्टीसाठी तयार होणे असा अर्थ प्राप्त झाला. तयार होण्यासाठी अनेक साहित्याची जुळवाजुळव करावी लागते. त्यावरून आज साज म्हणजे शोभा आणणारे साहित्य, वाद्य सामग्री, सरंजाम, दागिने अशा अर्थच्छटा या शब्दाला प्राप्त झालेल्या आहेत. ‘सजणे’, ‘सजवणे’ ही क्रियापदे सुरुवातील कोणत्याही तयारीसाठी आणि कालांतराने नटणे, शृंगार अशा विशिष्ट अर्थाने वापरली जाऊ लागली. ‘सण’, ‘समारंभ’, ‘कार्यक्रम’ यांच्यासाठी साजरा क्रियापदाचा वापर याच अर्थाने केला जातो. फार्सीतही शृंगार या अर्थाने ‘साझ’ शब्द आहे, हे लक्षणीय आहे.
अलीकडे मात्र देखणा, सुंदर या अर्थाने ‘साजरा’ शब्दाचा वापर होईनासा झाला आहे. पूर्वी या अर्थाने त्याचा वापर किती विविधांगी केला जात होता हे दर्शविणाऱया काही म्हणी – वाक्प्रचार मराठीत आहेत. वरवर झकपक करून एखादा दोष, व्यंग लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ‘आंधळा डोळा काजळाने साजरा’ असं म्हटलं जाई. यासंदर्भात ‘ऐन वेळी युक्तीने प्रसंग साजरा केला’ असे वाक्प्रयोगही केले जातात. एखादी गोष्ट दूर आहे तोवरच चांगली दिसते. जवळ आली की, तिच्यातील दोष दिसू लागतात या अर्थाने ‘दुरून डोंगर साजरे, जवळ गेले की काटे भेटे’ ही म्हण आताही मोठया प्रमाणात वापरली जाते. दुसऱयाच्या वैभवावर उडय़ा मारणे या अर्थाने ‘पुणतांब्याच्या म्हशी आणि ढोणगाव साजरा’ हा शब्दप्रयोग वापरला जाई. साजेल ते ल्यावे आणि पचेल ते खावे हा मराठी माणसाचा स्वभाव आहे. तर मग हा ‘साजरा – साज’ नव्याने रुजवायला काय हरकत आहे?