
>> मिनल सतीश सरकाळे
अनादी काळापासूनच आपल्या देशात गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. त्याचे अनेक दाखलेही दिले जातात. आजकाल ही परंपरा कमी होत चाललेली आहे. पण जोगेश्वरी (पूर्व) येथील श्रमिक विद्यालयात या परंपरेला आजही जतन केले जात आहे. गुरुशिष्याचे नाते दृढ व्हावे आणि गुरुबद्दल कृतज्ञतेची भावना सदोदित मनी फुलत राहावी या उद्देशाने गुरुपौर्णिमेचा भव्यदिव्य सोहळा या शाळेत आयोजित करण्यात येतो.
शाळेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण यांनी 1983 साली 45 विद्यार्थ्यांना घेऊन स्थापन केलेल्या या शाळेत तेव्हापासूनच गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यांच्या पश्चात शाळेच्या संचालिका स्मिता चव्हाण मॅडम (आदर्श शिक्षक राज्य पुरस्कृत) यांनी या सोहळ्याची प्रथा गेली 35 वर्षे समर्थपणे व अविरत चालू ठेवलेली आहे. आषाढी पौर्णिमेच्या म्हणजेच व्यास पौर्णिमेच्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. शाळेचे सर्व शिक्षक, पालक, हितचिंतक, शिशुवर्गापासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी या सोहळ्यात उपस्थित असतात. पूजेनंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. धार्मिक कीर्तनाचा अथवा प्रवचनाचा कार्यक्रम होतो. गुरुजनांची महती सांगणाऱया अथवा त्यांना गौरविणाऱया कवितांचे, लेखांचे वाचन केले जाते. गुरु विना सापडेना सोय धरावे ते पाय माऊलीचे।। या उक्तीचा प्रत्यय येतो. या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणाऱया सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचाही संचालिका पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात. या सोहळ्याकडे केवळ श्रद्धा, भक्ती म्हणूनच पाहिले जाते. आजच्या संगणकीय काळात गुरुशिष्याचे नाते चिरंतर व अक्षय राहावे आणि गुरूच्या प्रती कृतज्ञतेची भावना सतत तेवत राहावी या प्रयोजनाखातर हा सोहळा समर्थपणे साकारत आहेत.
(मुख्याध्यापिका, श्रमिक विद्यालय)































































