
>>चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकीला कधी आपण नावे ठेवतो तसेच त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये कमी परतावा असल्यामुळे समाविष्ट करीत नाही हे आपणाला धोक्याचे ठरू शकते. कमी परतावा देणाऱ्या योजनादेखील आपल्यास जास्त परतावा देण्यास कशा मदत करतात हे आपण जाणून घेतलेच पाहिजे.
सर्वसाधारण कमी, मध्यम व लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीमध्ये बँकेच्या ठेवी, गव्हर्नमेंट बॉण्ड्स, डेटमधील गुंतवणूक, पारंपरिक विमा पॉलिसीतील गुंतवणूक, पीपीएफमधील गुंतवणूक शेअर मार्केटशी संलग्न नसल्यामुळे सुरक्षित मानली जाते.
यामध्येही काही गुंतवणुकीमध्ये व्रेडिट रिस्क, लिक्विडिटी रिस्क, इन्फ्लेशन रिस्क आणि इंटरेस्ट रिस्क अशा प्रकारे जोखमी असतात, पण यामध्ये शेअर मार्केटप्रमाणे कॅपिटल कमी होण्यापेक्षा कॅपिटल सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक असते. बँक सेव्हिंग्समध्ये, डेट गुंतवणुकीमध्ये तर लिक्विडिटी सहज उपलब्ध असते. सर्वसाधारण गव्हर्नमेंट रेपो रेटप्रमाणे व्याजाचा दर असतो. सरासरी जर पाहिली तर 6 टक्के व्याजाचा दर गुंतवणुकीवर दिलेला असतो. त्यामुळे कधी कधी गुंतवणूकदार या गुंतवणुकीकडे पाठ फिरवितात, पण हीच गुंतवणूक तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायला मदत करू शकते.
याउलट शेअर मार्केटमधील गुंतवणूक जास्त परतावा देते म्हणून लोकप्रिय आहे. या गुंतवणुकीमध्ये महागाईला टक्कर देण्याची क्षमता आहे, पण त्यात जोखीम आहे. समजा, तुमचे 100 टक्के पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले असतील व शेअर मार्केट पडलेले असेल तर दोनच पर्याय उपलब्ध राहतात. भांडवल तोडून लिक्विडिटी मिळविणे किंवा प्रॉफिटमध्ये लॉस करून लिक्विडिटी मिळविणे. याउलट ज्या गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीपैकी काही भाग जर सेफ गुंतवणुकीमध्ये गुंतविला असेल तर कमी पल्ल्याच्या सेफ गुंतवणुकीमधून कॅपिटल न तोडता पैसे काढून लिक्विडिटी निर्माण करून आपली गरज भागवली जाऊ शकते व शेअर मार्केटमधील गुंतवणूक तूर्तास न काढता भविष्यात जास्त परतावा मिळविण्यासाठी ठेवता येऊ शकते. या काळात शेअर मार्केट तर सोडा, पण ज्यांची फक्त स्थावर मालमत्तेत गुंतवणूक झाली तेदेखील श्रीमंत असूनदेखील हवालदिल होते.
शेअर मार्केटमध्ये खूप छान ब्रीदवाक्य आहे… असंयमी गुंतवणूकदार हळूहळू आपली संपत्ती संयमी गुंतवणूकदारांना प्रदान करतात. ज्या गुंतवणूकदारांकडे कमी परतावा देणाऱ्या पण सुरक्षित गुंतवणुका आहेत ते गुंतवणूकदार संयमी राहतात व भविष्यात शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीवर प्रॉफिट कमावतात. याउलट सर्व पैसे शेअर मार्केटमधले गुंतवणूकदार नेहमी असंयमी राहतात व संयमी गुंतवणूकदारांना श्रीमंत व्हायला मदत करतात.
म्हणूनच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुका आपल्याला संयम शिकवितात व शेअर मार्केटमधील जोखीम असलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळवायला मदत करतात.



























































