लेख – लडाखमध्ये हिंदुस्थानी सैन्य तयार!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

चीनमधील माध्यमे आणि हिंदुस्थानातील काही माध्यमे सध्या असा दुष्प्रचार करीत आहेत की, लडाख सीमेवर ऑक्टोबर महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरुवात होईल. त्यावेळी हिंदुस्थानी सैन्य आपल्या सैनिकांची काळजी घेऊ शकणार नाही. सैनिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे अवघड आहे. मात्र हा दुष्प्रचार अत्यंत चुकीचा आहे. किंबहुना हिंदुस्थानी लष्कर लडाखमधील सैनिकांची योग्य ती काळजी घेते आहे. हिवाळ्यात लढाई झाली तर हिंदुस्थानी लष्कर शत्रूला तोंड देण्यास पुरेपूर सज्ज आहे. या भागात लढाई झाली तर हिंदुस्थानी सैन्य चिनी सैन्याला उत्तर द्यायला तयार आहे.

हिंदुस्थानी सैन्याचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन किंवा लॉजिस्टिक हे चीनच्या तुलनेत अधिक चांगले आहे. लडाखचा हा भाग 14 हजार फ़ुट उंचीवर आहे. त्यामुळेच पुढील महिन्यापासून जेव्हा बर्फवृष्टीला सुरुवात होईल तेव्हा रस्ते बंद होतात. म्हणून सैन्याला लागणारा दारूगोळा, संरक्षण साहित्य, इंधन किंवा अन्नधान्य हे सर्व रस्ते बर्फाने बंद होण्याअगोदरच साठवणूक केली जाते. याला सैन्याच्या भाषेत ‘विंटर स्टॉकिंग’ म्हटले जाते. लडाखच्या सीमेवर जाण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक रस्ता जम्मू-बनिहाल खिंड-श्रीनगर-जोझिला खिंडीमधून द्रास-कारगीलमधून लेहमध्ये जातो. हा रस्ता वर्षातील सहा ते सात महिनेच वाहतुकीकरिता खुला असतो. नंतर प्रचंड बर्फवृष्टीमुळे हा रस्ता बंद असतो. यावेळी मात्र हा रस्ता अधिक वेळ खुला राहील. कारण बर्फ हटवणारी आधुनिक ब्लोवर डोझर्स आपल्याकडे आहेत. दुसरा रस्ता हिमाचल प्रदेश-खारदुंगला खिंडीतून लेहला पोहोचतो. तो देखील 5-6 महिने सुरू असतो .उर्वरित महिने तो बंद असतो. आता तिथे आपण अटलबिहारी वाजपेयी बोगदा खोदला आहे. त्यामुळे हा रस्तादेखील सात ते आठ महिने खुला राहण्याची शक्यता आहे.

रसद हवाईमार्गे

त्याशिवाय सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्याचे काम हवाईमार्गे वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनेही करता येते. त्यासाठी लेह, थोइस, कारगील या ठिकाणी विमानतळे आहेत. त्याव्यतिरिक्त आपल्याकडे अनेक प्रगत लँडिंग मैदाने (Advanced Landing Grounds), अनेक ठिकाणी हेलिपॅडस् बनवली आहेत. आता जितके सैन्य आधी सीमेवर तैनात असायचे त्यापेक्षा तिप्पट सैन्य तिथे तैनात केले आहे. ते चीनविरुद्ध आक्रमक कारवाईसाठी आहे. चीनने जर आक्रमण केले तर चीनवर प्रतिहल्ला करून आपण त्यांना नामोहरम करू शकतो. त्यांच्याकरितासुद्धा पूर्ण विंटर स्टॉकिंग’ करण्यात आले आहे. अतिउंच आणि अतिथंड वातावरणात सैनिकांना ईसीसी क्लोदिंग दिले आहे. म्हणजे अतिथंड वातावरणात लागणारे कपडे. हे कपडे सैनिकांना पुरवले गेले आहेत. अत्युच्च भागात राहणाऱया या सैनिकांना अत्यंत पौष्टिक असा आहार दिला जातो. कारण त्या भागात राहायचे तर सैनिकांना अत्यंत उच्च दर्जाचे जेवण द्यावे लागते. त्याचीही साठवणूक आधीच तिथे केलेली आहे. पिण्याच्या पाण्याचेही आव्हान असते. सैनिक ज्या भागात तैनात आहेत तिथे बोअरवेल खणलेली आहे. टय़ूबवेल आहेत. अनेक ठिकाणी वॉटर पॉईंटस तयार करून पाइपच्या मदतीने आपण सैनिकांना पाणी पोहोचवू शकतो. या भागात बर्फ पडत असल्याने त्यापासूनही पाणी तयार करता येते. ते पिण्यासाठी वापरता येत नाही पण इतर सर्व कामांसाठी ते वापरता येते. पिण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते. ती पद्धत आधीपासून आपण तयार केली आहे.

आपले सैन्य बंकर्समध्ये राहते, तिथे सेंट्रल हिटिंग सिस्टम तयार केली आहे. सौरऊर्जेच्या मदतीने त्यांचे बंकर्स, राहण्याची ठिकाणे ऊबदार राहावीत याची सोय केली आहे. गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. या भागात लढाई झाली तर बंकर्सच्या संरक्षणासाठी ओव्हरहेड प्रोटेक्शनही उत्तम दर्जाचे तयार करण्यात आलेले आहे. आपल्या सैनिकांना गरज भासल्यास दारूगोळा मोठय़ा प्रमाणात लागू शकतो. वीस पंचवीस दिवस युद्ध सुरू राहिले तरीही दारूगोळा कमी पडणार नाही एवढी साठवणूक तिथे करण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे, तर विशिष्ट संरक्षण दारूगोळा जसे जमिनी, हवाई प्रतिकारासाठी क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. या भागात आपले रणगाडे, चिलखती वाहने आहेत. त्यांना विशेष इंधन लागते, त्यांना वंगनही उच्च दर्जाचे लागते. या सर्व गोष्टींची त्या भागात साठवणूक केली आहे.

उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सुविधा

त्याशिवाय या भागातली वैद्यकीय सेवासुविधादेखील उच्च दर्जाची आहे. विविध ठिकाणी म्हणजे लेह, कारगीलसारख्या अनेक ठिकाणी उच्च दर्जाची सैनिकी रुग्णालये आहेत. उंच भागात ज्या प्रकारचे आजार, रोगराई पसरू शकते त्यासाठी लागणारी औषधे, विशिष्ट साहित्य तिथे आधीपासूनच साठविले आहे. हिंदुस्थानी लष्कराची ऑपरेशन थिएटर सीमेवर काम करतात.

या भागात चिनी विषाणूचा म्हणजेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी घेत आहोत. हिंदुस्थानी सैन्यावर चिनी विषाणूंचा काहीही दुष्परिणाम झालेला नाही. हिंदुस्थानी सैन्याने ज्या पद्धतीने त्याचा मुकाबला केला ते जगाने कसा मुकाबला केला पाहिजे होता यासाठी उत्तम उदाहरण आहे.

ड्रोनच्या माध्यमातून लष्कराचे लडाखमध्ये व्यवस्थापन अशक्य

‘ग्लोबल टाईम्स’ आणि इतर चिनी वर्तमानपत्रे ड्रोनच्या माध्यमातून चीन लडाख सीमेवर लष्कराला रसद पुरवेल असे सांगत आहे. जगात आतातरी अतिथंड भागामध्ये वापरले जाणारे ड्रोन तयार झालेले नाही, कारण अतिथंड भागात यांत्रिक क्षमता ही 50-60 टक्क्यांनी कमी होते. जे ड्रोन इतरत्र 100 किलो सामान वाहून नेऊ शकते ते या भागात मात्र 60 टक्क्यांपेक्षा कमी सामान घेऊन जाईल. या भागामध्ये अत्यंत वेगाने वारे वाहत असल्याने ड्रोन तिथे वापरणे शक्य नाही. जेव्हा तिथे बर्फाचे वादळ येते, तापमान ऋण असते तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून लष्कराचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. चीनने दोन तीन व्हिडीओज तयार केले त्यामध्ये ड्रोन सैनिकांना सामान घेऊन जात होते. परंतु हे व्हिडीओ मानसिक युद्धासाठी तयार केले गेले आहेत. चीनला ड्रोनच्या माध्यमातून सैनिकांना गरम अन्न पोहोचवणे लडाखसारख्या अत्युच्च डोंगराळ भागात शक्य नाही.

आपली प्रतिक्रिया द्या