आभाळमाया – पृथ्वीवरचा ‘प्राणवायू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

आपल्याला आपल्या विश्वातलं बरंच कमी कळलंय, एवढं तरी आता नित्यनव्या संशोधनातून कळतंय. त्यामुळे ‘विज्ञानाला अमुक एक गोष्ट कळत नाही’ असं म्हणण्यापेक्षा विश्वातील अनेक गूढ वाटणाऱया गोष्टींमागचा कार्यकारणभाव आपल्याला अजून तरी समजलेला नाही, असं विज्ञानाचे अभ्यासकही मान्य करतात. या त्यांच्या भूमिकेमुळेच नव्या संशोधनाला, चिकित्सक विचारांना चालना मिळते. त्यातून कधी पूर्वीचे सर्वमान्य सिद्धांत चुकीचे ठरल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ सारं विश्व पृथ्वी केंद्रित असल्याचा समज अगदी सतराव्या शतकातही होता. टॉलेमीची पृथ्वी केंद्रित आणि कोपर्निक्सची सूर्य केंद्रित विश्वाची कल्पनाही नंतर बाद ठरली. यात कोणा व्यक्तीचा पराभव नसून वैज्ञानिक प्रगतीमधले ते टप्पे होते असं विज्ञानवादी मानतात. राहू – केतू इतर ग्रहांसारखे ग्रह नाहीत आणि पृथ्वी अंतराळात अधांतरी फिरते, हे आपल्या महाराष्ट्रातील भास्कराचार्यांना बाराव्या शतकाही ठाऊक असण्याचं कारण या विषयांचा सातत्याने केलेला विचार आणि अभ्यास.

आज गोष्ट पृथ्वीवरच्या प्राणवायूची! सूर्यमालेच्या जन्माच्या काळात आपला पालनकर्ता पृथ्वी ग्रह सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला. जनकतारा सूर्यापासून निर्माण झालेले सर्वच ग्रह सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरू लागले खरे, परंतु त्यांच्या आजच्या गती आणि जन्मकाळातील गतीत बराच फरक पडलेला आहे. नवजात ग्रहांपैकी पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती खूपच जास्त म्हणजे सुमारे सहा तासांची होती, त्यात तीन तासांचा दिवस आणि तीन तासांची रात्र! कालांतराने पृथ्वीवरचा जलसाठा वाढला. एकेकाळी पृथ्वीच्या खूप जवळ असलेल्या चंद्राचाही परिणाम त्यावर झाला. सूर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवरच्या सागराला भरती-ओहोटी येऊ लागली आणि या लाटांच्या बलामुळे (टायडल फोर्स) पृथ्वीची दैनंदिन गती हळूहळू मंदावली. चंद्रसुद्धा आता आहे तेवढय़ा 3 लाख 84 हजार किलोमीटरवर जाऊन स्थिरावला आणि पृथ्वीची स्वतःभोवती तेवीस तास, छप्पन्न मिनिटं आणि काही सेकंद किंवा सामान्य भाषेत चोवीस तासांत फिरू लागली. त्यामुळे दिवसाचा वेळ वाढून सूर्यप्रकाश सुमारे बारा तास मिळू लागला.

याचा परिणाम काय झाला? तर आधीच्या कार्बनवर आधारित अतिसूक्ष्म जिवांची सद्दी संपून, नव्याने निर्माण होऊ लागलेल्या ‘प्राणवायू’वर आधारित जीवसृष्टी वेगाने विकसित झाली. ‘फोटोसिंथेसिस’ किंवा सूर्यप्रकाशात हरितद्रव्य निर्माण करणाऱया वनस्पतींपासून प्राणवायूंचा श्वास घेत जगणारे सजीव अवतरले. आपल्या प्रजातीची वाढ तशीच झाली. त्या काळात म्हणते सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर नव्यानेच तयार होऊ लागलेल्या प्राणवायूचं म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण इतकं नगण्य होतं की ते मोजताही आले नसतं. मग सध्या ज्या प्रमाणात ऑक्सिजन पृथ्वीवर आढळतो (21 टक्के) तो आला कुठून? आज त्याच्या शिवाय कोणत्याही सजीवाचं जीवन अशक्य आहे. हवा, पाणी अन्न या सजीवाच्या मूलभूत गरजा. माणसाच्याही त्याच. त्यातली ‘हवा’ म्हणजे हवेतला प्राणवायू या ऑक्सिजनचं प्रमाण एखाद्या आजाराने कमी झालं तर प्राण कंठाशी कसे येतात याचा विदारक अनुभव ‘कोविड’मुळे गेली दोन वर्षे जगातल्या अनेकांना आला आहे.

‘ऑक्सिजन’निर्मितीचं संशोधन करताना संशोधकांच्या असं लक्षात आलं की, पृथ्वीवरचा सूर्यप्रकाशाचा काळ वाढल्यावर ‘सायनोबॅक्टेरिया’ या सूक्ष्म गिळगिळीत, जांभळय़ा रंगाच्या जीवाणुंनी ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली. त्यानंतर 40 कोटी वर्षांत पृथ्वीवर आता आहे त्याच्या एक-दशांश इतकाच प्राणवायू निर्माण झाला. नंतर हे प्रमाण वाढत गेलं आणि वनस्पतींच्या हरितद्रव्यनिर्मितीने वेग घेतला. पुढे जलचर, भूचर, उभयचर आणि शेवटी माणसांपर्यंतचे सारे लहान-मोठे प्राणी या ‘प्राणवायू’वर जगू लागले. जर्मनीच्या मॅक्स प्लॅन्क विद्यापीठातील संशोधक ज्युडिश क्लॅट यांनी असं मत मांडलेलं आहे. कारण प्रयोगशाळेमध्ये, त्यानी सायनोबॅक्टेरिया प्रयोगशाळेत आणून त्याना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश दिला तेव्हा त्यांनी अधिकाधिक प्राणवायू निर्माण केला.

जास्त सूर्यप्रकाश मिळू लागल्यावर समुद्रामधल्या या सूक्ष्मजीवांकडून ऑक्सिजनची वेगवान निर्मिती होऊ लागली यालाही कारण ‘टायडल फोर्स’ असं ब्रेन ऑर्बिकसारख्या सागरतज्ञाला याविषयीचं एक व्याख्यान ऐकताना सुचलं.

असा एखादा क्षण नव्या संशोधनाला चालना देतो ऑक्सिजननिर्मितीच्या प्रक्रियेतील संपूर्ण तांत्रिक माहिती अशा लेखात अचूक स्वरूपात देणं शक्य नसतं. ती क्लिष्टही होऊ शकते. पण आपल्या दृष्टीने महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, पृथ्वीला सध्याची स्वतःभोवती फिरण्याची गती प्राप्त झाल्यानंतर आणि सूर्यप्रकाशाचा सलग काळ वाढल्यानंतरच पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती झाली. स्वतः न जळणारा पण केवळ ज्याच्यामुळेच ज्वलन शक्य असते असा ऑक्सिजन या योगायोगातून निर्माण झाला नसता तर ही चर्चा करायला पृथ्वीवर आपणही नसतो! कारण आपल्या श्वासातून मिळणाऱया ऑक्सिजनवरच शरीरातील ऊर्जेचे मंद ज्वलन आपल्याला निरोगी ठेवत असते. या साऱयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱयांचे मात्र कौतुक वाटते.