ठसा – प्रा. ज. रा. फणसळकर , मुकुंदराज गोडबोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

ज्येष्ठ नाटककार प्रा. ज.रा.फणसळकर यांचे नुकतेच  निधन झालं.1970 ते 90च्या  दशकात कामगार कल्याण नाटय़ स्पर्धेत तसेच महाराष्ट्र  राज्य नाटय़ स्पर्धेत प्रा.  जनार्दन रामचंद्र फणसळकर यांच्या नाटकांचे एक युग होते. ‘रंगरेखा’ या नागपूर-विदर्भातील त्यावेळच्या  ख्यातनाम नाटय़ संस्थेसाठी त्यांनी बरीच नाटके लिहिली. ‘रंगरेखा’चे ते संस्थापक सदस्यदेखील होते. नागपूर-विदर्भाच्या रंगभूमीला व नाटय़लेखनाला प्रा. ज.रा.फणसळकर यांनी ऊर्जितावस्था प्रदान करत दर्जाही प्राप्त करून दिला होता. गणिताचे प्राध्यापक राहिलेल्या प्रा. ज.रा. फणसळकरांचे ‘पोहा चाल्ला महादेवा!’,   ‘अरे मानसा मानसा’, ‘अमिबाला उःशाप हवा’, ‘आकाश माझे निळे’,‘धिस इज फॉर रियल’, ‘उद्या….उद्या…तुझ्यामध्ये’, ‘आम्ही श्रींचे चाकर’ ही त्यांची  नाटके गाजली. अनेक आकाशवाणी श्रुतिका व राष्ट्रीय स्तरावरील नाटके अशी सुमारे सोळा दोन अंकी नाटके आणि ‘एक स्वप्न वांझोटे’, ‘नवा संदर्भ’ अशा एकूण सहा एकांकिका असे त्यांचे नाटय़लेखन आहे. ‘माणसाचा केला देव’ हे नाटक तर मुळातच प्रा. ज.रा.फणसळकर यांनी   त्यावेळच्या गाजलेल्या ललित कला भारतीच्या प्रख्यात पथनाटय़ चळवळीसाठी लिहिलेले नाटक होते. ते रस्त्यावरच्या नाटय़ चळवळीत  रायपूर ते विदर्भ, महाराष्ट्रात सर्वत्र केले गेलेले प्रमुख नाटक ठरले होते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी त्या चळवळीसाठी त्यावेळी 5 हजार रुपये अनुदानदेखील दिलेले होते. प्रा. ज.रा.फणसळकर हे सोबतच अतिशय विनम्र गृहस्थ आणि विद्वत्तेला शोभणारा विनय बाळगून असत. त्यांच्या जाण्याने नागपूर-विदर्भातील नाटय़लेखन आणि रंगभूमी क्षेत्रातील एक युग संपले अशीच भावना व्यक्त झाली.

मुकुंदराज गोडबोले

ज्येष्ठ गायक पं.मुकुंदराज गोडबोले  यांचे  पुण्यात नुकतेच निधन झाले. पं.मुकुंदराज गोडबोले  हे सांगली संस्थानचे राजगवई पं.दि.रा.गोडबोले  यांचे चिरंजीव.  मराठी रंगभूमीवरील सुविख्यात गायक नट उदयराज गोडबोले यांचे धाकटे बंधू. त्यामुळे घराण्यातूनच संगीताचा वारसा त्यांना लाभला होता. ‘संगीत अलंकार’ असलेल्या मुकुंदराज गोडबोले यांनी पुणे विद्यापीठाची ‘ डिप्लोमा इन म्युझिक’ ही पदविका प्राप्त केली होती. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट स्वरराज छोटा गंधर्व यांना गुरुस्थानी मानून ‘एकलव्या’प्रमाणे त्यांची गायकी आत्मसात करून स्वतःच्या कार्यक्रमातील नाटय़गीतातून ते त्यांच्या गायकीचे  दर्शन घडवत असत. नुकताच त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता. कृषी खात्यातील 25 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी संगीत सेवेस वाहून घेतले होते. त्यांचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही अनेक कार्यक्रम झाले असून अनेक पुरस्कारांनी  ते सन्मानित आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे ते उच्च श्रेणीचे कलाकार असून काही वर्षे आकाशवाणीच्या ऑडिशन बोर्डावर परीक्षक म्हणून काम केलं आहे.   त्यांच्या निधनाने अतिशय प्रेमळ, वक्तशीर, काटेकोर, स्वछतेचे भोत्ते असलेल्या सहज, गोड  असलेल्या एका गायकास मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक गायक-वादक कलाकारांच्या सादरीकरणाचा ते स्वतःही अभ्यास करत होते आणि त्याबाबतचा आग्रह शिष्यांनाही करीत. त्यांना गायनाचा कुठलाही प्रकार गौण नव्हता..प्रत्येकातून मधुकर वृत्तीने चांगलं ते टिपण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. नुकतेच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम कौतुकास पात्र ठरला होता.