ठसा – जहीर आलम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश उपदेव

नागपूरच्या ऐतिहासिक, बंद पडलेल्या एम्प्रेस मिलमध्ये काम करणाऱ्या जहीर आलम यांच्या एका गाण्याने 90 च्या काळात देशाला वेड लावले होते. ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे आलम यांचे ते गाणे. त्यावेळी महाराष्ट्रात नव्हे, तर हिंदुस्थानातील प्रत्येक गावखेडय़ातील पान टपरी, हॉटेलमध्ये वाजवले जायचे. या गाण्याने युवक वर्ग बेभान झाला होता. हे गाणे ज्या कंपनीने अल्बममध्ये घेतले, त्यांनी लाखो रुपयांचा गल्ला मिळविला, पण जहीर आलम मात्र कफल्लक राहिले. त्या गाण्याचे गीतकार उपेक्षित आणि आर्थिक विवंचनेत राहिले. मोमीनपुरा परिसरातील एका छोट्या, लहानशा घरात राहणाऱ्या जहीरभाई यांची नागपूरमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना माहिती नव्हती. देशात गाजलेल्या गीताचे लेखक राज्याच्या उपराजधानीत साधेपणाने आणि संघर्षात जगत होते. ‘तुम तो ठहरे परदेसी’ या त्यांच्या गाण्याने गायक अल्ताफ राजा एका रात्रीत सुपरस्टार झाला. मात्र हे गीत तयार करणारे जहीर आलम प्रकाशझोतात आले नाहीत. हे गाणे पहिले नागपूरच्या प्रसिद्ध शायर, कव्वाली गायक किरण पाटणकर गायच्या. त्यानंतर हे गाणे अल्ताफ राजाने गायले. चाहत्यांनी हे गाणे डोक्यावर घेतले. या गाण्यामुळे लाखो रुपयांचा गल्ला संबंधित कंपनीने मिळवला. मात्र जहीरभाईंची किरकोळ मानधनावर बोळवण करण्यात आली. जहीरभाईंचे हे गाणे नामवंत गीतकाराने आपल्या नावावर खपवले. जहीरभाई ज्या गिरणीत काम करीत होते, ती गिरणी बंद पडल्यानंतर त्यांच्या वाट्याला हलाखीचे जीवन आले. त्यांची गरिबी दूर होऊ शकली नाही. त्या गरिबीत आणि उपेक्षेतच दोन दिवसांपूर्वी जहीरभाई सर्वांना कायमचा अलविदा केला. ‘खामोश मिजाजी तुम्हे जिने ना देगी, इस दौर मे जिना है तो कोहराम मचा दो…’ ही शायरी गात नागपूरकरांनी त्यांना आदरांजली वाहिली.