लेख – पाकिस्तान-इस्रायलः मागील दाराने मुत्सद्देगिरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनत्कुमार कोल्हटकर

परवेझ मुशर्रफ ते इम्रान खान या पाकिस्तानचा राज्यकर्त्यांना मनातून इस्रायलशी राजनैतिक संबंध जोडायची इच्छा होती असे सांगितले गेले होते, पण पाकिस्तानमधील कडव्या गटांकडून होणारा प्रचंड विरोध लक्षात घेता तेथील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे शक्य झाले नसावे.  पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध जोडण्यासाठी आतुर झालेले आहेत असा इम्रान खान आरोप करत आहेत, पण याच इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनीही मागील दाराने इस्रायलबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता हे ते स्वतः सोयिस्कररीत्या आता विसरले आहेत. 

पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यात सत्तारूढ झालेल्या, शाहबाज शरीफ सरकारची अवस्था तूर्तास ‘आगीतून फुफाटय़ात’ अशी होताना दिसते आहे. सत्ता गमावल्याने सैरभैर झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला घाम फोडला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील अनेक शहरांत मोठय़ा सभा घेऊन शाहबाज शरीफ यांचे सरकार कसे अमेरिकेचे बाहुले बनलेले सरकार आहे या मुद्दय़ावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानच्या जनतेची अमेरिकेच्या प्रति असणारी आत्यंतिक नाराजी इम्रान खान यांनी ओळखली असून या मुद्दय़ावर ते पाकिस्तानमधील जनमानस ढवळून काढताना दिसत आहेत.

पाकिस्तान सध्या ‘कटोरास्तान’ झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये, पण नेहमी भीक देणाऱ्यांपैकी सौदी-अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती यांनी तोंड फिरविले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही अटी-शर्तींवर कर्ज देण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण अटी-शर्ती स्वीकारणे म्हणजे कर संकलन वाढविणे. महागाईने होरपळत असलेल्या नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकणे म्हणजे त्यांची नाराजी ओढविणे हे स्पष्ट आहे.

कसाबसा एक वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे. त्या एक वर्षाच्या काळात सामान्य पाकिस्तानी नागरिकांची नाराजी ओढविणे म्हणजे पुढील वर्षी तेथे होणाऱ्या निवडणुकीत पराभूत होणे हे ओघाने आलेच. त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी पाकिस्तानच्या सध्याच्या शाहबाज शरीफ सरकारची अवस्था आहे. पाकिस्तानी रुपयाची अमेरिकन डॉलरसमोर घसरगुंडी चालू आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे, जीवनावश्यक वस्तूंची टंचाईही जाणवत आहे. पाकिस्तानचा सध्याचा आश्रयदाता चीन पण पाकिस्तानला आणखी कर्ज देण्याच्या मनःस्थितीत नाही. अशा नागरी युद्धाच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानमध्ये नुकत्याच एका बातमीने पुन्हा एकदा जनमानस ढवळून निघाले आहे असे दिसते. अमेरिकेत राहणाऱ्या, पण मूळ पाकिस्तानी असणाऱ्या काही लोकांनी एका स्वयंसेवी संस्थेतर्फे इस्रायलचे अध्यक्ष इसाक हरजोग यांची जेरुसलेम येथे जाऊन भेट घेतली.

या भेटीची माहिती इस्रायलच्या अध्यक्षांनीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिसंवादात दिल्याचे दिसून आले. अनिला अली या मूळ पाकिस्तानी असलेल्या महिलेने आणि तिच्या 15 सहकाऱ्यांनी या भेटीचे आयोजन केले होते असे सांगितले जाते आणि त्यांना इस्रायलचे अध्यक्ष इसाक हरजोग यांची भेट मिळाली हेही लक्षात घेण्याजोगे आहे. आंतरधर्मीय सुसंवाद साधण्यासाठी आपण या भेटीला गेल्याची मखलाशी या शिष्टमंडळाने केली आहे. एक शीख धर्मीय आणि एक ख्रिश्चन धर्मीय व्यक्तीही या शिष्टमंडळात असल्याचे अनिला अली यांनी सांगितले आहे. इस्रायलच्या अध्यक्षांनी आम्हाला खूपच चांगली वागणूक दिल्याचेही या अनिला अली यांनी सांगितले आहे. पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या 15 अनिवासी पाकिस्तानी लोकांनी या शिष्टमंडळात भाग घेतला होता असे त्यांनी सांगितले. अहमद कुरेशी नावाचा पाकिस्तानी टेलिव्हिजनचा पत्रकारही या 15 जणांमध्ये होता असे जाहीर झाले आहे. या पत्रकाराला या वाहिनीमधील नोकरीवरून हाकलण्यात आल्याचे सांगितले गेले.

अर्थात शाहबाज शरीफ यांनी या भेटीशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही असे सांगितले आहे. कोणीही पाकिस्तानमधून या भेटीसाठी गेले नव्हते असा खुलासा शाहबाज शरीफ यांनी केलेला आहे. हे सर्व पाहता शाहबाज शरीफ यांना अडचणीत आणण्यासाठीच ही भेट घडवली गेली का असे पाकिस्तानी माध्यमात बोलले जात आहे.

पाकिस्तानने अजूनही इस्रायलला राजनैतिक मान्यता दिलेली नाही. या दोन्ही देशांचे राजदूतावास परस्परांच्या देशात नाहीत. हे पारपत्र इस्रायल सोडून इतर सर्व देशांसाठी ‘पात्र’ आहे, असे पाकिस्तानच्या पारपत्रावर (पासपोर्टवर) स्पष्टपणे लिहिलेले असते असे सांगतात. यहुदी लोकांबद्दल सामान्य पाकिस्तानी लोकांच्या मध्ये राग आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके तर इस्रायलला मनसोक्त शिव्याशाप देताना दिसतात. पॅलेस्टाईनच्या नेत्यांबद्दल पाकिस्तानी नेत्यांना प्रेमाचे भरते येताना दिसते.

मुस्लिम जगतातील ‘दादा’ असणाऱ्या सौदी-अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या दोघांनीच आता इस्रायलबरोबर जुळवून घेतले असे नसून पाकिस्तानच्या लाडक्या तुर्कस्ताननेही आता इस्रायलबरोबर प्रेमाचा वार्तालाप सुरू केला आहे. बहारीन, इजिप्त, ओमान यांनीही इस्रायलबरोबर राजनैतिक संबंधात आघाडी घेतलेली आहे. तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री ‘मेवलुत काऊसोग्लू‘ यांनी नुकतेच इस्रायलबरोबर बोलणी केल्याचे जगाने बघितले. तुर्कस्तानही सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करीत असून तो देशही आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करताना दिसतो आहे. तुर्कस्तानचे चलन ‘लिरा’चे गेल्या दोन वर्षांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये वेगाने अवमूल्यन झाले असून तो देशही सैरभैर झालेला आहे. पाकिस्तानच्या या मित्रदेशांनी इस्रायलबरोबर जुळवून घेतल्यामुळे पाकिस्तानचे नेतेही इस्रायलबरोबर जुळवून घेऊन इच्छितात की काय न कळे.

परवेझ मुशर्रफ ते इम्रान खान या पाकिस्तानचा राज्यकर्त्यांना मनातून इस्रायलशी राजनैतिक संबंध जोडायची इच्छा होती असे सांगितले गेले होते, पण पाकिस्तानमधील कडव्या गटांकडून होणारा प्रचंड विरोध लक्षात घेता तेथील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे शक्य झाले नसावे.  पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध जोडण्यासाठी आतुर झालेले आहेत असा इम्रान खान आरोप करत आहेत, पण याच इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनीही मागील दाराने इस्रायलबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता हे ते स्वतः सोयिस्कररीत्या आता विसरले आहेत.  पाकिस्तानची दुसरी अजून एक मोठी अडचण म्हणजे इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध जोडणे म्हणजे पाकिस्तानच्या शेजारी देशाला म्हणजे इराणला नाराज करणे हाही आहे. 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू  हे ओमानहून तेल अवीवला परतताना वाटेत इस्लामाबादला थांबले होते आणि त्यांची पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर चर्चाही झाल्याचे बोलले गेले होते. पाकिस्तानच्या त्यावेळच्या इम्रान खान यांच्या सरकारने त्याचा इन्कार केला होता तरी पाकिस्तानच्या ज्या विमानतळावर हे विमान उतरले होते, त्या विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने इस्रायलचे निशाण असलेले विमान उतरल्याचे पाकिस्तानमधील माध्यमांना सांगितले होते.

[email protected]