
>> वैश्विक
हबल दुर्बिण पाव शतकापूर्वी अवकाशात गेली तेव्हा मोठा विस्मय वाढला होता. आता थेट अवकाशात जाऊनच ग्रह-ताऱयांचे आणि दीर्घिका इत्यादींचे स्वच्छ फोटो निघणार या कल्पनेने केवळ संशोधकच नव्हे तर सामान्य खगोलप्रेमीही सुखावले आणि हबलने अनेक अडचणी पार करीत अक्षरशः हजारो अवकाशीय फोटो पाठवले. त्यानंतर ‘चंद्रा’ एक्स-रे दुर्बिण अवकाशात पोहोचली. अवकाशस्थ ‘तिसऱया’ डोळय़ांची संख्या उत्तरोत्तर वाढू लागली.
आता जेम्स वेब या अवकाशी दुर्बिणीने छायाचित्रे पाठवायला सुरुवात केली आहे. या दुर्बिणीची फोटो काढण्याची क्षमता हबलपेक्षा अधिक चांगली असल्याने हे फोटो अतिशय सुस्पष्ट तर आहेतच, पण पूर्वी ज्या अवकाशस्थ वस्तूंचे धुसर फोटो मिळाले होते, त्यांच्या अप्रतिम इमेजेस आता पाहायला मिळतात. थोडक्यात, हबलच्या ‘नजरे’ला फेन्ट वाटलेले अवकाशातील काही भाग जेम्स वेबने ठळकपणे समोर आणले आहेत.
या दुर्बिणीला बरीच वर्षे अवकाशस्थ होऊन बरंच काही काम करायचंय. 25 डिसेंबर 2021 रोजी ही दुर्बिण पृथ्वीवरून अवकाशात झेपावली. फ्रेंच गियाना येथून हे उड्डाण झालं. गेल्या जुलै महिन्याच्या 22 तारखेला ही दुर्बिण पूर्णपणे कार्यान्वित झाली. साडेसहा मीटर व्यासाचा आरसा असलेल्या या दुर्बिणीचं अपेक्षित वय वीस वर्षांचं आहे. तेवढा काळ ती निश्चित कार्यरत राहील हे हबल, चंद्रा वगैरे दुर्बिणींच्या अनुभवावरून म्हणायला हरकत नाही.
या दुर्बिणीचं वस्तुमान (मास) हबलच्या निम्मं आहे आणि ‘इन्फ्रा रेड’(अवरक्त) किरणांबरोबरच दृश्य प्रकाशही ती पाहू शकते. हबलच्या फोटोंपेक्षा 100 पट अधिक सुस्पष्ट अशी छायाचित्रे घेण्याची ‘जेम्स वेब’ची क्षमता आहे. ‘नासा’मध्ये 1961 ते 68 या मर्क्युरी, जेमिनी आणि अपोलो यानं सोडण्याच्या काळात अॅडमिनिस्ट्रेटर असलेल्या ‘जेम्स वेब’ यांचं नाव त्यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीला देण्यात आलंय.
या दुर्बिणीला सूर्यासह आपल्या ग्रहमालेतील सर्व ग्रहांचे निरीक्षण अगदी 85 अंशाच्या कोनातून करता येणार असल्याने ते फोटो या सर्व अवकाशस्थ वस्तूंचे बारकावे नोंदणारे ठरणार आहे. आपली ग्रहमाला संपते तेथील किपर बेल्टमधल्या सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण ‘जेम्स वेब’ करू शकेल. याशिवाय पूर्वी न ठरवलेल्या अवकाशातील गोष्टींचं केवळ 48 तासांच्या सूचनेनंतर निरीक्षण करण्याची यंत्रणा त्यात आहे. ही दुर्बिण सूर्य-पृथ्वी यांच्या दोन क्रमांकाच्या, आपल्यापासून 15,00,000 इतके किलोमीटर दूरवरून फिरत असल्याने सूर्य, सर्व ग्रह आणि त्याही पलीकडचं अवकाश तिच्या नजरेच्या टप्प्यात येणार आहे.
विश्वनिर्मितीच्या काळात निर्माण झालेल्या पहिल्या दीर्घिका (गॅलेक्सी) तारे वगैरेंचा मागोवा ‘जेम्स वेब’ घेऊ शकेल. दुर्बिणीभोवती अतिउष्णतेपासून रक्षण करणारं ‘केप्टॉन-इ’ नावाच्या फिल्मचं पाच पदरी ‘सनशिल्ड’ (सूर्यकवच) आहे.आता या दुर्बिणीच्या नुकत्याच सुरू झालेल्या कामगिरीबद्दल आणि तिने पाठविलेल्या ‘कार्टव्हील गॅलेक्सी’ (बैलगाडीच्या चाकासारखी दिसणारी दीर्घिका) या वेगळय़ाच प्रकारच्या एका गॅलेक्सीविषयी जाणून घेऊन या दीर्घिकेचा शोध फ्रीट्झ झ्विकी यांनी 1941 मध्येच लावला. त्यावेळीच त्यांना या दीर्घिकेची रचना गुंतागुंतीची आहे हे लक्षात आलं होतं. या दीर्घिकेचा व्यास 144 ते 150 हजार प्रकाशवर्षे इतका आहे. म्हणजे आपली शेजारची दीर्घिका ‘अॅन्ड्रोमीडा’ (देवयानी) पेक्षा थोडा कमी, पण या दीर्घिकेची रचना खरोखरच बैलगाडीच्या चाकासारखी दिसते हे फोटो पाहिल्यावर लक्षात येईल. तो नेटवर आहे.
आपल्या आकाशगंगा दीर्घिकेसारखेच सायकलच्या तारांसारखे ‘स्पोक’ किंवा ‘आर्म’ या गॅलेक्सीतही आहेत. मात्र वेगळेपण असं की, या दीर्घिकेच्या गाभ्याजवळच्या वर्तुळात एक पिवळसर रंगाचं कडं (रिंग) आहे तर टोकाला निळी रिंग आढळते. काही अब्ज वर्षांपूर्वी एक छोटी दीर्घिका ‘कार्टव्हील’जवळून जात असताना टक्कर होऊन ही उलथापालथ झाली असावी. त्या टकरीने या दीर्घिकेतील वायू (गॅस) आणि धूळ (कॉस्मिक डस्ट) यावर प्रचंड दाब आला व त्यातून गाभ्याजवळचा एक तारा फुटून त्याची पिवळी रिंग तयार झाली. त्यावेळी जे वस्तुमान दूर फेकलं गेलं त्याची टोकाला निळी रिंग निर्माण झाली. आता याचं तपशीलवार वर्णन क्लिष्ट होईल. ते ठाऊक नसलं तरी विश्वातील नवनवे, आतापर्यंत गूढ, अगम्य वाटणारे भाग आपल्या नजरेसमोर आणण्याचं काम ‘जेन्स वेब’सारख्या अवकाश दुर्बिणी करतात हे माहीत असणं महत्त्वाचं. त्यातूनच वैश्विक वैज्ञानिक जाणीव निर्माण होऊ शकेल.




























































