‘नौशाद को म्युझिक देना नही आता’

1345

>> शिरीष कणेकर

दोन माणसांतील वितुष्ट ही कॉमन गोष्ट म्हणावी लागेल. दोन नटांतील किंवा दोन नटय़ांमधील वितुष्ट आपण समजू शकतो. कुठेतरी ते एकमेकांना मांजरासारखे आडवे गेले असतील, कोणीतरी कोणाच्या तरी शेपटावर पाय दिला असेल, पण दोन संगीतकारांत वैर? वितुष्ट? त्यांच्यात कशामुळे वितुष्ट येऊ शकतं? एकाचा सिनेमा दुसऱयानं ‘पळवला’ म्हणून? दक्षिणेतले निर्माते मुंबईत येतायत याचा सुगावा लागल्यावर संगीतकार रवी म्हणे त्यांना एअरपोर्टवरच गाठायचा, त्यांची मुंबईत बडदास्त ठेवायचा. साहजिकच चित्रपटाचं संगीत त्याच्याकडे चालत यायचं. सुरांच्या दुनियेतही चापलुसी, हं?
‘आझाद’ चित्रपटाचं संगीत नौशाद करणार होता. त्यांना संगीत लवकर हवं होतं. ‘‘घाईगडबडीत काम होणार नाही.’’ नौशादनं आधीच स्पष्ट केलं. निर्माते त्याच्याकडून उठून सी. रामचंद्रकडे गेले. सी. रामचंद्रची एकच अट होती, ‘‘मी नौशादपेक्षा एक रुपया जास्त घेणार.’’ निर्माते अर्थात कबूल झाले. सी. रामचंद्रनी कंबर कसली. (म्हणजे काहीच केलं नाही). कारण नौशादचा चित्रपट आपण करतोय याचं भान मात्र त्यांनी सुटू दिलं नाही. सी. रामचंद्र व कलंदर गीतकार राजेंद्र कृष्ण यांना निर्मात्यांनी काम पूर्ण करण्याची मुदत दिली व त्यांना मद्रासमधील एका हॉटेलात ठेवलं. त्यांनी तंगडय़ा पसरून आराम केला. मुदत संपण्याचा दिवस जवळ आला तसे दोघंही खडबडून जागे झाले. ‘तू गाणी दे, मी चाली देतो’ अण्णा रामचंद्र राजेंद्र कृष्णला म्हणाले. त्यांनी एक कागद ओढला व गाणं लिहिलं. अण्णांनी तिथल्या तिथं चाल लावली. अशा पद्धतीनं ‘आझाद’ची सगळी गाणी बघता बघता तयार झाली. अरे, काय टॅलंट की टॅलंट! बसल्या बैठकीत तयार झालेली ‘आझाद’ची अजरामर गाणी देण्याचा मोह आवरत नाही. ही घ्या…
‘कितनी जवाँ है रात, कोई याद आ गया’
– लता मंगेशकर
‘जारी जारी ओ कारी बदरिया’
– लता मंगेशकर
‘कितना हँसी है मौसम’
– लता मंगेशकर व चितळकर (सी. रामचंद्र)
‘देखो जी बहार आयी’ – लता मंगेशकर
‘राधा ना बोले, ना बोले’ – लता मंगेशकर
‘अपलम चपलम, चपलाई रे’
– लता, उषा मंगेशकर
‘मरना भी मुहोब्बत में’
– रघुनाथ यादव व साथी
‘ओ बलियें, चल बलिये’
– लता, उषा मंगेशकर
‘पीके दरस को तरस रही अखियाँ’
– लता मंगेशकर
सज्जादचा नौशादशी उभा दावा होता. गंमत म्हणजे हे सर्वस्वी एकाकी वैर होतं. नौशादचं काहीच म्हणणं नव्हतं. असलं तरी त्याला सज्जादचं कौतुकच होतं. वैराचा हा अजब नमुना म्हणावा लागेल. एकदा के. दत्ता (दत्ता कोरगावकर) यांनी हसत हसत सज्जादला विचारलं, ‘‘तुझं नौशादशी काय वैर आहे? तो तर तुझी तारीफ करीत असतो.’’
‘‘काहीच वैर नाही.’’ सज्जाद निर्विकारपणे म्हणाला, ‘त्याला म्युझिक देता येत नाही एवढंच माझं म्हणणं आहे.’
आता यावर कोण काय बोलणार?
‘मुगल-ए-आझम’चं पार्श्वसंगीत बनत असताना आपल्या या गुणी सहकाऱयाला (पक्षी ः सज्जाद) मदत व्हावी या सद्हेतूनं नौशादनं त्याला मेंडोलिन वाजविण्यासाठी पाचारण केले. सज्जादच्या मस्तकातून तिडीक गेली. त्यानं नौशादला उलट निरोप पाठवला, ‘‘तूच माझ्याकडून संगीत शिकायला ये. कारण तुला काही येत नाही.’’
सज्जाद कितीही गुणी असला तरी वाटेल ते ऐकून घ्यायला नौशाद कोणी लुंगासुंगा होता का? अर्थात, सज्जादच्या मते लुंगासुंगाच होता. तो सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार होता या गोष्टीला सज्जादकडे काहीच किंमत नव्हती. वास्तविक नौशाद हे एक संस्थान होतं. सज्जादच्या लेखी ते खालसा झालेलं संस्थान होतं. काय म्हणावं या कर्माला?
एकदा रेकॉर्डिंग चालू असताना सज्जाद लताला म्हणे म्हणाला, ‘‘लताजी, ठीक तरह से गाइये. ये नौशाद की धुन नहीं है.’’
आता बोला! लता काय बोलली माहीत नाही. नौशादकडे एकापेक्षा एक सुंदर गाणी आपण म्हटली असा आपल्याला भास तर होत नाही ना हा लताला प्रश्न पडला असेल.
‘‘लता तो खुल्ला बोलती है के सज्जाद जैसा कोई भी नहीं.’’ सज्जाद मला एकदा म्हणाला.
माझ्या डोळय़ात अविश्वासाचे भाव पाहून सज्जाद आत गेला व ‘फिल्मफेअर’च्या अंकाची कॉपी घेऊन आला. त्यातली लताची मुलाखत काढून एका अधेरेखित परिच्छेदावर त्यानं बोट ठेवलं. त्यात सज्जादचं नाव अवश्य होतं, पण जोडीनं आणखी दहा-बारा संगीतकारांची नावंही होती. सज्जादला ती दिसतच नव्हती.
निवृत्तीनंतर अनिल विश्वास वर्षातून एकदा कोलकात्याहून मुंबईला एक चक्कर मारायचा. पत्नी गायिका मीना कपूरसह तो पार्ल्याला एका निवांत हॉटेलात राहायचा. एका भेटीत त्याला वाटलं की, हयात जुन्या संगीतकारांचा एक मेळावा भरवावा. त्यानिमित्तानं सगळे भेटतील तरी. त्यानं सज्जादला फोन लावला.
‘‘आणखी कोणाकोणाला बोलावलंय?’’ सज्जादनं संशयानं विचारले.
‘‘नौशाद.’’ अनिलदानं पहिलंच नाव चुकीचं उच्चारलं.
‘‘नौशाद?’’ सज्जाद फोनमधून किंचाळला.
‘‘तो ज्येष्ठ आहे.’’ अनिलदा म्हणाला.
‘‘असेल, पण श्रेष्ठ मीच आहे ना?’’ सज्जाद मूळ पदावर येत म्हणाला.
अनिल विश्वासनं मेळाव्याची कल्पना सोडून दिली. एकदा ओ. पी. नय्यर व मी सज्जादला भेटायला गेलो. पांढऱयाशुभ्र वेशातल्या ओ.पी.नं दारातच सज्जादच्या पायावर सपशेल लोटांगण घातलं. नौशादनंही असंच करावं अशी सज्जादची इच्छा असणार…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या