रंगपट – बालनाटय़ांची शिदोरी घेऊन रंगभूमीवर

अभिनय कारकीर्दीच्या पन्नाशीत मागे वळून पाहताना बालपण प्रकर्षाने डोळय़ांसमोर येतेसांगत आहेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम.

पूर्वीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात शासनाची एक रेकॉर्डिंगग रूम होती. प्रभाकर साठे हे तल्लख बुद्धीचे रेकॉर्डिस्ट तिथे काम करायचे. ‘बजरबट्टू’ या नाटकाचे गाणे त्यांच्या रेकॉर्डिंगग रूममध्ये रेकॉर्ड करण्याचे काम सुरू होते, मात्र या गाण्यात कुठेतरी एक मात्रा कमी पडत होती. पण एडिट करताना साठेकाकांनी इकडची टेप तिकडे, असे काहीतरी केले आणि बटन दाबले. असे करताच ते गाणे वाढले. या प्रसंगापासून माझी संगीताशी नाळ जुळली गेली. तेव्हापासून साठेकाकांच्या मदतीला मी असायचो. त्यामुळे ‘बजरबट्टू’च्या रेकॉर्डिंगगला त्यांनी मला विचारले की, ‘या नाटकाचे बॅकग्राऊंड म्युझिक तू वाजवशील का?’ म्हणजे, थोडक्यात ‘टेपऱया’ हे काम होते; पण मला ते आवडत होते. कारण माझा संगीताचा कान तयार झाला होता.

नाटकाच्या या रेकॉर्डिंगगमध्ये, एक झाड बोलतेय, असे काहीतरी होते. त्यासाठी विनय आपटे यांचा धीरगंभीर आवाज होता. यात एक वाक्य काहीतरी राहिले होते, पण नाटक दोन दिवसांवर आले तरी विनय आपटे काही सापडत नव्हते. मी साठेकाकांना म्हणालो की, ‘मी त्यासाठी प्रयत्न करू का? विनय आपटेंचा आवाज मला काढता येईल.’ त्यांनी ‘हो’ म्हटले आणि मी ते काम चोख केले. ही घटना माझ्या आयुष्यात घडली; तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपल्याला ‘आवाज’ काढता येतात. याच ‘बजरबट्टू’ नाटकात दोन उत्तम कलावंत काम करत होते. त्यातला एक म्हणजे माझा लाडका कलाकार अतुल परचुरे आणि दुसरा म्हणजे आशीष पेठे. या क्षेत्रात येण्यासाठी मी टेपऱया बनलेलो होतो आणि आज ही आठवण निघाली तरी अतुल आणि आशीष म्हणतात, ‘दादा, तू मस्त टेप ऑपरेट करायचास रे.’

शाळेत असताना मी खूप बालनाटय़े केली, पण व्यावसायिक बालनाट्यात कुणीतरी आपल्याला घ्यावे अशी खूप इच्छा होती. मात्र ती फलद्रूप होत नव्हती. पण म्हणून मी निराश झालो नाही. 1974 मध्ये रुपारेल महाविद्यालयात कला शाखेत मी दाखल झालो. तिथे राणी गडकरी हिच्याशी ओळख झाली. ती तेव्हा ‘परिकथेतील राजकुमार’ या बालनाट्यात काम करायची. मी ते नाटक पाहायला गेलो असताना, वंदना विटणकर यांच्याशी तिने माझी ओळख करून दिली. दोन दिवसांनी वंदना विटणकर यांनी, ‘मला भेटशील का?’ म्हणून विचारले आणि मी त्यांना भेटलो. ‘आमचे ‘परिकथेतील राजकुमार’ नाटक काही काळासाठी बंद पडले आहे. मात्र आम्हाला ते नव्याने करायचे आहे; तर तू ते बसवशील का?’ असे त्यांनी मला विचारले. हे ऐकून मला तर वाटले की, कुणीतरी परीच आपल्यावर प्रसन्न झाली आहे. मी ‘हो’ म्हटले आणि त्या नाटकाचे दिग्दर्शन करायला घेतले.

आमच्या या नाटकात परी राणीला एक लहान मुलगी काहीतरी सांगत असते, असा एक प्रसंग होता. तिचे ते रडत रडत काही बोलणे आम्हाला रेकॉर्ड करायचे होते. आम्ही अर्थातच रवींद्र नाटय़ मंदिरातल्या साठेकाकांच्या स्टुडिओत गेलो. त्या मुलीला मात्र ते रेकॉर्डिंगग जमत नव्हते. तेव्हा एका क्षणी माझ्याकडून तिला चिमटे बसले म्हणा किंवा काहीतरी झाले म्हणा; ती अतिशय सुरेख रडत रडत ते वाक्य बोलली आणि आमच्या डोळय़ांत पाणी आले. आता ती मुलगी कोण, हे मी शोधतोय; कारण मला तिला सांगायचे आहे की, काहीतरी चांगले हवे होते म्हणून माझ्याकडून ते तसे होऊन गेले. आता पुढच्या वर्षी माझ्या कारकीर्दीला पन्नास वर्षे होतील; पण माझ्या या प्रवासातले हे आधीचे टप्पे विसरता येणे शक्य नाही.

अशीच एक आठवण आहे ती माझ्या शालेय जीवनातली!  कुमार कला पेंद्रातर्फे आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. यातल्या ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या नाटकात मी पहिला मोठा बुटका होतो. त्या स्पर्धेत मला अभिनयाचे पारितोषिक मिळाले. आमच्या एकांकिका खूप रंगायच्या, हे लक्षात आल्याने कुमार कला पेंद्राचे संस्थापक अरविंद वैद्य यांनी त्यावेळी, कृष्णाजी मुळगुंद यांनी लिहिलेले ‘अपराध कुणाचा’ हे ‘कुमारनाटय़’ करायचे ठरवले. या नाटकाचा प्रयोग राजा शिवाजी विद्यालयाच्या मोठय़ा सभागृहात होता. माझे पहिले व्यावसायिक नाटक, तेही कुमारनाटय़ आणि ते पाहायला मी आईला बोलावले होते. नाटक संपल्यावर आई फारशी काही बोलली नाही; पण तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाची होती. काही वेळाने ती  म्हणाली, ‘तू नाटकात काम करत होतास आणि आजूबाजूच्या बायका तुझ्या नावाने बोटे मोडत होत्या. तुझे हे असले काम बघायला तू मला बोलावले होतेस का?’ वास्तविक, त्या नाटकातल्या एका खलप्रवृत्तीच्या मुलाचे काम माझ्याकडून इतके छान झाले होते की, तिथे बसलेल्या सगळय़ा आयांना त्रास होत होता. आईने त्या बायकांचे बोलणे ऐकल्यावर तिला खूप वाईट वाटले होते. पण तिची ती प्रतिक्रिया मला एक व्यावसायिक नट घडवण्यासाठी खूप मोठे बळ आणि दिलासा देऊन गेली.

शब्दांकन – राज चिंचणकर