
>> द्वारकानाथ संझगिरी
मला अलीकडे वाटतंय की, माझा पुनर्जन्म सुरू झालाय. ज्या प्रकारची वेगवान गोलंदाजी हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज हिंदुस्थानात टाकताना दिसतायत, ते पाहून माझी खात्री पटली की, हा दुसरा जन्म आहे. कारण ‘या जन्मी’ फिरकी गोलंदाजीशिवाय आणि खेळपट्टय़ांऐवजी आखाडे तयार केल्याशिवाय हिंदुस्थानात कधी जिंकता येईल असे वाटत नव्हतं.
हो, मला मान्य आहे की, बांगलादेश हा वाघासाठी प्रसिद्ध असला तरी त्यांचे फलंदाज गाडीच्या लाइटसमोर बावरलेले ससे वाटले.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीसुद्धा शिशुवर्गातली वाटली, पण डोळय़ाला दिसलेली मूलभूत गोलंदाजी चांगली वाटली. मग चेंडू पांढरा असो, लाल किंवा गुलाबी! हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीचा रंग ‘हेल्दी पिंक’ आहे. त्यांचा टप्पा, त्यांची दिशा, त्यांचा वेग, त्यांचा स्विंग, त्यांचा रिव्हर्स स्विंग, त्यांचा यॉर्कर, त्यांचा बाऊन्सर, त्यांचे बरेच काही चांगले वाटलं आणि समोर गलितगात्र झालेली फलंदाजी असल्यामुळे ती जास्त भेदक, अनप्लेयेबल वाटली.
गेल्या वर्षा-दोन वर्षांत हिंदुस्थानी संघ परदेशात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका हरला. विश्वचषक हरला, पण त्याला कारण आपली गोलंदाजी नव्हती. त्याला कारण फक्त अधूनमधून स्विंगसमोर गरबा करणारी आपली फलंदाजी होती. गोलंदाजी यशस्वी व्हायला धावांचं थोडं तरी चिलखत लागतंच. लॉईडच्या संघाची वेगवान गोलंदाजी ही क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात वेगवान गोलंदाजी! पण 1983च्या विश्वचषकात फलंदाजीला 180 धावा करणे जमलं नाही आणि विंडीज हरली.
आपल्या वेगवान गोलंदाजीचा ताफा आता ओसंडून वाहतोय. जसप्रीत बुमराह हा माझ्या मते सर्व फॉरमॅट्सचा विचार केला तर जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज, पण आज आहे कुणाला आठवण? कुठाय? बरा झाला का? कधी फिट होणार? वगैरे गोष्टींची दखलसुद्धा घेतली जात नाही. भुवनेश्वरकुमार हा आपला स्विंगचा प्रिन्स. तो कुठाय? हे कुणी पुसतंय? याला समृद्धी म्हणतात. मुख्य म्हणजे शमी, इशांत, यादव… तिघेही मॅच्युअर्ड वाटायला लागले आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. अर्थात जास्त सशक्त फलंदाजीसमोर त्यांची जास्त कठोर परीक्षा होईल.
पण हे सर्व पाहताना मला काही जुन्या मित्रांची आठवण येतेय.
आज रमाकांत देसाई तीच सर्व गुणवत्ता, तोच रनअप, तीच ऍक्शन, तोच बंपर घेऊन तरुण असायला हवा होता. बिचारा एकटा घाम गाळायचा. त्यामुळे लवकर संपला. आज त्याच्या त्या 71 विकेट्स 471 झाल्या असत्या, त्याने तिसाव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली नसती, बांगलादेशच्या आणखी चारपाच फलंदाजांनी गुलाबी चेंडू हेल्मेटवर घेतले असते.
आमचा वसंत रांजणे इतका गरीब की, 1962 साली फाटक्या बुटाने त्याने वेस्ट इंडीजमध्ये गोलंदाजी टाकली होती. 1984 साली ‘षटकार’ पाक्षिकातर्फे आम्ही त्याच्यासाठी पैसे जमवले होते. बेनिफिट मॅच खेळवली होती. आज तो खेळत असता तर त्याच्या पडक्या घराची जागा आलिशान बंगल्याने घेतली असती आणि मर्सिडीज दारात असती.
पांडुरंग साळगावकरला तरी पांडुरंगाने थोडं उशिरा जन्माला घालायला हवं होतं. कॉलेजात असताना रोज मालवणच्या समुद्राची वाळू तुडवत दहा किलोमीटर अंतर कापून प्रॅक्टिसला यायच्‘ाा. आज त्याच्या वेगाचं, गुणवत्तेचं, मेहनतीचं चीज झालं असतं.
पण ब्रह्मदेवाचे हिशेब वेगळे असतात. मात्र किमान कपिल देवला हिंदुस्थानात जन्माला घालायचा ब्रह्मदेवाने घेतलेला निर्णय हिंदुस्थानी क्रिकेटच्या पथ्यावर पडला. वेगवान गोलंदाजीच्या क्रांतीची तुतारी तिथे फुंकली गेली. कपिलच्या पावलावर मग इतर पावलं पडायला लागली. त्यातली काही पावलं मोठी होत गेली. उदा. प्रसाद, श्रीनाथ, झहीर खान वगैरे वगैरे, पण ही पावले मोठी होण्यात एमआरएफ ऍकॅडमी, डेनिस लिली, मुंबईत फ्रॅन्क टायसन वगैरेंचा हातभार लागला. एमआरएफने तर सातत्याने वेगवान गोलंदाज पुरवण्याचा प्रयत्न केला, पण आजची स्पर्धा वेगळीच आहे.
…आणि एक योगायोग पहा. कपिल देवच्या खास प्रेमामुळे बी. अरुण हा खेळाडू हिंदुस्थानसाठी खेळला. तो कसोटीत पहिला चेंडू टाकताना पार्श्वभागावर पडला. त्याचा स्टार्ट पाहून नेमके कळायचे नाही की, तो बस पकडायला धावतोय की चेंडू टाकायला? तो आज आपला गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक हा सर्वोत्तम खेळाडूच असायला हवा असे नाही, पण या गोलंदाजीच्या यशाचे सर्व क्रेडिट ‘बी. अरुण’कडे जातं, का? मला वाटते की, बऱयाच प्रमाणात ते आयपीएलकडे जात असावे. आयपीएलमुळे अनेक चांगले प्रशिक्षक हिंदुस्थानात आले, विविध दर्जेदार आंतरराष्ट्रीय गोलंदाज आले. त्यांचे संस्कारसुद्धा हिंदुस्थानी गोलंदाजीवर झाले. आपल्या वेगवान गोलंदाजांच्या प्रगतीत त्यांचा हात मोठा आहे.
आपला दर्जा वरचा आहे हे aसिद्ध करण्यासाठी आपल्या वेगवान गोलंदाजांना अधिक बलवान, आक्रमक फलंदाजीसमोर सातत्याने चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज सर्वश्रेष्ठ कधी झाले? जेव्हा जगात कुठेही त्यांच्यासाठी खेळपट्टी ही दुय्यम गोष्ट ठरली तेव्हा! हिंदुस्थानी गोलंदाजीचे उद्दिष्ट ते असायला हवे. एक गोष्ट मात्र नक्की आहे. हिंदुस्थानी संघ येतोय म्हटल्यावर परदेशी खेळपट्टीवर गवत ठेवले जायचे. आता असा ‘अविचार’ कुणी करणार नाही.
























































