
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
शक्यतो असं बघितलं गेलं आहे की, मुलांना ‘परीक्षा किंवा अभ्यास’ यांच्या दडपणापेक्षा ‘आपण कमी पडलो तर लोकं हसतील’ हे दडपण जास्त असतं. हे असं ‘सगळय़ाच’ मुलांना वाटतं. त्यातील काही मुलं ते दडपण दाखवत नाहीत, तर काही सराईतपणे लपवतात. अशा वेळी समुपदेशन करताना मुलांमध्ये त्यांचा गेलेला विश्वास त्यांना मिळवून देण्याचं समुपदेशकाचं काम असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं. या दोन्ही गोष्टी पार पडल्या की मुलांचा हळूहळू गेलेला आत्मविश्वास परत यायला सुरुवात होते आणि ती थोडीफार ऐकायला लागतात. मूल जेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण सहन करत असतं तेव्हा त्याच्यात मानसिक आणि शारीरिक असे लक्षात येण्याजोगे बदल घडत असतात.
- मूल अचानक एकटे रहायला सुरुवात करते किंवा त्याचे घरच्यांबरोबर तसेच मित्रमैत्रिणींबरोबर बोलणे कमी होते.
- खाण्यापिण्यावर परिणाम तसेच झोपेचं वेळापत्रक बिघडतं.
- चेहरा सदैव चिंताग्रस्त दिसतो.
- मुलाच्या बोलण्यातून फक्त एकच विषय येत असतो जो बऱयाच प्रमाणात नकारात्मक दृष्टिकोनाचा असतो.
- काही वेळा मूल असह्य ताण होत असेल तर येणाऱया परिस्थितीला सामोरे जात नाही किंवा निरुत्साह दाखवते.
या आणि अशाच प्रकारची लक्षणे जर कुठल्याही मुलात आढळल्यास त्या मुलाला आधार देणं तसंच गरज भासल्यास तज्ञांची मदत घेणं केव्हाही चांगलं.
अजय (नाव बदलले आहे) बारावीत होता तेव्हा. भरपूर मेहनती, हुशार आणि एकपाठी. मोठमोठी स्वप्ने बघण्याचा त्याचा स्वभाव त्याच्या वयाला शोभेल असाच होता. अत्यंत जिद्दी आणि उत्साही. जीवनात यशस्वी होण्याच्या कल्पनाही ठाम होत्या त्याच्या. अजयला ‘स्पेस सायंटिस्ट’ बनायचे होते. नासात जायचे होते. त्याच्यावर त्याची रोलमॉडेल कल्पना चावलाचा पगडा होता.
‘‘मॅडम, मी खूप गुगल केलंय कल्पना चावलावर. नासामध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल आणि किती मेहनत घ्यावी लागेल हेही मला माहीत आहे.’’ समुपदेशनासाठी आलेल्या, थकलेल्या चेहऱयाच्या अजयचे निस्तेज डोळे मला तेव्हाही चमकदार झालेले जाणवले.
अजयची केस ही माझ्याकडे एका हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून आलेली होती. छातीत धडधड, हातापायांना घाम, चक्कर येणे अशा तक्रारींमुळे त्याला त्याचे पालक डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. सगळ्या आवश्यक त्या शारीरिक चाचण्यांमधून काहीही निष्पन्न झाले नाही. मग शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजय आणि त्याचे पालक समुपदेशनासाठी माझ्याकडे आले.
‘‘मॅडम, आमचा अजय हा तासन्तास फक्त अभ्यासातच रमलेला असतो. त्याचा अभ्यास आणि पाठांतरही व्यवस्थित असतं. पण हल्ली तो परीक्षेत ब्लँक व्हायला लागलाय. त्या दिवशी त्याची प्रॅक्टिकल होती. पण याला ती सुरू होण्यापूर्वीच चक्कर आली आणि दरदरून घाम सुटला. कॉलेजने आम्हाला फोन केला. आम्हाला आता अजयचं टेन्शन यायला लागलंय हो… तुम्हीच बोला याच्याशी.’’ त्याचे वडील भरपूर काळजीत होते आणि माझ्याशी बोलतानाही त्यांचा तो असह्य ताण जाणवत होता. अजय गप्पच होता. ‘‘आपण काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे,’’ असे भाव त्याच्या चेहऱयावर होते.
त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार अजय पहिल्यापासूनच त्याच्या करीअरबाबतीत कमालीचा गंभीर होता आणि त्यामुळे त्याने शाळेत असल्यापासूनच स्वतःला तसं घडवलं होतं. ‘अभ्यास’ हा त्याने एकुलता एक मित्र बनवला होता. त्यामुळेच त्याच्या आयुष्यात फक्त अभ्यासालाच वेळ होता. अजयने स्वतःचे असे एक वेळापत्रक बनवले होते ज्यात Leisure Time (मोकळा वेळ) नव्हताच.
त्याने स्वतःच्या प्राथमिकता अशा ठरवल्या होत्या की ज्यांची सुरुवात अभ्यासाने होत होती आणि शेवटसुद्धा अभ्यासाशी संबंधित विषयावर होत होता. म्हणूनच त्याला अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे अपराध्यासारखं वाटायचं. अजयच्या वडिलांनी बोलता बोलता त्याच्याबद्दल एक शब्द वापरला होता – ‘रमलेला’. आणि हे रमणंच त्याच्या ढासळत्या तब्येतीचं कारण होतं.
दिवसाचे 12-14 तास अभ्यास आणि उरलेला वेळ हा कॉलेज आणि क्लासेसचा, त्यात बारावी बोर्ड. या सगळ्यामुळे अजयचं पूर्ण आयुष्य हे केवळ अभ्यासमय झालेलं होतं. ‘हमखास बोर्डात येणारा विद्यार्थी’ म्हणून क्लास आणि कॉलेजने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं. सर्वात जास्त टक्के मिळवणारा मुलगा म्हणून नातेवाईक, मित्रांच्या नजरा त्याच्यावर होत्या. त्याहून अधिक म्हणजे अजयचा स्वतःवर असलेला खडा पहारा. चुकूनही अभ्यासाचा वेळ वाया जाऊ न देण्याची खबरदारी… या सर्वांचं हळुहळू त्याच्यावर दडपण यायला लागलं. या सगळ्याचा परिणाम त्याच्या खाण्यापिण्यावर व्हायला लागला. शरीर हे सगळे विचार करून थकायला लागलं. त्यामुळे आत्मविश्वासही कमी होऊ लागला. आणि म्हणूनच तो आता परीक्षेचं दडपण सहन करू शकत नव्हता.
मुलांना विशेषतः जी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात ती असंख्य वैयक्तिक सल्ल्यांतून जात असतात जे कधी कधी मुलांना उपयोगी ठरतील असे नाही. उलट त्यांचा गोंधळ जास्त उडू शकतो. त्यांच्या मनात दुसऱयाबद्दल तुलना निर्माण होऊ शकते आणि मुलं अजूनच ताणतणावात जाऊ शकतात.
अजयच्या बाबतीत हेच घडले होते. इंटरनेटवरून, इतरांचे अनुभव ऐकून, पुस्तकं वाचून त्याने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेतली होती. त्याच्या वेळापत्रकात ‘त्याला श्वास घ्यायलासुद्धा जागा नव्हती.’ ही गोष्ट त्याच्या आणि त्याच्या पालकांना लक्षात आणून द्यावी लागली. ‘सक्तीची विश्रांती’ त्याच्या वेळापत्रकात आणावी लागली. अभ्यास, छंद आणि टाईमपास असा त्याचा दिनक्रम ठरवला गेला. हे त्याचे रुटीन त्याची परीक्षा, प्रॅक्टिकल्स संपेपर्यंत ठरवले गेले होते आणि सक्तीचे केले गेले. त्याच्या जोडीला काही व्यायाम प्रकार (योगासने) देखील त्याला शिकवले गेले. पालकांकडून सहकार्य तर मिळतच होते. म्हणूनच या सगळ्याचा चांगला परिणाम अजयच्या निकालावर झाला. आज या केसला 5-6 वर्षं होऊन गेली आहेत. आज बरेचसे अजय आपल्या आजूबाजूला आहेत. कदाचित आपल्या घरांतसुद्धा असतील. म्हणूनच काही गोष्टींची खबरदारी आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. त्यासाठी सतत त्यांच्याशी संवाद साधला गेला पाहिजे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)





























































