धर्म, बुरखा आणि खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

क्रीडाविश्वात घडणाऱया घडामोडी अनेकदा केवळ खेळाशी निगडित असतात. त्याच्या पलीकडे जात खेळाडूंचं भावनिक जग, त्यांच्या वैयक्तिक भूमिका, विचारांचं प्रगटीकरण याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. खेळाबरोबरच अशा गोष्टी त्या खेळाडूविषयी वेगळी प्रतिमा निर्माण करतात. अर्थात कधी या स्वागतार्ह असतात तर निंदनीय. नुकतंच बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन हिने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेताना असेच वेगळे विचार मांडले. इराणमधील या स्पर्धेत तिने बुरखा घालण्यास विरोध केला आणि ती या स्पर्धेतून बाहेर पडली. वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधनं आणणारा कोणताही नियम मान्य नसल्याचे संकेत तिने यातून दिले.

हिंदुस्थानची बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन हिने मध्यंतरी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली. कारण होते या स्पर्धेचा नियम. या स्पर्धेत खेळाडूंना बुरखा घालून खेळावयाचे होते. यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधन येत असल्याचे स्पष्टपणे सांगून तिने या स्पर्धेत न खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सौम्या स्वामीनाथनने फेसबुकवर हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, मी जबरदस्तीने बुरखा परिधान करू शकत नाही. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य असले तरीही मला हा वैयक्तिक स्वातंत्र्यावरील हस्तक्षेप आहे असे वाटते. माझ्या या अधिकाराच्या बचावासाठी मी इराणला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये याआधीही स्पर्धा झाल्यात. यामध्ये प्रत्येक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला असेल. पण सौम्या स्वामीनाथन हिने इराणमधील स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय फेडरेशन, तेथील संघटना व आयोजकांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडले आहे.

सौम्या स्वामीनाथनच्या आधी हिंदुस्थानची स्टार नेमबाज हीना सिद्धू हिनेही याच कारणावरून २०१६ सालामध्ये आशियाई नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली होती. इराणमधील तेहरान येथे ती स्पर्धा होणार होती. या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी बुरखा घालून खेळणे हे अनिवार्य आहे. हा नियम खेळभावना व खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे असे मला वाटते. असे परखड मत हीना सिद्धूने त्यावेळी व्यक्त केले होते.

वारंवार होणाऱया दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील क्रीडाविश्व ठप्प झाले आहे. सुरक्षेच्या अभावामुळे बहुतांशी वेळा क्रिकेट दौरे रद्द झालेले आहेत. ही बाब योग्य आहे. आता धर्मावरून खेळांना फटका बसायला नको असे वाटते. मुस्लिम देशांमध्ये स्पर्धा होत असेल तर त्यांनी इतर देशांमधून येणाऱया खेळाडूंवर बंधनं टाकायला नकोत. जेणेकरून त्यांनाही मनमोकळेपणाने खेळता येईल. प्रत्येक खेळाडू हा देशासाठी मैदानात लढत असतो. त्यालाही इतर देशांच्या धर्म, संस्कृतीबद्दल आदर असतो. पण त्या वर जबरदस्तीने कोणतेही नियम लादणे हे योग्य ठरणार नाही.

प्रत्येक देशाची संस्कृती भिन्न – दीपाली देशपांडे
प्रत्येक देशाची संस्कृती ही भिन्न आहे. त्यामुळे खेळाडूंना इतरत्र खेळताना तेथील वातावरण, संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागते. एखाद्या स्पर्धेतील नियम आपल्याला पटले नाहीत, तर त्यामधून माघार घेण्याचा निर्णय खेळाडू घेऊ शकतो, असे मत हिंदुस्थानच्या ज्युनियर नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनी व्यक्त केले.

मीही इराणमध्ये खेळले
दीपाली देशपांडे यावेळी म्हणाली, काही देशांची घटना ही मुळात धर्मावर आधारित आहे. त्यामुळे तेथे काही नियम आहेत. मी काही वर्षांपूर्वी इराणमध्ये खेळायला गेली. त्यावेळी केस दिसू नयेत यासाठी स्कार्फ घालावा लागला होता. तो घालूनच स्पर्धेमध्ये सहभागी झाले. बुरख्यासारखे तोंडावर काहीही लावले नव्हते. तसेच स्पर्धेमध्ये खेळत असताना कोणी याबाबत चौकशीही करीत नाही.