लेख – जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेश राणे

पतंग हा विषय घातक मांजामुळे जेवढा संवेदनशील बनला आहे, तेवढाच तो पतंगीमुळे एकमेकांत येणाऱ्या वितुष्टामुळे कलहाचे कारण ठरला आहे. म्हणजे एकीकडे नायलॉन मांजामुळे कोणीतरी जिवानिशी जात आहे, तर दुसरीकडे पतंगीमुळे विकोपाला जाणारे वाद निर्माण होत आहेत. दहा – वीस रुपयांची वस्तू जीवही घेते आणि वादही निर्माण करून मनात असंतोष खदखदत ठेवते. कुठे गहाण ठेवली आहे बुद्धी ?  स्वतःचा उत्साह दुसऱ्यासाठी जीवघेणा असू नये इतके जरी कळले असते तरी पुरे असते, पण त्याचीच बोंब आहे. कारण विवेकनिष्ठताच शून्य आहे.

सध्या पतंग उडवण्याच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र तो उत्साह पक्षी आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी प्राणघातक ठरत आहे. प्रतिवर्षी अशीच दुःस्थिती असते, पण त्यात पालट होत नाही. उलटपक्षी स्थिती अधिक खालावत चालली आहे. त्याचा नाहक त्रास पतंगबाजीशी काडीचाही संबंध नसणाऱ्या जिवांना सक्तीने भोगावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकी घसरल्याने, दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने होणाऱ्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट उपयुक्त ठरते. मात्र त्याहीपुढे जात नायलॉन मांजासारख्या जीवघेणा मांजापासून स्वतःचा बचाव करण्यासाठीसुद्धा उपाययोजना अनिवार्य असणार आहे असे लक्षात येते. त्यासाठी मानेच्या भागात ‘मफलर’सारखा कपडा गुंडाळता येईल अथवा त्या नाजूक भागाचे रक्षण करण्यासाठी आणखी कोणती पर्यायी उपाययोजना करता येईल का याचा गांभीर्याने विचार व्हावा. तसेच त्याप्रमाणे कृतीसुद्धा व्हावी. कारण हे जिवावर बेतणारे सूत्र आहे, पण उपाययोजना न अवलंबता गाफील राहू नये, हेच सांगणे आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ याचा विचार करता वेळीच उपाययोजना केल्याने पुढील दुर्दैवी प्रसंग टाळता येईल. नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यावर नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होईल, त्यांच्याकडून त्या मांजाचा साठा जप्त केला जाईल असे मानू या. एकंदरीत नायलॉन मांजा हे सूत्र इतके सखोल रुजले आहे की, त्याचा पसारा पुष्कळ मोठा दिसतो. प्रतिवर्षी याचा कटू अनुभव हमखासपणे दुचाकीस्वार आणि पक्षी यांची पाठ सोडत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांनीसुद्धा दक्ष राहिले पाहिजे. नायलॉन मांजारूपी मृत्यूच्या सापळ्याचा विळखा कधी घात करेल याचा नेम नाही. त्यामुळे कुटुंबाचा विचार करता दक्ष राहण्यातच भले आहे.

पतंगबाजी दिवसा चालू असते. सायंकाळी, रात्रीच्या वेळी पतंग उडवत नाहीत हाच काय तो दुचाकीस्वार, पक्षी यांच्यासाठी दिलासा आहे, अन्यथा अपघात, मृत्यू यांचे प्रमाण वाढले असते. नायलॉन मांजावर बंदी असली तरी तो बाजारात उपलब्ध असणे म्हणजे जीवघेणे शस्त्रच अल्प मूल्यात विक्रीसाठी उपलब्ध असणे होय. दिसताना छोटी दिसणारी वस्तू किती जणांचा जीव घेते याची कल्पना पतंग उडवणाऱ्या सर्वच मंडळींना कदाचित नसेल असे मानू या. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर असते ती केवळ एकमेकांच्या पतंगी ‘गुल’ करण्याची चढाओढ. त्यामुळे मांजाची खरेदी करतानाही धारदार मांजाना सर्वाधिक मागणी आणि पसंती असते. ज्यांना केवळ पतंगच उडवायची आहे, त्यांना सामान्य मांजाही चालतो. कारण त्यांना कोणाच्याही पतंगाची काटछाट करायची नसते, पण अशा लोकांची संख्या अत्यल्प आहे. कारण ते केव्हातरी पतंग उडवतात, पण जे रोजच पतंग उडवतात, त्यांच्या मानेवर मात्र एकमेकांची पतंग गुल करण्याचे भूत बसलेले असते आणि त्याच विचारांनी ते झपाटलेले असतात. त्यापुढे त्यांना ना कोणता दुचाकीवरून जाणारा महत्त्वाचा वाटत ना आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचा जीव मोलाचा वाटत. उलटपक्षी पतंगबाजांना ते एक प्रकारचे अडथळे वाटतात. कोणाचा जीव गेल्याने काय होते याचा पुसटसा विचारही त्यांच्या मनाला स्पर्शत नसणार.

दुचाकी वेगात असेल आणि साधा मांजा जरी मध्ये येऊन गळ्याला लागला तरी वाहनावरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे दुचाकी, दुचाकीस्वार यांची हानी होण्यासह त्यावेळी अन्य वाहनांनासुद्धा त्यांची धडक लागून अपघात होऊ शकतो. परिणामी त्या अपघाताचे स्वरूप किती वाढू शकते याची कल्पना करता येईल. पतंगबाजांचा खेळ, मनोरंजन होते. मात्र त्याच वेळी कोणीतरी कळवळते, तळमळते. त्याचा पतंग उडवणाऱ्यांना जराही पश्चात्ताप नसतो. कारण माणूस म्हणून ना समोरच्याप्रति संवेदनशीलता असते ना पक्षी म्हणून त्यांच्याविषयी प्रेम असते. थोडक्यात, माणुसकीचाच गळा घोटला गेल्याचे भयावह चित्र असते. त्यामुळे आपल्या पतंगीच्या मांजामुळे कोणी घायाळ झाल्यास तत्काळ त्याच्या सहाय्याला धावून न जाता तिथून पळ काढला जातो.

अपघातग्रस्त माणसाच्या मागे त्याचे कुटुंब असल्याने अशा अपघातात त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे कुटुंब पोरके होते. पक्ष्यांचे होणारे मृत्यू, त्यांचे घायाळ होणे याकडे लक्ष देऊन त्यांच्यासाठी आवाज उठवणारे अत्यल्प जण आहेत, पण त्यांचा आवाज गांभीर्याने घेतला जात नाही. जिथे माणसाच्या व्यथा समजून घेऊन त्यावर उपाययोजना कधी निघतील याची निश्चिती नाही, तिथे बिचाऱ्या पक्ष्यांची व्यथा मांडणाऱ्या संस्थांना किती गांभीर्याने घेतले जात असेल ? हा प्रश्नच आहे. साधारण तीन – चार महिने पतंगबाजीचा कालावधी असतो, जो आता चालू आहे. एरवी असे नसल्याने पतंगबाजीमुळे होणारे मृत्यू हा विषय महत्त्वाचा वाटत नाही असे काही आहे का? जेव्हा कोणा दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजामुळे मृत्यू होतो तेव्हा नायलॉन मांजा हा विषय प्रकाशात येतो. तोपर्यंत नायलॉन मांजासह पतंगबाजी जोरदार चालू असते. दुर्घटना घडल्याशिवाय आपल्याकडे स्वतःहून कोणाला जाग येत नाही. तीसुद्धा किती कालावधीपर्यंत असेल याची निश्चिती नसते. त्यामुळे ‘अमुक ठिकाणी मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू’ अशी बातमी वाचनात येते आणि तो विषय तिथेच थांबतो. नायलॉन मांजावर बंदी आहे की नाही हा विषय तर कित्येक लोकांच्या मनीध्यानीसुद्धा नाही. तो विषय समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचला पाहिजे. त्यासाठी विशेषतः शाळा – महाविद्यालयांतून जागृती करण्याला प्राधान्य असावे. कारण पतंग उडवण्यात त्यांचाच सर्वाधिक समावेश असतो. यालाच जोडून सूत्र असे की, दिवाळीमध्ये फटाके उडवल्याने ध्वनी, वायूचे प्रदूषण होते. ते स्वतःसह इतरांच्या म्हणजेच सामाजिक आरोग्यासाठीही धोकादायक कसे आहे तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना, डोळ्यांना होणारी जखम अथवा तो गमवावा लागणे, भाजणे हा विषय त्यांच्यापर्यंत पोचल्याने मागील काही वर्षांत फटाके उडवण्याचे प्रमाण घटले. जशी जागृती होईल तसे त्याचे सकारात्मक परिणाम समाजस्तरावर दिसतील. त्यामुळे पतंगबाजीप्रकरणी जागृती अनिवार्य आहे.

पतंग हा विषय घातक मांजामुळे जेवढा संवेदनशील बनला आहे, तेवढाच तो पतंगीमुळे एकमेकांत येणाऱ्या वितुष्टामुळे कलहाचे कारण ठरला आहे. म्हणजे एकीकडे नायलॉन मांजामुळे कोणीतरी जिवानिशी जात आहे, तर दुसरीकडे पतंगीमुळे विकोपाला जाणारे वाद निर्माण होत आहेत. दहा – वीस रुपयांची वस्तू जीवही घेते आणि वादही निर्माण करून मनात असंतोष खदखदत ठेवते. कुठे गहाण ठेवली आहे बुद्धी? स्वतःचा उत्साह दुसऱ्यासाठी जीवघेणा असू नये इतके जरी कळले असते तरी पुरे असते, पण त्याचीच बोंब आहे. कारण विवेकनिष्ठताच शून्य आहे.