लेख : वाचनालये साहित्य संवादाची केंद्रे व्हावीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप देशपांडे ([email protected])

प्रत्येक तालुक्यात एक ग्रंथालय साहित्य संवादाचे केंद्र मानून पुस्तकांचं गाव निर्माण व्हायला हवे, जिथे वाचन आणि पुस्तकांचं खरेदी केंद्र आणि साहित्यिक कार्यक्रमाचा अड्डा, कट्टा असेल. शासनाने त्यात सहभागी व्हावे. जशी महाराष्ट्र शासनाने सातारा जिह्यात महाबळेश्वरजवळ ‘भिलार’ या ‘पुस्तकाच्या गावाची’ निर्मिती केली. पुस्तकाचे गाव वसविणे ही संकल्पना चांगली आहे, पण असे एक गाव वसवून चालणार नाही. पुस्तकांची अशी अनेक गावे महाराष्ट्रात निर्माण व्हायला हवीत.

‘वाचन संस्कृती’चा विषय चर्चेत आल्यानंतर अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात. मग हल्ली एकूणच वाचनाची आवड कमी झालीय का? नसेल तर कुठल्या प्रकारचे वाचन होतेय? कुठल्या माध्यमातून होतेय? म्हणजे वाचनात कुठल्या माध्यमाचा वापर जास्त होतोय. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसाधारण पुरुष व महिला वाचक, पन्नासच्या आतील, त्यावरील असे भाग करता येतील. ते काय वाचतात? कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित, विज्ञानविषयक, ऐतिहासिक, संतसाहित्य, प्रवासवर्णन, बालसाहित्य, मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्र… अशा अनेकविध प्रकारचा विचार त्यात येतो.

गेल्या काही वर्षांत मोबाईल, दूरचित्रवाणी, संगणक, त्यावरील गेम अशा साधनांच्या वाढलेल्या वापरामुळे वाचनाचा वेळ फार मोठय़ा प्रमाणात विभागला गेला हे सत्य नाकारून चालणार नाही. मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सऍप, यूटय़ूबमध्ये जास्त वेळ खर्च होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. ई-बुक वाचणारा वर्ग आहे, पण तसा तो जास्त नाही. सीमितच आहे. त्यामुळे साधारणपणे 16 ते 30/35 या वयोगटातील वाचनाची आवड तशी कमी झाल्याचेच दिसून येते. काही वर्षांपूर्वी नॅशनल बुक ट्रस्टच्या सर्वेक्षणात 46 लाख युवकांत फक्त 9 लाख युवकच वाचन करत असल्याचे निदर्शनास आले होते. आता तर त्या परिस्थितीत अजूनही बदल झाला असावा.

वाचनसमृद्धीसाठी अनेकविध प्रकारे, वेगवेगळ्या पातळीवरील प्रयत्न केले जातात, सर्वेक्षण केले जाते व योजनांची आखणी केली जाते. ग्रंथालयांना अनुदानही दिले जाते. अनेक ग्रंथालये सक्षम आहेत, स्वतःची इमारत आहे, मंगल कार्यालये आहेत, व्यापारी संकुल आहेत, परंतु वाचनालयांच्या कार्यकारी मंडळाच्या निक्रियतेमुळे मुळातच त्यांना वाचन, साहित्यविषयी गोडी नसल्यामुळे अशी ग्रंथालये ही साहित्यिक अड्डे होऊ शकली नाहीत. राजकारणाचा शिरकाव होऊन राजकीय अड्डे मात्र झाले आहेत. वाचनालयाच्या निवडणुका समोर ठेवून कोणाला कोणत्या प्रकारचे सभासदत्व द्यायचे इथपासून निर्णय घेतले जातात ही शोकांतिका आहे.

खरं तर आज प्रत्येक तालुका आणि जवळपास 70 ते 80 टक्के ग्रामीण भागात ग्रंथालये आहेत. त्यांना ग्रामविकास निधीतून सहाय्य मिळत असते, पण त्याचा फायदा घेतला जात नाही. ग्रामीण भागात तर वाचनाची फारच दुरवस्था आहे. अनेक ग्रंथालयांत पुस्तके पडून आहेत. कारण ती ग्रंथालये बंदच असतात. ज्याच्याकडे काम सोपवलेले असते तेच उदासीन असतात. वेळ मिळेल तेव्हा उघडतात. त्यामुळेच वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत.
शाळा, कॉलेजमधून पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना इतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. चरित्रे, आत्मचरित्रे, विज्ञान आणि अनेक प्रेरणादायी पुस्तकांची ओळख करून द्यायला हवी. शाळा, महाविद्यालयांतही पुस्तक प्रदर्शने भरवली पाहिजेत. साहित्यिकांची ओळख, त्यांच्याशी संवाद, कार्यक्रम आयोजनातून विद्यार्थ्यांची आवड वृद्धिंगत करायला हवी. वेळोवेळी विद्यार्थ्यांना कुठली पुस्तके वाचावीत याचे मार्गदर्शन करायला हवे. तरच हे शक्य आहे. खूप साऱ्या पुस्तकांनी ही वाचनालये समृद्ध असतात. ‘वाचाल तर वाचाल’, ‘वाचनाने मन समृद्ध होते’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे’ अशी वाचनाची महती सांगणारी वाक्ये लावलेली दिसतात. त्याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही.

एकूणच विद्यार्थ्यांचा वाचनाचा कल कमी झाल्याचे जाणवते. आज शहरी भागात जसे नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सा.वा.ना., पुण्यात पुस्तक पेठ, अक्षरधारा, म.सा.प., मुंबईत ग्रंथाली, मराठी ग्रंथसंग्रहालय, जळगावला व. वा. वाचनालय, ठाणे, नागपूर आणि बऱ्याच जिह्यांच्या ठिकाणी, साहित्यिक कार्यक्रमाची केंद्रे आहेत. तिथे पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक कार्यक्रम नेहमी होत असतात. बदलापूरचे पाच हजार सभासद असलेले ‘ग्रंथसखा’ वाचनालय एक उत्तम उदाहरण आहे.

तालुकापातळीवर पुस्तकाची अशी दुकाने जवळपास नाहीतच. क्वचित अपवाद असावा. त्यामुळेच वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत. ग्रंथालय आहेत, पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती त्या त्या ठिकाणच्या कार्यकारी मंडळाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. काही वर्षांपूर्वी अक्षरधाराने बऱ्याच ठिकाणी पुस्तक प्रदर्शने आयोजित केली होती. तसेच ग्रंथालीनेही महाराष्ट्रात वाचक चळवळ राबवली. अनेक केंद्रे उघडून वाचकांपर्यंत पुस्तके नेली. ‘मराठी वाचा-मराठी वाचवा!’, ‘गोड बोला मराठीत’चा संदेश दिला. निम्म्या किमतीत पुस्तके दिली. अजूनही अक्षरधारा, ग्रंथालीचे कार्य सुरू आहे. पुण्यात चपराक प्रकाशनाने नवीनांना लिहिते करून वर्षात 365 पुस्तकांच्या प्रकाशनाचा संकल्प केला आहे. अनेक वृत्तपत्रे रविवारच्या वाचनीय साहित्य पुरवण्या काढतात. त्यात अनेक उपक्रम, पुस्तकांचा परिचय होतो. वाचनीय साहित्य त्यात मिळते. पुस्तक प्रकाशक ‘लेखक आपल्या भेटीला’सारखे उपक्रम करतात.

प्रत्येक तालुक्यात एक ग्रंथालय साहित्य संवादाचे केंद्र मानून पुस्तकांचं गाव निर्माण व्हायला हवे, जिथे वाचन आणि पुस्तकांचं खरेदी केंद्र आणि साहित्यिक कार्यक्रमाचा अड्डा, कट्टा असेल. शासनाने त्यात सहभागी व्हावे. जशी महाराष्ट्र शासनाने सातारा जिह्यात महाबळेश्वरजवळ ‘भिलार’ या ‘पुस्तकाच्या गावाची’ निर्मिती केली. पुस्तकाचे गाव वसविणे ही संकल्पना चांगली आहे, पण असे एक गाव वसवून चालणार नाही. पुस्तकांची अशी अनेक गावे महाराष्ट्रात निर्माण व्हायला हवीत. या गावांना भेट देऊन, तिथे जाऊन चांगल्या पुस्तकांचे वाचन, पुस्तक खरेदी हा हेतू साध्य होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते पुस्तकांचंच गाव व्हायला हवे, त्याचं पर्यटनस्थळ मात्र व्हायला नको हा विचार पुस्तकाचे गाव निर्माण करतेवेळी करायला हवा. राज्य सरकारने पुस्तकांची अशी अनेक गावे निर्माण करण्याचा जरूर विचार करावा अशी अपेक्षा आहे.