
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
वयाच्या दहाव्या वर्षापासून गीतांजली राव हिला ‘युवा वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जाते. 2019चा ‘30 वयाखालील 30’ या यादीमध्ये गीतांजलीचा समावेश झाला. ई.पी.ए. प्रेसिडेन्शिअल ऍवार्ड, 2019चा कुमॉन स्टुडण्ट इन्स्पिरेशनल ऍवॉर्ड, 2020 वर्षी जॉर्ज स्टेफेन्सन इनोव्हेशन ऍवॉर्ड, इन्नोव्हेशन टॉप हेल्थ पिलर ऍवॉर्ड, अशा अनेक सन्माननीय पुरस्कारांनी तिच्यावरती प्रशंसा करीत वर्षाव केलेला आहे. ‘टेड टॉक’ या कार्यक्रमात तिने तीन वेळा हजेरी लावली. ‘टाईम’ मॅगझिनचा ‘कीड ऑफ द इयर’ हा पुरस्कार या सगळ्यांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा, सन्मानाचा समजला जातो. या सन्मानामुळे गीतांजलीला युवा शास्त्रज्ञ म्हणून पुन्हा एकदा प्रेरणादायक प्रोत्साहन मिळाले आहे.
गेल्या आठवडाभरात पुन्हा एकदा हिंदुस्थानी बुद्धिमत्तेची चुणूक जगभराला प्रभावित करून गेली. जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाने यंदापासून ‘कीड ऑफ द इयर’ (प्रभावी बालक) हा पुरस्कार देण्याचे ठरवले. त्यासाठी जवळ जवळ 5000 नामांकन प्राप्त झाले. मात्र या पुरस्कारावर नाव नोंदले ते गीतांजली राव या पंधरा वर्षीय हिंदुस्थानी-अमेरिकन युवतीचे.
मूळच्या हिंदुस्थानी भारती आणि राम राव यांची कन्या असलेल्या गीतांजलीला हिंदुस्थानबद्दल विलक्षण आकर्षण आणि ओढ आहे. ती अनेकदा आपल्या आजोळी येत असते, हे विशेष. सध्या डेन्व्हर, कॉलरँडो येथील स्टेम स्कूलच्या हायलँड रेंच विद्यालयामध्ये गीतांजली शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये तिला वैशिष्टय़पूर्ण गती होती. शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग मानवीय कल्याणासाठी वापरण्यासंदर्भात गीतांजलीचे विचारचक्र अगदी लहान वयापासूनच सुरू झाले होते. आपल्या मुलीतील चौकसवृत्ती आणि असामान्य बुद्धी याची जाणीव झाल्यामुळे राव दाम्पत्याने मुलीला पोषक वातावरण उपलब्ध करून दिले. साधारण दुसऱया वर्गात असताना गीतांजली आपल्या आजोळी हिंदुस्थानात आली त्यावेळी तिची आजी विहिरीचे पाणी उकळून गाळून पिण्यासाठी वापरत असे. एकदा गीतांजली विहिरीचे पाणी न उकळता प्यायली आणि दुसऱया दिवशी ती आजारी पडली. तेव्हापासून शुद्ध पाणी शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तिला कळले. पुढे सातव्या वर्गात असताना फ्लिंट, मिशिगन येथील रहिवासी पाण्याच्या प्रदूषणामुळे त्रस्त होते. तेथील पाण्यामध्ये असलेल्या शिशाच्या धोकादायक प्रमाणामुळे नागरिक विविध व्याधींनी त्रस्त होते. लहानपणापासून शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे याची जाणीव असलेल्या गीतांजलीने पाण्याचे प्रदूषण ओळखण्यासाठी एक उपकरण तयार करण्याचे ठरवले. याबाबतीत तिच्या आई-वडिलांनी तिला प्रोत्साहित केले. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आणि जलप्रदूषणासंदर्भात फारसे काम होत असलेले त्यांच्या माहितीत नव्हते. राव दाम्पत्याने तिला घरातच छोटी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. गीतांजलीने ‘टेथिस’ हे स्मार्टफोनशी जोडलेले उपकरण तयार केले. यात कार्बन नॅनो-टय़ुब वापरून पाण्यातील शिशाचे प्रमाण मोजले जाते आणि त्याची नोंद स्मार्टफोनच्या ऍपद्वारे कळते. पाणी ‘सुरक्षित’, ‘थोडेसे प्रदूषित’ किंवा ‘प्रदूषित’ आहे याची माहिती टेथिस या ऍपद्वारे मिळते. या उपकरणामुळे गीतांजली पहिल्यांदा चर्चेत आली. गीतांजली 2017चा 3 संशोधकीय शिक्षण युवा शास्त्रज्ञ स्पर्धेच्या पुरस्काराची मानकरी ठरली. ‘टेथिस’सोबतच गीतांजलीने ‘किंडली’ हे क्रोमची सेवा असलेले ऍप तयार करून सायबर छळवणुकीला आळा घालण्याचे काम केले. गीतांजली स्पष्टपणे नमूद करते की, हे ऍप कोणत्याही प्रकारची शिक्षा करण्यासाठी नसून आपण वापरत असलेल्या धमकावणीच्या शब्दरचनेबद्दल पुन्हा विचार करण्याची संधी हे ऍप देते. तसेच पर्यायी शब्द सुचवते. एक मिनिटाच्या पुनर्विचार यामुळे फार मोठय़ा गुह्यांपासून व्यक्तीला वाचवता येते. त्याशिवाय अमली पदार्थांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘ओपियड’ हे उपकरण तिच्या नावे आहे.
विविध हिंदुस्थानी शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांनी यापूर्वीच गीतांजलीशी संपर्क साधला आणि संस्थेसोबत गीतांजलीला जोडून घेतले आहे. याबाबत बोलताना गीतांजली म्हणते की, ‘माझ्याशिवाय इतर युवा शास्त्रज्ञ आणि संशोधक यांचा शोध घेऊन त्यांच्याही पाठीमागे हिंदुस्थानी संस्थांनी असायला हवे.’ एवढे बोलूनच गीतांजली थांबत नाही तर विविध युवा शास्त्रज्ञ संमेलनांमध्ये जाऊन ती मार्गदर्शन करते. युवकांना संशोधक आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रोत्साहन देते, त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करते. बहुतांश हिंदुस्थानी मुलांप्रमाणेच गीतांजलीला हिंदी चित्रपट बघणे खूप आवडते. शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा हे तिचे आवडते कलाकार आहेत. ‘सुपरहीरो’ बद्दल तिच्या मनात एक वेगळे स्थान आहे. ते चित्रपट ती आवडीने बघते आणि तिलाही विज्ञानामध्ये सुपरहीरो बनायचे आहे. आपल्या संशोधनाची दखल एवढय़ा मोठय़ा व्यासपीठावर घेतली जाईल याची सुतराम जाणीव गीतांजलीला नव्हती, मात्र तिच्या शास्त्राrय संशोधनामुळे विज्ञानातील सुपरहीरो ठरण्याचे तिचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, यात तिळमात्र शंका नाही. ‘टाईम’च्या पुरस्कारानंतर प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘टाईम’ मॅगेझीनची एंजेलिना जोली यांनी झूमवर गीतांजलीची मुलाखत घेतली. अतिशय आनंदाने बोलताना गीतांजली सांगते की ‘आता आणखी उत्साहाने मी माझे संशोधन करू शकेन. मला या गोष्टीचा आनंद वाटतो ‘टाईम’सारख्या संस्थांनी नवीन पिढीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आहे. या सन्मानाबद्दल माझे आईवडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे आभार मानते. नवयुवक, कार्यकर्ते संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्यासाठी माझा पुरस्कार ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट ठरणार आहे.’ समस्त हिंदुस्थानींना अभिमान वाटावा, अशी ही घटना आहे.



























































