
>>विलास पंढरी
गृहत्यागानंतर गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्षे कठोर तपश्चर्या केली व त्यानंतर त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्धपौर्णिमा म्हणून ओळखला जातो. जगातील मोठय़ा धर्मातील एक असलेल्या बौद्ध धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची आज जयंतीही आहे. यानिमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या मानव कल्याण तत्त्वज्ञानाचा थोडक्यात घेतलेला हा परामर्ष.
हिंदुस्थान हे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या धर्मांचे उगमस्थान आहे. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना बुद्धपौर्णिमेला झाल्या आहेत. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्याने हिंदुस्थान, चीन, नेपाळ, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया इत्यादी देशांतील 180 कोटींहून अधिक लोक हा सण मोठय़ा उत्साहात साजरा करतात.
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग व पंचशील तत्त्वे सांगितली आहेत.
चार आर्यसत्ये
भगवान बुद्ध म्हणतात, “दुःखाची निर्मिती वासना, इच्छा, आसक्ती, आवड अशा प्रकारच्या इच्छांमधून होते. म्हणून आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
- दुःखः मानवी जीवन हे दुःखमय आहे.
- तृष्णाः मनुष्याच्या न संपणाऱया इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
- दुःख निरोधः दुःखाचे निराकरण सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
- प्रतिपद् : दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग आहे.
तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ सांगितला.
अष्टांगिक मार्गातील या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अशा-
- सम्यक् दृष्टीः निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
- सम्यक् संकल्पः म्हणजे योग्य निर्धार, विचार.
- सम्यक् वाचा : करुणायुक्त व सत्यपूर्ण वाणी ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- सम्यक् कर्मान्त : उत्तम कर्म करणे.
- सम्यक् आजीविका : वाईट मार्गाने आपली उपजीविका न करणे.
- सम्यक् व्यायाम : वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
- सम्यक् स्मृती : तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून मनाला जागृत ठेवणे.
- सम्यक् समाधी : कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
बुद्ध धम्माची तीन अंगे
- शील : धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख कधीही साथ न सोडणाऱया तिच्या सावलीप्रमाणे साथ देते.
- समाधी : शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच माणूस दुराचारापासून वाचू शकतो व यासाठी समाधी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मनाला वश करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवण्यास सांगितले. मन भटकले तर त्याला श्वासाच्या जाणिवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात.
- प्रज्ञा : सहज स्वाभाविक श्वासाच्या समाधीमुळे नाकाजवळ संवेदना जाणवू लागते. त्यानंतर ती साऱया शरीरात पसरते. यामुळे सत्याची जी जाणीव होते ती आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.
सात वृध्दीकारक धर्म
- जेव्हापर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल.
- जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदे मोडणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल.
- जोपर्यंत वडीलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तोपर्यंत त्यांची भरभराटच होईल.
- जेव्हापर्यंत महिलांना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल.
- जेव्हापर्यंत ते सर्व चैत्यांचा गौरव करतील व सर्वधर्म कर्तव्ये पार पाडतील तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल.
- जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.





























































