लेख – …माझ्या मराठीची गोडी!

marathi-2

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित’ हे गीत प्रख्यात कवी वि.म. पुलकर्णी यांचं आणि गायक आहेत दिवंगत कमलाकर भागवत. परवा सत्तावीस तारखेला ज्ञानपीठ सन्मानप्राप्त कविवर्य पुसुमाग्रज यांचा जन्मदिन. तोच दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून आपण साजरा करतो. मराठीचा हा प्रवास शतकानुशतकांचा आहे. महानुभाव, मुपुंदराज, नामदेव, ज्ञानेश्वर यांच्या काळापासूनचं मराठीतलं लिखाण उपलब्ध आहे. तेराव्या शतकापासून तर संत कवींच्या अभंग ओव्यांनी मराठी मनावर जे अधिराज्य केलं ते आजतागायत. महाराष्ट्रात आलेल्या हय़ुएन त्संगपासून पुढच्या अनेक परकीय अभ्यासकांनाही मराठी भाषेचं महत्त्व समजलं. त्यातल्या जर्मन गुंथमायर किंवा अमेरिकन बर्मसन यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. आता तर नव्या युगात मराठी माणसांबरोबर आपली भाषा जगभरात पोहोचली आहे. अमेरिकेतील पुढच्या पिढीला प्रयत्नपूर्वक मराठी शिकवणाऱ्यांच्या जिद्दीविषयी पूर्वी लिहिलं आहे.

कोणतीही भाषा काळाच्या ओघात कालानुरूप कशी बदलते हे गेल्या लेखातील ‘इंग्लिश’विषयी जाणून घेतलं. मुळात इंग्लिशच आपल्यासाठी ‘इंग्रजी’ झाली.

मराठी भाषेचं महत्त्व ठासून सांगताना ज्ञानेश्वरांनी ‘माझा मराठाचि बोलु कवतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ असा सार्थ अभिमान व्यक्त केला. मराठीच्या महाराष्ट्रभर आणि बृहन्महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी विविध बोलीभाषा निर्माण झाल्या. खरं तर प्रमाण भाषा म्हणजे आता आपण नेहमीच्या लेखन, वाचन, छपाईमध्ये वापरतो ती भाषा तुलनेने नंतर रूढ झाली. घरात बोलीभाषा, मग ती मालवणी, अहिराणी, वऱहाडी किंवा आदिवासी भागात बोलली जाणारी कातकरी, गोंडी अशी कोणतीही असू शकते. त्या त्या भागातली माणसं आधी नैसर्गिकरीत्या त्यांची ‘मायबोली’च शिकतात. शालेय शिक्षण सुरू झालं की प्रमाण भाषा सोयीसाठी स्वीकारावी लागते आणि ती स्वीकारली तरी मूळच्या बोली भाषेचं महत्त्व कमी होत नाही. अनेकविध शब्दसंग्रह आणि उच्चारांच्या छटा असलेल्या या भाषांमधीलं संभाषण खूप गोड वाटतं. ते सर्वांना समजतं. ‘मले, तुले’चा अहिराणी उच्चार आणि बहिणाबाई चौधरी यांची अहिराणी भाषेतील गीतं अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. त्याचप्रमाणे मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांनी मराठी मुलुख जिंकला. गाडगेबाबांच्या वऱहाडी बोलीमधल्या समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनांनी वैचारिक जागृती निर्माण केली. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘महात्मा फुले’ या चित्रपटाचा आरंभ गाडगेबाबांचं चित्रिकरण करून केलं. त्याला त्यांनी ‘मंगलाचरण’ असं म्हटलं. बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांच्याकडून बहिणाबाईंचं अहिराणी काव्या गवसल्यावर अत्रे यांना विलक्षण आनंद झाला.

काळाच्या ओघात मूळच्या बोलींमधले आणि परक्या भाषांमधले अनेक शब्दही रोजच्या बोलण्या-लिहिण्यात येऊ लागले. समर्पक मराठी शब्द रुजण्यावर ‘मेयर’सारखे शब्द जाऊन ‘महापौर’ शब्द रूढ झाला. एरवी तारीख, तस्वीर, जिल्हा, तहसील असे कितीतरी शब्द ‘फारसी’ असल्याचा अनेकांना पत्ताच नसेल. ‘मामलेदाराने, तहसीलदाराला जप्तीचा हुपूमनामा बजावण्यास फर्मावले’ यातले बहुतेक शब्द मूळचे फारसी. ‘फर्मावले’ असं मराठी क्रियापद करून आलेलं वाक्य मात्र मराठीच वाटतं. असे अनेक शब्द मराठीने ‘पचवले’ आहेत. स्टेशनावर, टेबलावर किंवा लिफ्टमध्ये, पह्नवर अशी रूपं करून आपण इंग्लिश शब्दही मराठी केलेत. पॅन्टलूनची ‘पाटलून’ किंवा कॉटची ‘खाट’ तर कधीच झाली होती.

जे परिभाषिक जनसामान्यांच्या बोलण्यात सहज रुजतात ते ती भाषा आत्मसात करते. ऑक्सफर्ड शब्दकोषात जगातल्या अनेक भाषांमधले प्रचलित शब्द दरवर्षी स्वीकारून ते त्यांची इंग्रजी समृद्ध करतात. इंग्लिशला आपणही ‘इंग्रजी’ केलं आहेच की! मात्र अट्टहासाने किंवा कृत्रिमपणे पारिभाषिक शब्द लादण्याने भाषा संपन्न होत नाही. सहजतेने भावना व्यक्त करण्याइतका शब्दसंग्रह मातृभाषेत असताना उगाचच इंग्लिश शब्द वापरण्याची काही गरज नाही. परदेशात अनेक वर्षं राहून, शिपून आलेले माझे अनेक परिचित तिथेही घरी छान मराठी बोलतात.

आमच्या खगोल संस्थेतला एक तरुण अमेरिकेतल्या मराठी मुलांना किंवा ज्यांना आपल्या भाषेची आवड आहे त्या कोणालाही दर शनिवारी, रविवारी मराठी शिकवणाऱ्या शाळेत विनाशुल्क काम करतो. ‘घरी रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा मुलांशीही केवळ मराठीतच संवाद साधतो. त्यामुळे त्यांनाही मराठी उत्तम येते, असं तो सांगत होता. तिथे राहणाऱ्या आणखी एका मराठी तरुणाला वैज्ञानिक शब्दांचं मराठीकरण कसं करता येईल यावर विचार करावासा वाटतो. मराठीची गोडी अशीच टिपून राहणार आहे. बारा कोटी लोकांची आपली मायमराठी म्हणजे आपला सांस्कृतिक आत्मा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या