मुद्दा – स्त्री : एक दुर्गा शक्ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्त्रीचा जन्म मिळायला भाग्य लागते. ज्या जिवाला हा जन्म प्राप्त झाला तो जीव महापुण्यवंत होय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या घडीलाही वारंवार ऐकायला मिळतं की, स्त्रीचा जन्म साधारण असतो. पण भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याचा जन्म उच्च आणि साधारण ठरवणारे आपण कोण? जो सृष्टीचा निर्माता असतो तोदेखील स्त्री या शब्दापुढे नतमस्तक होत असतो. मग तिथं मानव जातीचं काय घेऊन बसलात?

स्त्रीचा उचित सन्मान करणाऱ्या लोकांनी समाजाला समजावून सांगण्याचा आतापर्यंत कितीतरी प्रयत्न केलेला आहे, हे नाकारता येणार नाही.

नारी निंदा मत कर यार, नारी है नर की खाण,

नारी से पैदा हुए राम-कृष्ण और हनुमान!

स्त्री ही सर्व काळ पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या प्रचंड सामथ्र्याचा कर्मनिष्ठेचा ठाव प्रत्यक्ष परमेश्वरालाही लागू शकत नाही, तर आपण कोण आहोत?

स्त्री म्हणजे साक्षात् रणरागिणी, स्त्री म्हणजे दुर्गा, स्त्री म्हणजे महालक्ष्मी, नव्हे नव्हे तर ती प्रत्यक्ष महिषासुरमर्दिनी होय. तिच्या स्त्रीत्वाचा प्रकाश सर्वदूर म्हणजे तिन्ही लोकांत पसरलेला आहे. याच स्त्रीत्वाचा उचित सन्मान करताना कविवर्य ग. दि. माडगूळकर त्यांच्या एका काव्यपंक्तीत म्हणतात की,

‘पिढ्यापिढ्यांना निर्भय आम्ही भारतीय भगिनी,

घराघरांचे दुर्ग झुंजवू झुंजू समरांगणी…

या काव्यपंक्तीतच स्त्रीची महती आपणास समजून येते. खरं तर स्त्रीशिवाय भूतलावरील कुठल्याच व्यक्तीचं अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. आजही स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे. मग साधारणपणे असं असलं तरीही आज या स्त्री जातीला तिच्या अस्तित्वासाठी का म्हणून लढावं लागत आहे? का म्हणून झगडावं लागत आहे?

थोडक्यात, कालखंड कोणताही असो, राजवट कोणाचीही असो (हिंदूंची, मुस्लिमांची वा इंग्रजांची असो) तिच्यावर होणारे अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. घराबाहेर हिंडताना, नोकरीधंद्याच्या निमित्ताने परगावी जाताना किंवा पुरुषवर्गाशी समानतेने वागताना आजही तिला या गोष्टींचा प्रचंड प्रमाणात सामना करावा लागतो आहे.

आजही तिच्याकडे बघण्याची पुरुषांची दृष्टी सर्वसाधारणपणे चांगली नसतेच. खरं तर, स्त्रीजातीवर होणारा अत्याचार हा कोणत्याही कारणाने होत असला तरी तो एकप्रकारे मोठा गुन्हाच आहे. पण समोरच्या नराधमाला शासन करण्यासाठी किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, पाठपुराव्यांसाठी आता तरी या स्त्रीजातीने एकत्रित येऊन आपले सामथ्र्य दाखवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संरक्षणात्मक उपाय म्हणून कराटे शिकणे, शारीरिक ताकद कमाविणेसुद्धा तितकेच मोलाचे आहे. (प्रचंड शक्ती असलेल्या हत्तीला छोटीशी मुंगीसुद्धा हैराण करू शकते.)

समाजातील प्रत्येक पुरुष हा या स्त्रीशी पिता, पती, पुत्र, बंधु, मित्र अशा विविध नात्यांनी जोडलेला आहे. म्हणूनच, पुरुषांच्या मनामध्ये या पवित्र नात्यांची जाणीव निर्माण करणे, जनमत बनविणेसुद्धा आजच्या घडीला तितकेच महत्त्वाचे आहे. (चित्रपट, मालिका, पोस्टर्स यावरची चित्रे स्त्री जातीला कमीपणा आणणारी वाटत नसली, तरी त्यामुळे आपल्यावरच्या अत्याचाराला प्रोत्साहन मिळते हे समाजाने आणि स्त्रियांनीही लक्षात घेतले पाहिजे.)

समाजाची दृष्टी व वृत्ती बदलविण्याचे सामथ्र्य स्त्री वर्गात आहे. पूर्वी ते त्यांनी दाखविले आहे. पुढेही दाखवायला हवे. अहिल्याबाई होळकर, ताराबाई यांच्यासारख्या कर्तबगार ऐतिहासिक स्त्रियांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

कला, व्यवहार, करिअर, संसार यांचा  स्वत:च्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. थोडक्यात येणाNया काळात स्वत:च्या (स्त्री जातीच्या) वागण्याने, पोशाखाने, कर्तबगारीने, आपल्यातील मनोधैर्याचा व सामथ्र्याचा प्रत्यय पुरुषांना आणून देण्याचे जरी स्त्री जातीला जमले तर आणि तरच, स्त्री जातीवर होणाNया अत्याचाराचे प्रमाण भविष्यात हळूहळू कमी व्हायला लागेल.

आज समाजात असंख्य प्रश्न आहेत. त्याची उत्तरे समाजाने द्यायची आहेत. मात्र स्त्रीनेदेखील ती शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. इतिहासात डोकावून पाहिलं तर सावित्रीच्या रूपात शिक्षणाविरुद्ध, राणी लक्ष्मीबाईच्या रूपात व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारीसुद्धा एक स्त्रीच होती. स्त्री जातीमुळेच काळाच्या पटलावर अनेक संस्कृती जन्माला आल्या, वाढल्या आणि बहरल्यासुद्धा. पण आज सर्वकाही हाताशी असताना हीच स्त्री स्वत:ला दुर्बल का समजते आहे? का तिच्यात असलेले साक्षात दुर्गेचे रूप विसरते आहे?

  • आकाश दीपक वाणी