लेख – आनंदाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

एका मित्राला गेल्या काही दिवसांपासून फार एकटं, उदास वाटत होतं. कारण? ठाऊक नव्हतं. व्यावहारिक जगातल्या आणि प्रापंचिक जबाबदाऱया त्यानं यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या, परंतु तरीसुद्धा भरल्या घरात त्याला ‘एकटं’ का वाटावं? पण तसं झालं होतं खरं. तो नेहमीच्या डॉक्टर मित्राकडे गेला. ‘‘होतं असं कधी कधी, या ‘फेज’मधून लवकरच बाहेर पडशील,’’ पण तसं होईलसं वाटतच नाही. हा, तेवढं मात्र डोक्यातून काढून टाक.’’ आता ते कसं काढायचं? उत्तर आलं चांगली पुस्तकं वाच, आवडती गाणी ऐक वगैरे. अशी ‘फेज’ किंवा स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. कळत-नकळत आणि सकारण किंवा अकारण.

मग त्याला कोणी सांगितलं, ‘मेडिटेशन करा.’ केलं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. शिकवणारे म्हणाले, ‘मी तुम्हाला मन कोरं (ब्लँक) करायला सांगतोय, पण तुम्ही प्रतिसादच देत नाहीत.’’ ‘‘अहो, तोच तर प्रॉब्लेम आहे. आम्ही किती सांगतो त्याला. खरं तर हा उत्तम बासरी वाजवतो, पण गेले वर्षभर ती धूळ खात पडलीय.’ हा केविलवाणा हसला.

… आणि एके दिवशी गॅलरीत उभा असताना इमारतीतला एक छोटा मुलगा म्हणाला, ‘‘आजोबा, माझ्याशी क्रिकेट खेळता थोडा वेळ? कोण्णीच माझ्याशी खेळत नाही. सगळे लिंबू-टिंबू म्हणतात.’’ याला काय वाटलं कोणास ठाऊक! त्या छोटय़ाबरोबर अर्धा तास ‘क्रिकेट’ खेळून हा घरी आला आणि म्हणाला, ‘‘आज एकदम फ्रेश वाटतंय.’’ एक निरगाठ सुटली. आपोआप? नाही. त्याच्याच मनाने ती सोडवली. निमित्त त्या बालक्रिकेटचं.

बालकवी शब्दांतून निसर्गरूप होऊन जात. अवघी सृष्टी त्यांना मोहून टाकत असे. म्हणूनच त्यांनी ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ असं लिहिलं. चराचरात सर्वत्र भरलेला आनंद त्यांना खुणावत होता. स्वतःबरोबर नादमय कवितांची निर्मिती करून घेत होता. मग याच बालकवींनी ‘कोठूनि येते मला कळेना, उदासीनता ती हृदयाला, काय टोचते काही कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला’ असं का म्हटलं असावं? हा मानवी स्वभाव.

एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणं स्वाभाविक असतं. अगदी ‘यशसुद्धा कंटाळवाणं ठरू शकतं’ असं म्हटलं जातं. ही जर यशाची कथा तर अपयशाचं विचारायला नको. तेही अनेकदा सामोरं येतंच. कंटाळा ठीक. तो थोडय़ा वेळाने जातो. ‘चेंज इन जॉब इज रिक्रिएशन’ म्हणजे कामात, जागेत आणि रोजच्या रूटिनमध्ये थोडासा बदल केला तरी बरं वाटतं. घरातल्या फर्निचरची नव्याने रचना केली तरी तेच घर नवं वाटावं तसं. आयुष्यात अनेक ‘साध्या’ गोष्टी आनंद देत असतात. त्यासाठी प्रचंड काही ‘साध्य’ करावं लागत नाही.

तरुण वयात सभोवतालच्या वातावरणातच उत्साह भरलेला जाणवतो. इतरांना निरर्थक वाटणाऱया गप्पा तासन्तास रंगतात आणि अकारण हसू फुटतं. ‘ही नवथर पोरं म्हणजे…’ असा कटाक्ष कोणीतरी पोक्तवयीन टाकतो, पण त्यानेही तरुणपणी हेच केलेलं असतं. तरुणपण उत्साहाने भरलेलं असेल, बालपण निरागस आणि उल्हास निर्माण करणारं असेल तर ही ‘देवाघरची फुलं’ काही वेळा विचित्र का वागतात? अमेरिकेतल्या शाळकरी पोरांनी ‘काहीतरी’ अकारण गोळीबार करून अनेकांना घायाळ केल्याच्या बातम्या येतात तेव्हा त्या समाजासह सारं जग हादरतं.

मुलांचं बालपण हरवतंय? संपन्न देशांतसुद्धा? त्यावर उपाय काय म्हणून आता इंग्लंड-अमेरिकेतल्या पाठय़क्रमात ‘आनंद आणि समाधान’ किंवा ‘हॅपीनेस आणि माइन्डफुलनेस’ शिकवलं जाणार आहे. शाळकरी आणि कॉलेजच्या वयात निरागस आणि आनंदात कसं राहायचं हेसुद्धा शिकावं लागतं? लागत असेल बाबा.

यामध्ये मुलांना मानसिक आरोग्य कसं सांभाळावं हे हळूहळू शिकवलं जाईल. अगदी प्राथमिक शाळेपासून इंग्लंडमधल्या शाळांमध्ये ‘धडे’ दिले जातील. त्याचप्रमाणे तिथल्या विद्यापीठांमध्येही असेच प्रयोग सुरू आहेत. ‘येल’ विद्यापीठातल्या मानसशास्त्र आणि ‘गुड लाइफ क्लास’ला वाढता प्रतिसाद आहे. उद्याच्या जगाची जबाबदारी पेलण्यासाठी तयार होणारी ही मुलं. ती मनाने खंबीर असायलाच हवीत. सध्याच्या जगात भौतिक सुखं हाताशी आली आहेत तरी मनाची तगमग काही थांबत नाही. काय कारण असेल? वाढती भौतिक सुखांचा अनिर्बंध हव्यास असेल तर कालांतराने त्रासदायक ठरणारच, पण बालवयात काय? कदाचित वाढत्या प्रदूषणापासून ते बदललेल्या कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत असावा. अजून तरी आपल्याकडे हे लोण पोहोचलेलं नाही. निराशा आपल्या वाटय़ाला येते असं वाटतं तेव्हा आपण निराशेच्या वाटेने जातोय हे लक्षात घ्यावं असं म्हणतात. पूर्वी हे कोण शिकवायचं? आता तेही शिकवावं लागतंय. चांगलं आहे. उद्याची पिढी उत्साही झाली तर जग प्रसन्न होईल.