अखंड ‘ज्ञानेश्वरी’योगी मामासाहेब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्रीपाद अर्थात मामासाहेब मुळातच विरक्त होते तरीही मातोश्री पार्वतीबाईंच्या अंतिम इच्छेनुसार त्यांनी पुन्हा एकदा संसार थाटला हे जरी खरं असलं तरीही त्यांचा प्रपंच अवघ्या चौतिसाव्या वर्षी संपुष्टात आला. त्याचवेळी श्रीस्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत देऊन गृहत्याग करण्याची आज्ञा केल्यामुळे मामासाहेबांनी 15 जून 1948 रोजी एक तांब्या व दोन पंचे इतके साहित्य घेऊन गृहत्याग केला. बेळगावहून निघालेले मामासाहेब आळंदीला आले आणि पंढरीची वारी पूर्ण करून नसरापूरजवळच्या बनेश्वर तीर्थक्षेत्री राहून त्यांनी आयुष्यातले पहिले श्रावण अनुष्ठान केले. त्यापुढील सर्व अनुष्ठाने विविध पारायणे, मंत्रजप, पूजा, साधना, दीक्षादान, अन्नदान, प्रवचने, भजन व आरती इत्यादी कार्यक्रमांनी संपन्न होत असत. मामासाहेबांसोबत अनुष्ठानात सहभागी होणे ही साधकांसाठी मोठी पर्वणीच असायची!

पुढे मामासाहेब नोकरीच्या निमित्ताने राजकोटला गेले आणि तिथे त्यांचे बरेचसे वास्तव्य झाले. त्यांचा परिचय तिथे स्वामी दिगंबरजी यांच्याशी झाला. मामासाहेबांचे योगप्रेम पाहून स्वामींनी त्यांना योगाश्रमात राहायला बोलावले. तेथील वास्तव्यात त्यांनी स्वामींकडून अनेक योग प्रक्रिया शिकून घेतल्या तसेच त्यांच्यामधील मूळच्या काही अद्भुत योग प्रक्रियाही प्रकट झाल्या. मामासाहेबांचे योग प्रकारातील कसब पाहून स्वामी चकीत झाले. स्वतःस खड्डय़ात पुरून घेऊन त्यात 72 तास राहण्याचे कसब मामासाहेबांनी आत्मसात केले. मात्र हा प्रयोग एकदा करीत असताना तिथे पूज्य पार्वतीबाई प्रकट झाल्या व म्हणाल्या, ‘‘सख्या, असा एकांत आपल्याला नको. लोकांमध्ये राहून सहज साधणारा एकांत महत्त्वाचा आहे. तेव्हा हे प्रकार थांबवावेत.’’ या घटनेनंतर मामासाहेबांनी हठयोगाच्या प्रक्रिया करणे सोडून दिले.

राजकोट येथे वास्तव्यास असताना मामासाहेबांना गिरनार व द्वारकाक्षेत्राच्या अनेक वाऱया घडल्या. गिरनारची श्रीदत्तजयंतीची आणि पंढरीची आषाढी वारी ते कधीही चुकवत नसत. पुढे दिगंबरजींसोबत त्यांनी दोनवेळा हिमालय यात्राही केली. सन 1949 मधील हिमालय यात्रेत विष्णुप्रयागात स्नान करीत असताना त्यांना श्रीज्ञानेश्वरांचे विष्णुरूपात दर्शन झाले. या थेट दर्शनामुळे मामासाहेबांमध्ये ‘श्रीज्ञानेश्वरी’ची अंतःस्फूर्ती प्रकटली आणि माऊलींच्या ओव्यांचे अद्भुत अर्थ त्यांना स्फुरू लागले. 1953 साली रामनवमीला राजकोटच्या राममंदिरात त्यांचे पहिले प्रवचन झाले. त्यांच्या सहजसोप्या विवरणाने श्रोते मुग्ध होत असत. पुढे ही ज्ञानसत्रे सातत्याने करून मामासाहेबांनी लोकांना ‘ज्ञानेश्वरी’ची आणि संतवाङ्मयाची गोडी लावली. माऊलींच्या वाङ्मयाला सुयोग्य अभ्यासदिशा देत त्यांनी अनेकांना चिंतनास प्रवृत्त केले.

याच सुमारास मामासाहेबांना मंत्रदात्या श्रीगुरुदर्शनाची ओढ लागलेली होती. पू. पार्वतीबाईंच्या सांगण्यानुसार बारा वर्षांचा काळ संपत आला होता. सालाबादप्रमाणे मामासाहेब आषाढी वारीला गेले. उत्सवाचा बहर ओसरल्यावर परतीच्या प्रवासात ते स्नेही यशवंतराव वैद्य मास्तरांच्या घरी सोलापूरला गेले. तिथे त्यांची भेट एका तेजस्वी सत्पुरुषासोबत झाली. गादीवर विराजमान झालेल्या त्या योगमूर्तीकडे पाहून एकाएकी मामासाहेबांच्या मुखातून शब्द उमटले, ‘‘यांच्या पंचमस्थानात बुधचंद्राची युती असणारच.’’ हे ऐकल्यावर त्या सत्पुरुषाने मामांना जवळ बोलावले आणि आपल्यासोबत व्याघ्राजिनावर बसवून घेतले आणि ते म्हणाले, ‘‘आपल्यावर श्रीमाऊली व आपल्या मातोश्रींची पूर्ण कृपा आहे.’’ त्यांचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच मामासाहेबांना तीव्र भावावेग येऊन ते प्रगाढ समाधीत गेले आणि दीड तासाने भानावर आले. ते सत्पुरुष म्हणजे श्रीदत्त संप्रदायाचे अध्वर्यू आणि श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे अंतरंग शिष्योत्तम योगिराज श्रीवामनरावजी गुळवणी महाराज हे होय. पुढे श्रीगुरुपौर्णिमेच्या पहाटे योगिराज श्रीगुळवणी महाराजांना श्रीवासुदेवानंद सरस्वतींचा दृष्टांत झाला. ‘‘श्रीपाद आमचीच विभूती आहे. त्याला मंत्रदीक्षा देऊन तपश्चर्येसाठी कुरवपूर येथे पाठवावे. तेथे श्रीदत्तप्रभूंचा प्रसाद लाभेल. त्याच्यावर कायमच कृपाछत्र राखावे.’’ श्रीगुळवणी महाराजांनी श्रीस्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीगुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर पूज्य मामासाहेबांना परंपरेचा मूलमहामंत्र शक्तिपातपूर्वक देऊन कृतार्थ केले आणि त्याचवेळी परंपरेचे दीक्षाधिकारही लेखी पत्रान्वये प्रदान केले. यापुढे मामासाहेबांचे अवतारकार्य विलक्षण जोमाने प्रारंभ करते झाले. त्यांना वैयक्तिकरीत्या श्रीदत्तप्रभू, श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीवासुदेवानंदांचे प्रचीतीच्या रूपाने मार्गदर्शन लाभत होते. श्रीगुरुद्वादशीच्या शुभदिनी श्रीपादश्रीवल्लभांच्या दिव्य पादुका आणि बिल्वदलाची प्राप्ती झाली आणि त्यासोबतच विविध प्रसंगांतून त्यांना आपल्या परंपरेमधील तीन पिढय़ांतील अनेक सिद्धसत्पुरुषांचा प्रत्यक्ष सहवास आणि दर्शनाचा सुयोग लाभला.

मामासाहेबांनी त्यांच्या अवतारकार्यात देव-देश-धर्महितार्थ अगणित यज्ञयाग केले. ‘श्रीदत्तमाला’ मंत्राची बारा पुरश्चरणे केली. ‘माला’ मंत्राचा स्वाहाकार आणि अतिरुद्र स्वाहाकार केला. ‘श्रीज्ञानेश्वरी वाङ्मय अभ्यास मंडळ’ स्थापन करून ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार सुरू केला. 1976 साली ‘संतकृपा’ नावाचे मासिक सुरू केले. अनेकांना दीक्षा दिली. देशमुख महाराजांनी सलग 36 वर्षे केलेली प्रवचनसेवा पुन्हा सुरू केली. 1973 साली श्रीगुळवणी महाराजांनी केलेल्या ‘‘संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे!’’ या आज्ञेनुसार सिंहगड रस्त्यावर मामासाहेबांनी जागा विकत घेऊन ‘माऊली’ ही वास्तू उभारली. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांच्या हयातीतच मामासाहेबांवर अनेक साधकांची जबाबदारी सोपवली होती. मामासाहेबांचे हजारो अनुग्रहित शिष्य होते. शक्तिपात योग संप्रदायाच्या सर्व अंग-उपांगांचा सखोल अभ्यास व अधिकार असल्यामुळे मामासाहेबांकडून शक्तिपाताच्या कठीण समजल्या जाणाऱया अन् केवळ श्रीदत्तावतारांनाच शक्य असणाऱया सर्वच्या सर्व 164 प्रकारांनी दीक्षा होत असत! मामासाहेबांनी हे अशक्यप्राय कार्य सहजगत्या केले हे वैशिष्टय़पूर्ण आहे.

ज्ञानप्रसाराचे व्रत घेऊन ‘श्रीवामनराज प्रकाशन’ व ‘श्रीवामनराज त्रैमासिकाचा’ प्रारंभ, 4000 पृष्ठांच्या लिखित वाङ्मयाचे प्रकाशन, ‘श्रीपाद सेवा मंडळ’ ट्रस्टच्या माध्यमातून देशात आणि जगभरात शंभराहून अधिक केंद्रे, कोयनानगर (सातारा) येथे श्रीदत्तधाम निर्मिती, ग्रंथालये अन् ज्ञानाधिष्ठाrत उपक्रमाचा अवाढव्य पसारा यशस्वीपणे उभारून परमपूज्य मामासाहेब देशपांडे नावाचा तपस्वी साधक फाल्गुन कृ. नवमी, दि. 21 मार्च 1990 च्या पहाटे तीन वाजता श्रीदत्तस्वरूपी विलीन झाला! प. पू. मामासाहेबांचे अवतारकार्य अद्वितीय आणि अपरंपार आहे हे लक्षात घेऊन त्यांचे उत्तराधिकारी पू. शिरीषदादा कवडे यांनी मामासाहेबांचे विस्तृत चरित्र तब्बल पाच खंडांतून प्रसिद्ध केले आहे. वाचकांनी हे सर्व खंड वाचल्यास त्यांना मामासाहेबांच्या अफाट कार्याविषयीची समग्र माहिती खऱया अर्थाने उमगेल हे नक्कीच.

[email protected]