
सध्याच्या राजकारणात अनेकजण अनेक प्रकारची ‘मर्कटलीला’ करीत असल्याचे सध्या पाहायला मिळते. मात्र दिल्लीत ल्युटन झोनसारख्या भागात खर्याखुर्या माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे भले भले राजकारणी, खासदार हैराण झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे राजकुमार कश्यप. मध्यंतरी राज्यसभेत शून्य प्रहरात बोलताना त्यांनी त्यांची कैफीयत मांडली. ते म्हणाले, ‘महोदय, बंदरो ने मेरा जीना हराम कर दिया है. गीले कपडे बाहर सूंखने रखू तो कपडे गायब होते है, पौधे लगाऊ तो वो भी उखाड जाते है. कोई मिलने आता है तो उसको भगा देते है, महोदय, जियो तो जीयू कैंसे इन बंदरोसे बचाओ मेरे जैसे और भी सांसद इस समस्या से परेशान है कृपया कुछ किजीए’ असे म्हणत आपली व्यथा मांडल्यानंतर राज्यसभेत चांगलीच खसखस पिकली. मात्र त्यावर कडी केली ती सभापती व्यंकय्या नायडू यांनी. ‘आपने अपनी सुनाई अब मेरी भी दरखास्त सुनो भाई. मैं भी इन बंदरोंसे परेशान हूं, आपही कोई समाधान बताईए’ असे म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
राजधानीतल्या माकडांच्या यापूर्वी अनेकदा तक्रारी आलेल्या आहेत, मात्र माकडांना हात लावला रे लावला की ‘प्राणीमित्र’ वगैरे माकडांपेक्षाही विलक्षण वेगाने अवतरतात. अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावतात. मग ही माकडे नेहमीप्रमाणे ल्यूटन झोनमध्ये स्थिरावतात. राज्यसभेचे सभापती म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यंकय्यांनी एक तर सभागृहातले निर्विश वातावरण दूर करून सभागृहाचे वातावरण खुमासदार बनवले आहे. सभागृहाला एकप्रकारची शिस्त लावली आहे, मात्र सभापतीमहोदयांना आपल्या निवासस्थानातील माकडे अजून वठणीवर आणता आलेली नाहीत!





























































