मॅजिक बॉक्स- महत्त्वाच्या व्यक्तींच्या सहवासात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक डुंबरे

दूरदर्शनच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सहवासाचा या माध्यमामुळे योग जुळून आला. विविध राजकीय पक्षांचे मान्यवर नेते, स्थानिक पातळीवरचे नेते, आमदार, खासदार, मंत्री यांना भेटण्याचा योग आला. त्या काळी दूरदर्शन हे नवीन माध्यम असल्यामुळे त्या माध्यमाचे आकर्षण मोठे होते. त्यामुळे कोणालाही भेटणे सहज शक्य होत असे. त्यातील काही आठवणी.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा माझा परिचय ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हापासूनचा. ते मुख्यमंत्री असताना तसेच ते विरोधी पक्षनेते असताना शिवसेनेतर्फे दूरदर्शनच्या कार्यालयावर मराठी भाषेचे कार्पाम वाढवा, अशा मागणीसाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व अर्थात त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मनोहरपंत जोशी यांच्याकडे होते. सरांचा स्वभाव दिलदार, मनमिळाऊ आणि सर्वांना सांभाळून घेणारा होता. मोर्चा आला तेव्हा ते तीन-चार लोकांना घेऊन आमच्या संचालकांना भेटले आणि शांतपणे मागण्यांचा कागद संचालकांना दिला. अर्थात त्याचा परिणाम चांगला झाला. मराठी भाषेच्या कार्पामांचे तास वाढले गेले.

दुसरी त्यांची माझी ओळख 1995 साली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा झाली. एका कार्पामाच्या भाषणासाठी ते वरळी येथील स्टुडिओमध्ये आले होते. अतिशय वक्तशीर असल्यामुळे त्यांना दिलेल्या वेळेत ते आले होते. त्यांनी भाषणाची पिप्ट घरून आणली होती. ती अगदी बरोबर होती. रीतीप्रमाणे ती वाचून त्यांना परत देण्यात आली. भाषण रेकॉर्डिंग करण्यापूर्वी त्यांना विनंती केली की, कृपया आपण मेकअप करावा. त्यांनीसुध्दा आढेवेढे न घेता आमच्या गरजेप्रमाणे मेकअप केला. डोक्यावर रुबाबदार फेटा बांधला. कोणतीही चूक न होता एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण झाले. गप्पा मारताना मी बोलताना ‘बॉम्बे’ असा शब्द उच्चारला. तेव्हा सरांनी लगेच मला करेक्ट केले. बॉम्बे नव्हे मुंबई! मला थोडे लाजल्यासारखे झाले. परंतु त्यांच्या अंगी स्पोर्टस्मन्स स्पिरीट असल्यामुळे त्यांनी स्मितहास्य केले. चहापाणी झाल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणून ते वेळेत निघून गेले. ते एवढय़ा मोठय़ा पदावर असूनही अतिशय आदर्श वागणूक, दुसऱयाचे ऐकण्याची वृत्ती… हे त्यांचे गुण मला खूप भावले. आमचे कॅमेरामन नंदू वाडदेकर यांची आणि सरांची चांगली ओळख होती. ते मला एकदा ‘वर्षा’ बंगल्यावर सरांना भेटण्यासाठी घेऊन गेले होते. काम काही नव्हते. सहज गेलो होतो. वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला पाच-दहा मिनिटांची भेट दिली. आमचे आगतस्वागत केले आणि मी तुम्हाला ओळखतो असे म्हणून ओळख दिली. केवढा हा मोठेपणा. आता सर आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. मनोहरपंत जोशींना यानिमित्त मी आदरांजली अर्पित करतो.

दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे कैलासवासी शंकरराव चव्हाण. ते त्यावेळी महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री होते. माझे पत्रकार मित्र विनोद शहा यांचे आणि त्यांचे संबंध चांगले होते. त्यावेळी आठमाही पाणी आणि बारामाही पाणी हा विषय चर्चेमध्ये होता. विनोद शहांना सांगून मुंबई येथील माननीय शंकरराव चव्हाण यांना स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी आमंत्रित केले. चव्हाण साहेबांचा पाटबंधारे विषयावर खूप मोठा अभ्यास होता आणि महाराष्ट्रामध्ये सिंचन क्षेत्र कमी असल्यामुळे आठमाही पाणी कसे फायदेशीर आहे याचे गणित त्यांनी शेतकऱयांना समजावून सांगितले.  मी मुंबई-पुणे डेक्कन क्वीनने प्रवास करत असे. कधी कधी माननीय शंकरराव चव्हाण डेक्कन क्वीनने मुंबईला येत किंवा पुण्याला जात असत. माझी त्यांची तीन-चार वेळा गाठ पडली. ते ओळख विसरले नाहीत. अगदी सहज भेटलो अशा त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. आता ते नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.

आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अकलूजचे आमदार शंकरराव मोहिते पाटील! ते काँग्रेसचे आमदार होते. आकाशवाणीत असताना मी त्यांच्याकडे एक-दोनदा रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो. ते ओळख विसरले नव्हते. दूरदर्शनमध्ये असताना फोन करून त्यांना भेटायला अकलूजला गेलो होतो. सामुदायिक विहिरी असा विषय होता. ते अतिशय उत्कृष्ट वत्ते होते. दिसायला साधे होते. फार शिकलेले नव्हते. परंतु अनुभव दांडगा, समाजकार्याचा व्यासंग, दुसऱयाकडून शिकण्याची वृत्तीमुळे त्यांनी रेकॉर्डिंग लीलया केले. त्यांचा अकलूजमध्ये खूप मोठा दरारा होता. त्यांच्या जवळपास फिरकणे कठीण होते. त्यांची आदरयुक्त भीती होती. पण कामे सर्वांची करायचे. कार्पाम झाल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यावर जेवायला बोलावले होते. तेव्हा पाटावर बसून मराठी पद्धतीच्या जेवणाची चव चाखायला मिळाली होती.

अजून एक राजघराण्यातील व्यक्तिमत्त्व! किती साधे आणि समजून घेणारे, याचा अनुभव आला सातारचे त्यावेळचे आमदार अभयसिंह राजे भोसले यांच्यासोबत. ते सहकार मंत्री होते. त्यांचा माझा परिचय असाच कार्पामातून झाला. ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामात सहकाराविषयी त्यांनी माहिती द्यावी म्हणून मी त्यांना निरोप पाठवला. ‘सहकाराचे महत्त्व आणि शेती विकास’ या विषयावर आपण मुलाखत द्यावी. उलट निरोप आला की, अमुक तारखेला मी पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये आहे. आपण सकाळी आपले युनिट घेऊन या. जुन्या काळातली ही माणसे मुळातच खूप अभ्यासू होती. त्यांना त्या विषयाची भरपूर माहिती होती. तसेच अभयसिंह राजे भोसले यांच्याकडे सहकार खाते पण  होते. त्यांनी सातारला सहकारी कारखाना काढून शेतकऱयांना सहकार खात्यातून कसा फायदा होतो हे दाखवून दिले होते.

अर्थात त्यावेळी माझी कुठलीही मुलाखत 14 ते 15 मिनिटांची असावी हे अधोरेखित होते. अर्ध्या तासात हा पंधरा मिनिटांचा कार्पाम उरकला. परंतु यातून एक जाणवले एवढा शिवछत्रपतींच्या वंशातला राजघराण्यातला माणूस, पण अत्यंत साधा, सर्वांशी मोकळेपणा वागणारा. सहकार खात्यातील काही अधिकारी तिथे आले होते त्यांच्याशीही विनयाने वागणारा असा नेता. आता फक्त आठवणी राहिल्या आहेत.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)