आभाळमाया – ग्रहगतीचे इंगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

बदलत्या जागतिक हवामानाचा फटका गेली अनेक वर्षे आकाशदर्शनाच्या कार्यक्रमांना बसत आहे. पूर्वी म्हणजे 1985 मध्ये अशा कार्यक्रमांचा प्रारंभ आम्ही केला तेव्हा एखादा अपवाद वगळता आकाश कमालीचे निरभ्र आणि स्वच्छ असायचं. मुंबईजवळच्या वांगणी येथून आकाशगंगेची मनोहारी दर्शन घडायचं.

मात्र काळाच्या ओघात वाढतं प्रदूषण, बदलता मोसम आणि रात्र कृत्रिम दिव्यांनी प्रकाशित राहण्याचं वाढतं प्रमाण यामुळे नजरेच्या टप्प्यातील तारांगण ‘संकोचलं’! शहरी भागातून तर जेमतेम ठळक ग्रह आणि आणि व्याधासारखे काही तारे किंवा मृगासारखं एखादं नक्षत्र दिसतं. जगात अनेक ठिकाणी हीच अवस्था आहे आणि ती वाढतच जाणार असल्याने हौशी आकाश निरीक्षकांच्या मनात अस्वस्थता आहे. येत्या काही महिन्यांत म्हणजे मे महिन्यापर्यंत आकाश निरभ्र राहिलं तर सध्या अवकाशात पहाटे ठळकपणे दिसत असलेल्या ‘लिओनार्ड’ धूमकेतूविषयी नंतर लिहिता येईल. खग्रास सूर्यग्रहण, धूमकेतू, उल्का वर्षाव अशा खगोलीय गोष्टी सर्वसामान्य लोकांना प्रेक्षणीय वाटतात आणि त्यातूनच ‘विश्वा’ची माहिती घेण्याचं कुतूहल जागृत होतं. अनेक तरुण मुलं-मुली अशा कार्यक्रमांमधून स्फूर्ती घेऊन खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवतात. यंदाही ‘ऑनलाइन’ झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलीय ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा क्रमांक पहिला आहे ही गोष्ट आपल्याला भूषणावह म्हणावी लागेल.

ज्यावेळी प्रत्यक्ष आकाश दिसणं शक्य नसतं तेव्हा असे विद्यार्थी, अभ्यासक थोडा ‘थिअरॉटिकल’ किंवा पुस्तकी, गणिती अभ्यास करून विश्वरचनेची माहिती जाणून घेतात, तर आमच्या कार्यक्रमातून खगोलशास्त्राची फारशी माहिती नसणारे अनेक जण उत्सुकतेने महत्त्वाचे प्रश्न विचारतात. अशीच चर्चा परवा रंगली ती फोनवरून. ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेतच का आणि कधीपासून फिरायला लागले? हा एरवी साधा वाटणारा प्रश्न आहे.

या प्रश्नाच्या मुळाशी जायचं तर पाच अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याची निर्मिती झाल्यापासून हळूहळू त्याच्याभोवती तयार झालेल्या ग्रहमालेपर्यंत जावं लागतं. सूर्य हा आपल्या ग्रहमालेचा जनक तारा. आपल्या पृथ्वीसकट पार नेपच्यून आणि प्लुटो तसेच किपर बेल्टपर्यंत साऱ्यांचा जन्मदाता तोच आहे. त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या कक्षा अगदी वर्तुळाकार नाहीत आणि म्हणूनच कदाचित ते अब्जावधी वर्षे ग्रहमालेत आपापल्या मार्गावर टिकून आहेत. अगदी वर्तुळाकार कक्षेतील ग्रह बाहेरील धक्क्याने कक्षा किंचितही विचलित झाली असती तर गरगरत आतल्या कक्षेत जात जात सूर्यातच विलीन झाले असते. ग्रहमालेच्या निर्मितीच्या काळात अशा अनेक ‘वस्तू’ सूर्यावर आदळल्याच असतील, परंतु अशाच नैसर्गिक आदळआपटीमधून ‘धक्का’ मिळून सर्व ग्रहमाला विवृत्ताकार किंवा लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरू लागल्याने आपल्या सौर संकुलातील सर्व सभासद आपापल्या जागी अबाधित राहिले.

अशा लंबवर्तुळाकार कक्षेमुळे पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ, उपसूर्य स्थानी म्हणजे 14 कोटी 71 लाख कि.मी. अंतरावर, तर कधी अपसूर्य स्थानी अर्थात 15 कोटी 21 लाख कि.मी. अंतरावर असते. साधारण जानेवारीत ती सूर्याच्या जवळ तर जुलैमध्ये सूर्यापासून दूर असते. त्यामुळे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सध्या सुरू असलेला उन्हाळा  कडक असतो, तर आपल्याकडे कडाक्याची थंडी पडते. अशी ही ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षेची सोपी गोष्ट.