मुद्दा – ‘मिठी’ सोडविण्याचे आव्हान

1284

>> दि. मा. प्रभुदेसाई

गेल्या काही वर्षांपासून ‘मिठी’ नदी स्वच्छ करण्याचे, तिचे सुशोभीकरण करण्याचे उमाळे अधूनमधून काही जणांना येत असतात. ते वृत्तपत्रांतून जाहीर होतात आणि पुढे काहीच होत नाही. मिठी तशीच गटारगंगेच्या स्वरूपात वाहत राहते.

परदेशातील वर्णने आपण वाचत असतो की, अमुक अमुक शहराच्या मधून अमुक अमुक नदी वाहते. तिच्या दोन्ही बाजूंना काठावर सुंदर इमारती आहेत. नदी ओलांडण्यासाठी लहान लहान पादचारी पूल आहेत. दोन्ही तीरांवर असलेल्या बाकांवर तेथील रहिवासी किंवा प्रवासी बसून नदीच्या स्वच्छ पाण्यात पडलेली इमारतींची प्रतिबिंबे पाहत असतात. रात्रीच्या वेळी पाण्यात असंख्य दिवे आणि आकाशातले तारे दिसत असतात. या पार्श्वभूमीवर आपल्या मिठी नदीचे चित्र पहा. निव्वळ गटारगंगा! तिच्या दुर्गंधीपासून लोक जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करतात.

शिवसेनेच्या पुढाकाराने ‘मिठी’ नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याबद्दल अभिनंदन.

अनेक वर्षांपूर्वी मिठी नदीचे पाणी एवढे स्वच्छ होते की, तळाचे दगडगोटे स्वच्छ दिसत. आम्ही तिच्यात पोहायला जात असू. विमानतळाकडे जाणाऱया रस्त्यावर लोक पहाटे जोरबैठकांसारखा व्यायाम करीत. एवढा तो निर्मनुष्य असे. नदी ‘शीव’च्या बाजूला जाऊन खाडीला मिळत असे. समुद्राच्या भरतीमुळे खाडीचे पाणी वाढून ते पूर्वीच्या ‘मुंबई-आग्रा रोड’ म्हणजेच आजच्या लाल बहादूर शास्त्राr मार्गावर येत असे. आम्ही तेथे गणपती विसर्जनाला जात असू. कुर्ल्यापासून शीव तसेच वांद्रय़ापर्यंतचा खाडीचा आणि पुढे समुद्राचा भाग पूर्णपणे मोकळा होता. सध्या ‘लायन्स गार्डन’ असलेल्या ठिकाणी केव्हातरी एखादे मेलेले जनावर टाकलेले असायचे आणि त्यावर गिधाडे ताव मारत असायची. माझ्या माहितीप्रमाणे सध्याच्या शिक्षक नगरच्या आजूबाजूलाच कुठेतरी ब्रिटिशांचा बोट क्लबही होता.

त्यावेळी पर्यावरणाचे कोणालाच एवढे गांभीर्य वाटत नव्हते. म्हणून जेव्हा भंगारवाल्यांचे मिठीवर अतिक्रमण चालू झाले तेव्हा तिकडे फारसे कोणी लक्षच दिले नाही. त्यावेळी एका भंगारवाल्याकडे चोरटय़ा मार्गाने आलेली डिजिटल घडय़ाळे मिळाली. आता कचऱयात जमा होणारी ही घडय़ाळे त्यावेळी फारच मौल्यवान मानली जायची (क्वॉर्टझ्वर चालणारी). तो छापा एका पोलीस अधिकाऱयाने घातलेला असल्यामुळे ती बातमी फारच गाजली होती. साधारण तेव्हापासून मी वृत्तपत्रांत, मनपाकडे तक्रार करण्यास सुरुवात केली होती, पण काहीही उपयोग न होता अतिक्रमण वाढतच गेले. कुर्ला ते शीव हा खाडीचा सर्व मोकळा भाग झोपडय़ा, टपऱया, मंदिरे, मशिदी यांनी व्यापून टाकला. (पूर्वीची कसाईवाडा येथील हिरवीगार टेकडीही अशीच अतिक्रमणांनी भरली गेली आहे). मिठी नदी स्वच्छ आणि सुशोभित करायची तर या सर्वांना येथून हटवावे लागेल. या सर्वांची ‘मिठी’भोवती पडलेली मगरमिठी सोडविणे हे एक फार मोठे आव्हान आहे असे मला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या