ठसा – डॉ. श्री. मा. भावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

स्वतंत्र वैचारिक मांडणीतून नवनवीन विषयांवर लेखन करणारे भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. मा. भावे यांचा  गणिती तज्ञ, तर्कशास्त्र आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून लौकिक होता. गणित आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए. आणि गणित शास्त्रात एम.ए.ची पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर गणित आणि ज्ञान विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळविली. वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि गणित शास्त्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ते काही काळ आयआयटी पवई येथे कार्यरत होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटचे ते सदस्य होते. वाई येथील प्रज्ञा पाठशाळेचे ते पदाधिकारी होते. गणित आणि तत्त्वज्ञान विषयाशी संबंधित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांचे 25 शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळात आधी सचिव आणि नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तीस वर्षे योगदान देऊन त्यांनी संस्था नावारूपास आणली. भावे यांनी चार पुस्तके लिहिली. ‘जीर्णोद्धार’ या त्यांच्या पुस्तकाला शब्द फाऊंडेशनचा दुर्गाबाई भागवत पुरस्कार मिळाला आहे. भावे यांनी अनेक इतिहास अभ्यासकांना मौलिक मार्गदर्शन केले. ‘सरखेल कोलंबस’, ‘थॉमस पेन जेनी ग्रंडे’,  ‘जीर्णोद्धार’,  युजिन ग्रांड’ या पुस्तकांचे लेखन त्यांनी  केले होते. तसेच शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ या ग्रंथाचा प्रतिवाद करणाऱया ग्रंथाचे संपादन डॉ. भावे यांनी केले. विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.  ‘नवभारत’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. अतिशय अडचणीच्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाची धुरा श्री. मा. भावे यांनी उत्तम पद्धतीने सांभाळली. इतिहासाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचा  ना. ह. आपटे पुरस्कार त्यांना मिळाला होता. भावे  यांच्या निधनाने इतिहास, तर्कशास्त्र्ा आणि गणित या विषयातील साक्षेपी अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे.