दखल- धनवृद्धीसाठी दिशादर्शक

>> विदुला टोकेकर

सेकंड इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम हे आजच्या काळात कळीचे शब्द झाले आहेत. मग स्थावर मालमत्ता घेऊन भाडय़ाने द्यावी, की शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून बक्कळ पैसा कमवावा, की सोनंच घेऊन साठवून हवं तेव्हा विकून नफा कमवावा, की आणखी काही करावं, याबद्दल अभ्यास कमी आणि सल्ले जास्त अशा अवस्थेत सापडलेल्यांना वस्तुनिष्ठ दिशा दाखवणाऱया पुस्तकाची अल्पावधीत आठवी आवृत्ती निघाली हे फार महत्त्वाचं आहे.

या पुस्तकाने वाचकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मला आवडलेली गोष्ट म्हणजे या पुस्तकाची शैली. कितीही म्हटलं तरी गुंतवणूक म्हटलं की आकडे, फंडामेंटल्स, गुणोत्तरं, बाजाराचा कल, भाकिते, डेरिव्हेटिव्ज वगैरे-वगैरे क्लिष्ट गोष्टी त्यात घुसणारच, पण या पुस्तकाचे हिरो अवीकाका आणि तरुण गुंतवणूकदार मंडळी यांच्या संवादांत वाचक पूर्णपणे ओढला जातो. वाचकांच्या मनात असलेल्या सर्व एफएक्यूजचा परामर्श अतिशय खुबीने आणि हसतखेळत या पुस्तकात घेतला आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वीची पावले, म्युच्युअल फंड व त्याचे प्रकार, म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी, म्युच्युअल फंडाविषयी, म्युच्युअल फंड अशा पाच भागांतील 21 प्रकरणांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल सर्व काही अतिशय नेमकेपणाने व नेटकेपणाने सांगितले आहे. शेवटी सहाव्या परिशिष्टाच्या भागात लहान, पण विशेष महत्त्वाच्या विषयांवर एकूण 9 परिशिष्टे जोडली आहेत.

आर्थिक स्वातंत्र्य असले तर मनाजोगत्या गोष्टी करता येतात आणि सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर ते मिळवणे प्रत्येकाला शक्य आहे. त्यासाठी लागणारे अर्थनियोजन कसे करावे आणि म्युच्युअल फंडाचे सोपे, तरीही परिणामकारक साधन वापरून आपली आर्थिक स्वप्नं कशी साकार करावीत, हे या पुस्तकातून समजते. बहुविध गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ञ लेखकाने सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक गुंतवणुकीचा वाटाडय़ा बनून तुमची वाट सुकर करेल.

पहिला पगार मिळवणाऱया तरुणापासून, पहिलं मूल शाळेत घालणाऱया नवपालकापासून ते ‘श्रमसाफल्य’ मिळवणाऱया निवृत्तापर्यंत सर्वांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड

लेखक ः अरविंद परांजपे   प्रकाशक ः साकेत प्रकाशन

पृष्ठसंख्या ः 248   किंमत ः 299 रु.