पर्यायी श्रमशक्ती

>> डॉ. ऋतू सारस्वत

श्रम बाजारावर पितृसत्ताक व्यवस्थेचा वरचष्मा असणे ही काही नवीन गोष्ट नाही. उलट हा तर व्यवस्थात्मक प्रयत्न असून शेकडो वर्षांपूर्वी हा वरचष्मा जाणीवपूर्वक प्रस्थापित करण्यात आला आणि अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचाच हेतू त्यामागे होता. स्त्रियांना स्वभावतःच घरगुती सिद्ध करणे किंवा घर हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याचे सांगणे हे स्वतंत्र विचाराचे आणि विज्ञाननिष्ठ समाजाचे द्योतक ठरत नाही. तथाकथित बुद्धिजीवी वर्गाकडूनही हेच विचार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो, हे दुर्दैवी असले तरी कटू सत्य आहे.

संकट कोणत्याही रूपात आले तरी त्याचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसतो. त्यांच्या गरजा, आरोग्य अशा सर्वच घटकांवर परिणाम होतो. विशेषतः त्यांच्या आर्थिक स्वावलंबनावर परिणाम होतो. स्त्रियांचे प्रमुख काम घरगुती जबाबदाऱया पार पाडणे हेच आहे. या मानसिकतेला स्थळकाळाच्या सीमा नाहीत. आपली प्रतिमा चांगली बनविण्यासाठी मानवाधिकारांच्या तथाकथित पहारेकऱ्यांनी अर्ध्या दुनियेला समांतर स्थान देण्याची भूमिका बजावली हे खरे; परंतु स्त्रिया शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा पुरुषांपेक्षा सदैव कमीच असतात, हे मिथक दृढ करण्याचाच प्रयत्न पुरुषसत्ताक व्यवस्थेने सातत्याने केला आणि याच विचारांतून स्त्रियांना नेहमी परिघाबाहेर ढकलले गेले हे वास्तव आहे. जगाच्या प्रत्येक भागात महिला अनौपचारिक अर्थव्यवस्थेशीच जोडल्या गेल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या ताज्या अहवालाने जे वास्तव समोर आणले आहे त्यानुसार कोविड-19 मुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या रोजगारावर अधिक प्रमाणात दुष्परिणाम झाला आहे. असे का? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. वस्तुतः जगातील सर्वच देशांमध्ये हा पूर्वग्रह पूर्वापार चालत आला आहे की, आर्थिक संकटाच्या काळात महिलांच्या तुलनेत नोकऱयांवर पुरुषांचा जास्त अधिकार आहे. समाजात रुजलेला हा विचार श्रमबाजारातून स्वतःच बाहेर पडण्यासाठी महिलांवर भावनात्मक दबाव निर्माण करतो.

लियोनेल टायगर आणि रॉबिन फॉक्स यांनी ‘द इम्पीरियल ऑनिमल’ या आपल्या पुस्तकात असे स्पष्ट केले आहे की, प्रत्येक व्यक्तीत हे पूर्वनिर्धारित तत्त्व जन्मजात असते आणि याच कारणामुळे प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या प्रकारे आचरण करतो. त्यांच्या दृष्टिकोनातून लैंगिक श्रमविभागणी जैविक किंवा वंशानुगत असते. स्त्राrवर पुरुषाचे असलेले अधिपत्य हे लिंगगत जैविक वैशिष्टय़ आहे. मानवी संस्कृतीच्या नावाखाली वास्तवाकडे पाठ फिरविण्याची पराकाष्ठा करून मानवी समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न सातत्याने होत राहिला आहे. याच विचारधारांचा परिणाम असा झाला की, आजही लिंगाधारित श्रमविभागणीचे समर्थन केले जाते आणि त्यामागे तर्क असा दिला जातो की, महिला पुरुषांच्या तुलनेत जैविकदृष्टय़ा दुर्बल आहेत आणि कठीण काम करण्यास त्या असमर्थ आहेत. परंतु हे सत्य आहे का? काही दिवसांपूर्वी काही संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील इंडीज पर्वतरांगांमध्ये नऊ हजार वर्षांपूर्वीच्या अशा एका ठिकाणाचा शोध लावला जिथे महिला शिकाऱयांचे दफन केले जात असे. या संशोधनाने अशा सर्व विचारधारांना आव्हान दिले आहे, ज्याअंतर्गत पुरुषापेक्षा स्त्री शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर या संशोधनातून पूर्वीच्या धारणा बदलल्या आहेत. पूर्वी शिकार करणे हे पुरुषाचे काम होते तर स्त्रिया भोजनासाठी अन्य पदार्थ गोळा करीत असत, असे मानले जात होते. ‘सायन्स ऍडव्हान्से’स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे प्राचीन समाजाच्या ‘हंटर गॅदरर सोसायटी’ या नावालाच आव्हान दिले आहे. हंटर म्हणजे शिकारी पुरुष आणि गॅदरर म्हणजे अन्न जमा करणाऱया महिला असा या नावाचा अर्थ आहे. संशोधकांचे म्हणणे असे आहे की, लिंगाधारित श्रमविभागणी जी आजतागायत सुरू आहे, तिला कोणताही शास्त्राrय आधार नाही. सत्तेवर नियंत्रणाचा प्रश्न जेव्हा उद्भवला त्या वेळेपासून ही विभागणी झाली. या सर्वांत अधिक पीडादायक वास्तव असे की, महिलांच्या क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित करणाऱया पुरुषसत्ताक व्यवस्थेने वेळ आणि गरज पडेल तेव्हा महिलांच्या क्षमता आणि श्रम पर्याय म्हणून वापरून घेतले आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या आधी म्हणजे अठराव्या शतकापर्यंत महिला केवळ वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे करीत असत. तिथे त्यांना कमी वेतन दिले जात असे आणि भयावह परिस्थितीत काम करावे लागत असे, परंतु पहिल्या महायुद्धाने महिलांना अशी सर्व कामे करण्याची संधी दिली जी पूर्वी केवळ पुरुषच करीत असत. अधिकांश निरोगी पुरुष सैन्यात सामील झाल्यामुळे त्यांची कामे करण्यासाठी युद्धकालीन अर्थव्यवस्था प्रवाही ठेवण्यासाठी कर्मचाऱयांची आवश्यकता होती. ज्या महिलांना सांगितले गेले होते की, घर हेच तुमचे कार्यक्षेत्र आहे त्या महिलांना गरजेमुळे अचानक त्यांच्यातील क्षमतांची माहिती करून देण्यात आली. वर्तमानपत्रांपासून भिंतींपर्यंत महिला श्रमशक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी भावनात्मक मजकूर लिहिले गेले. या आवाहनांना प्रतिसादही मिळाला. परिवहन, रुग्णालय, उद्योग एवढेच नव्हे तर युद्धासाठी शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या कारखान्यांतसुद्धा महिलांनी काम केले. ज्या परिस्थितीत या महिलांनी काम केले, ती धोकादायक होती. टीएनटी (स्फोटके तयार करणारे) कारखाने विशेषत्वाने अधिक धोकादायक होते. या कारखान्यांमधील धोकादायक रसायनांमुळे महिलांची त्वचा पिवळी पडत असे. त्यामुळे या महिलांना ‘कॅनरी’ असे नावही दिले गेले होते. महिलांची ताकद कमी असणे आणि त्यांना विशेष आरोग्य समस्या असण्याचा हवाला देणारी व्यवस्था 1919 मध्ये ‘द सेक्स डिसक्वालिफिकेशन’ अधिनियम मंजूर करून तयार करण्यात आली आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. या अधिवेशनात अशी तरतूद होती की, लिंगभेदामुळे महिलांना नोकरीवरून काढणे अवैध असेल. कारण पूर्वी तसे होत होते, परंतु त्याच वेळी पितृसत्ताक व्यवस्थेने आपले मूळ स्वरूप उघड करून ‘द रिस्टोरेशन ऑफ प्री वॉर प्रॅक्टिक ऍक्ट 1919’देखील संमत केला. या अधिनियमामुळे अधिकांश महिला श्रमिकांना त्यांची युद्धकाळातील नोकरी सोडण्यास भाग पाडण्यात आले. युद्धातून परतलेल्या पुरुषांना काम मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा हा त्यामागील हेतू होता. ज्या महिला पहिल्या महायुद्धात ‘बटालियन ऑफ डेथ’चा हिस्सा होत्या त्यांच्यावरच असा आरोप करण्यात आला की, महिलांमध्ये मारक क्षमता, आक्रमकता आणि हिंसक प्रवृत्तीचा अभाव असल्यामुळे लष्करासाठी त्यांची भूमिका उपयुक्त नाही. या विचारसरणीला विकृत नाही तर काय म्हणावे?

सर्व प्रकारचे आरोप झेलून महिला पुन्हा आपल्या मूळ भूमिकेत आल्या, परंतु मानवी कुटिलतेच्या इतिहासाची दुसऱया महायुद्धाच्या वेळी पुनरावृत्ती झाली. अमेरिकी लष्करानेही सैनिकांच्या वाहतुकीसाठी 27 महिला वैमानिकांची भरती केली. दुसरीकडे रशियानेही चार लाख महिलांना ‘रेड आर्मी गर्ल्स’ म्हणून लष्करात भर्ती केले. डॉक्टर आणि नर्स म्हणून काम पाहतानाच वेळ पडल्यास या महिलांनी लढाऊ भूमिका बजावणे अपेक्षित होते. ज्या क्षेत्रांवर केवळ पुरुषांचाच एकछत्री अंमल होता अशा अनेक भूमिका दुसऱया महायुद्धात सुमारे साठ लाख महिलांनी बजावल्या, परंतु युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपले पद सोडावे यासाठी त्यांच्यावर पुन्हा दबाव आणला गेला. 1944 मधील ‘यू. एस. वुमन ब्युरो’च्या सर्वेक्षणानुसार 84 टक्के महिला युद्धादरम्यान सुरू केलेले काम पुढे सुरू ठेवू इच्छित होत्या, परंतु काही काळापूर्वीच ज्या जाहिरात कंपन्या महिलांना कामाकडे आकर्षित करताना दिसत होत्या त्याच महिलांना त्यांचे पद सोडण्यासाठी प्रवृत्त करताना दिसल्या. युद्धावरून परतलेल्या पुरुषांना काम मिळावे हाच हेतू पुन्हा साध्य करण्यात आला. तीनचतुर्थांशपेक्षा अधिक महिलांनी त्यावेळी रोजगार सोडला.

हिंदुस्थानात नोटाबंदीनंतर रोजगारांच्या उपलब्धतेत जेव्हा घट झाली तेव्हाही पुरुषांसाठी जागा कायम राहाव्यात म्हणून महिलांनी आधी रोजगार सोडला. आधीपेक्षा कमी रोजगार उपलब्ध असण्याच्या स्थितीतसुद्धा अधिक अनुभवी पुरुषांचा रोजगार कायम ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले. जो समाज महिलांच्या श्रमांकडे पर्यायी श्रम म्हणून पाहतो आणि सामान्य परिस्थितीत त्यांना परिघाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो, अशा समाजाला काय म्हणावे? महिला श्रमशक्तीचा इतिहास आणि वर्तमान आजही एकाच ठिकाणी उभा असल्याचे दिसते. त्यावेळीही आणि आजही महिलांकडे अतिरिक्त श्रमशक्ती म्हणूनच पाहिले गेले आणि पाहिले जाते. या ना त्या कारणाने त्यांची प्रतिभा आणि इच्छाशक्ती यांचे दमन करून त्यांना श्रमबाजारातून बाहेर फेकण्यात येते.

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या