मुद्दा – हिंदुस्थानी भयपटांची शोकांतिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा पहिला भयपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’महल’ या चित्रपटाला येत्या 19ऑक्टोबरला सुमारे 73 वर्ष पूर्ण होतील. 1949 साली प्रदर्शित झालेल्या  या चित्रपटात अशोक कुमार, मधुबाला यांचा  सहज आणि सुंदर अभिनय तसेच ब्लॅक अँड व्हाईटमधील छायाचित्रण व चित्रपटाला साजेल अशा संगीतामुळे भयपटासाठी  खूप महत्त्वाचे असणारे गूढ वातावरण निर्माण झाले होते. ‘महल’ हा त्या वर्षाचा  सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे यश पाहता बॉलीवूडमध्ये भयपटांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात निर्माण  होण्याची अपेक्षा होती, पण असे काही झाले नाही. गेल्या 80-90 वर्षांत मोठे  कलाकार असणाऱ्या भयपटांची निर्मिती म्हणावी तशी झालीच नाही.

‘महल’च्या निर्मितीनंतर सुमारे 23 वर्षांनी म्हणजे 1972 साली सात रामसे भावांनी एकत्र येऊन ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली. महाबळेश्वरमध्ये अवघ्या 6 आठवडय़ांत चित्रीकरण केलेल्या या चित्रपटात सुरेंद्र कुमार, इम्तियाज खान (अभिनेता अमजद खानचा  भाऊ), शोभना हे नवीन चेहरे प्रमुख भूमिकेत होते. तसेच प्रेक्षकांत व वितरकांमध्ये चित्रपटाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी रामसेंनी सत्येंद्र कपूर, अनंत धुमाळ यांच्यासारखे  चरित्र अभिनेते तसेच  हेलन यांच्यावर चित्रित एका गाण्याचा समावेश केला होता. पुढे रामसे भावांनी विराना, तहखाना, बंद दरवाजा, पुराना मंदिर, हॉटेल, डाक बंगला  यांसारखे  अनेक बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेले  चित्रपट बनवले. त्यांनी 90 च्या दशकात हिंदुस्थानात पहिल्यादांच टीव्हीसाठी यशस्वी अशा ‘झी हॉरर शो’ची निर्मितीसुद्धा केली, पण रामसे बंधूंना चित्रपट उद्योगात म्हणावा तसा नावलौकिक मिळाला नाही. कलाकार व समीक्षकांनी रामसे बंधूंच्या चित्रपट तसेच सर्वसाधारणपणे सर्व भयपटांकडे दुय्यम दर्जाचे चित्रपट म्हणूनच पाहिले. रामसे भावांपैकी काहींना तर आपल्या आडनावाचा त्याग करावा लागला. कारण कोणताही मोठा कलाकार त्यांच्याबरोबर रामसे या आडनावासह काम करण्यास तयार नव्हता. अनेक मोठे  अभिनेते, जसे की शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, राकेश रोशन, रेखा, नवीन निश्चल, सारिका यांनी पण रामसे यांच्या चित्रपटांमध्ये काम केले, पण तेही या कलाकारांनी त्यांच्या पडत्या काळात केले होते.

1970 ते 1990 पर्यंत रामसे बंधूंच्या भयपटांना बऱ्यापैकी यश मिळत होते, पण 90च्या दशकात केबल टीव्हीच्या हिंदुस्थानातील उदयामुळे सर्वसामान्य  प्रेक्षकांना परदेशी भयपट  आणि इतर शैलीतील चित्रपट पाहण्याची संधी मोठय़ा प्रमाणावर मिळाली. 90 पुढील काही वर्षांत रामसे बंधूंचे चित्रपट हे सिनेमागृहातून गायब झाले. रामसेनंतर राम गोपाल वर्मा यांनी ‘रात’ (1992), ‘भूत’ (2002) यांसारख्या भयपटांची मोठय़ा कलाकारांसह निर्मिती केली, पण त्यानंतर हिंदुस्थानात नोंद व्हावी अशा काही कलाकृतींची निर्मिती झालीच नाही.

त्यामुळेच अनेक हिंदुस्थानी भयपटांच्या  रसिकांनी हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. हॉलिवूड स्टुडिओने अनेक वर्षे यशस्वी भयपटांची निर्माती केलेली आहे. प्रत्येक वर्षी हॉलिवूड स्टुडिओ हे ऑक्टोबरच्या आठवडय़ात ‘हॅलोविन’ या सणाच्या जवळपास  आपला  एक तरी भयपट प्रदर्शित व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न करत असतात. हॉलिवूड चित्रपट निर्मितीमध्ये हॉरर ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. कारण भयपटाच्या निर्मिती व वितरणाचा  खर्च कमी असतो. तसेच या चित्रपटांचा  प्रेक्षक वर्ग हा 18-30 वयोगटातील असतो, जो बहुतेक चित्रपटाचा  लक्ष्यित प्रेक्षक असतो  व हाच  वयोगट तिकिटे काढून चित्रपटगृहात सिनेमा पाहायला जातो. त्यामुळे हॉलिवूड स्टुडिओ भयपट हा वित्तीय कारणास्तव महत्त्वाचा ठरतो. तसेच हॉलिवूडमधील कलाकारांनी व समीक्षक यांनी कधीही भयपटांना कमी दर्जाचे म्हणून पाहिले नाही. हॉलिवूडच्या भयपटातून अनेक दिगज्ज कलाकारांनी आपल्या करीअरची सुरुवात केली. यामध्ये अभिनेता ब्रॅड पिट  (चित्रपट ‘कटिंग क्लास’ – 1989), लिओनार्डो डी कॅप्रियो (चित्रपट ‘क्रिटर्स 3’ -1991) जॉनी डेप (चित्रपट ‘नाइटमायर ऑन एल्म स्ट्रीट’ – 1984) यांचा समावेश आहे.  तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग (चित्रपट ‘डय़ुएल’ – 1971), एम. नाइट श्यामलन (चित्रपट ‘सिक्स्थ सेन्स’-1999)  जेम्स कॅमेरॉन (चित्रपट ‘पिरान्हा’ – 1982), रिडली स्कॉट (चित्रपट ‘एलियन’ -1979), फ्रान्सिस फोर्ड कोपोला (चित्रपट ‘डिमेंशिया 13’ – 1963), ऑलिव्हर स्टोन (चित्रपट ‘सीझर्स’- 1974) अशा  या आघाडीच्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांच्या कारकीर्दीचीही सुरुवात भयपटापासून केली.

बॉलीवूडने हॉलिवूडकडून भयपटांचे धडे घ्यायला हवेत. कोरोनानंतर सध्याच्या काळात बॉलीवूडच्या मोठय़ा अभिनेत्याचे बिग बजेट चित्रपट हे चित्रपटगृहात गर्दी खेचण्यात अयशस्वी होत आहेत. भयपट हे बॉलीवूडसाठी  कमी बजेटमध्ये  18 ते 30 वर्षे  वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे परत आणण्यासाठी हा एक चांगला मार्ग ठरू शकतो.

>> सीमा खंडागळे ([email protected])

(लेखिका या महाराष्ट्रात जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)