
>> डॉ. मकरंद चव्हाण (पशुवैद्य चिकित्सक)
आपल्या घरातील छोटेसे पेटस्… आपण हेच त्यांचं जग. लॉकडाऊनच्या काळात या मुक्या जीवांवर खूप अन्याय केला गेला. पण आता अनलॉक काळात ही चूक सुधारा.
लॉकडाऊन काळात बऱयाच जणांनी आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्यांकडून कोरोनाचा संसर्ग होतो या भीतीपोटी आणि गैरसमजापोटी सोडून दिले होते. त्यामुळे बिचारे प्राणी रस्त्यावर फिरताना दिसत होते. आता ही मानसिकता बदलतेय. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये असे लक्षात आले आहे की, प्राण्यांकडून नाही तर माणसांकडूनच कोरोनाचा संसर्ग होत आहे. अनलॉक सुरू असला तरीही कोरोनाची संख्या वाढतेय. या काळात आपल्या
घरात पेट्ची काळजी कशी घ्याल?
अनलॉक काळात आपल्या पेटच्या नियमित गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. एक दिवसाआड त्यांना अंघोळ घालणे, फिरायला घेऊन जाणे गरजेचे आहे. प्राण्यांकडून कोरोनाचा संसर्ग होतो हा गैरसमज आहे. याउलट आपल्या घरातील प्राण्यांची नियमित स्वच्छता राखणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना अनोळखी व्यक्तींचा संपर्क होऊ न देणे आवश्यक आहे.
अनलॉक काळात घरातील प्राण्यांमध्येही एक आकर्षक बदल झाल्याचे लक्षात आले आहे. बरेच लोक सध्या घरून काम करत आहेत. त्यामुळे ते यामध्ये लॉकडाऊनमध्ये त्यांच्या लाडक्या पेटसाठी देऊ शकतात. त्यांच्या भावना समजून घेणे, त्याचे लाड करणे, त्याच्यावर प्रेम करणे यासाठी नेहमीपेक्षा जास्तीचा वेळ त्यांना आपसूकच दिला गेल्यामुळे ते आनंदात आहेत. मानसिकदृष्टय़ा त्यांनाही तुम्ही त्यांच्याबरोबर चोवीस तास आहात याचं समाधान मिळतंय.
त्यांना समजून घ्या…
नियमित लसीकरण, वजन करणे, पुरेसा आहार, वेळोवेळी रक्त आणि लघवी तपासणी करणे त्यांच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे. तुमच्या लाडक्या प्राण्याला आणि प्राण्यांमुळे कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही हे आधी समजून घ्या. त्याकरिता त्याला समतोल आहार, आरोग्याची नियमित तपासणी याद्वारे ते निरोगी कसे राहतील याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. याशिवाय त्यांच्या त्वचेनुसार आठवडय़ातून एकदा किंवा दिवसाआड आंघोळ घाला. दररोज ग्रुमिंग करणे महत्त्वाचे आहे. त्वचा कोरडी स्वच्छ कशी राहील याची काळजी घ्या. हीच काळजी कोरोना तसेच अनलॉकमध्येही घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आहार…
पेस्ट्री ट्रिट्स, पेट सप्लिमेंट तसेच त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असणारी फळं खाण्यासाठी देऊ शकता. जेणेकरून त्यांच्या शरीरातील कॅलरीजमध्ये समतोल राखला जाईल. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो घरी आहार घेता तो त्यांना देणं टाळा . कारण तो त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असेल असे नाही. होम फूड सोल्यूशन काय द्यायचं हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवा. मानवी अन्न कुत्र्यांच्या त्वचेकरिता ऍलर्जिक ठरू शकते याकरिता त्यांना काळजीपूर्वक आहार देता यायला हवा.
अनलॉकमध्ये काळजी कशी घ्याल?
- सर्वसामान्यपणे लॉकडाऊन सुरू असताना किंवा आधी जशी आपण त्यांची काळजी घेत होतो तशीच काळजी अनलॉकमध्येही घ्यायची आहे. यामध्ये त्यांच्याकडून पुरेसा व्यायाम करून घेणे. कॉलनीत किंवा बाहेर जवळपास शक्य असल्यास फिरवून आणणे. गच्ची किंवा पार्किंग स्वच्छ करून तिथे त्यांच्या फिरण्याची व्यवस्था करणे.
- इतर लसीकरण केलेल्या पेटसोबतच त्यांचा संपर्क होईल याची काळजी घेणे. खात्री करूनच इतर पाळीव कुत्र्यांशी त्यांचा संबंध येऊ द्यावा. नाहीतर त्यांना संसर्ग होऊ शकतो.
- घराबाहेर घेऊन जाण्याची वेळ आलीच तर जबाबदार पेट वॉकर्स, सोसायटीमधील स्वयंसेवक यांची मदत घ्या.
- पोस्ट बाईट लसीकरण करून घ्यावे.
- ज्येष्ठ नागरिक घराबाहेर जाऊ शकत नाहीत. याकरिता पेट वॉकर्सची मदत घेता येईल. खासकरून इतर लहान-मोठय़ा पेटस्ना घराबाहेर फिरवून आणण्यास हरकत नाही.
- मध्यम आकाराचे तसेच वार्ंकग डॉग यांच्याकडून व्यायाम करून घ्यावा, फिरायला न्यावे नाहीतर त्यांना नैराश्य, ताण अशा समस्या तसेच त्वचाविकारही उद्भवू शकतात.
- अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता न्यू ट्रेनिंग किट, नवीन खेळणी त्यांच्याकरिता आणणे आणि सोसायटी कम्पाउंडमध्ये परवानगीने त्यांच्या खेळण्याची सोय करणे. यामुळे त्यांना मोकळेपणा मिळून ते व्यस्त राहू शकतात.




























































