
>> दिलीप जोशी
आपल्याला सर्वात जवळचा तारा कोणता? अर्थातच आपला सूर्य! तो आपल्यापासून ‘अवघ्या’ पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर आहे. मग आणखी जवळचा तारा कुठला असणार? असलाच तर तो आपल्या सूर्यमालिकेपलीकडे असायला हवा. तसे आपल्या आकाशगंगेत (मिल्की वे) सुमारे 200 अब्ज तारे सामावलेले आहेत. यापैकी आजपर्यंत तरी कोणत्याही ताऱयाभोवती आपल्यासारखी ग्रहमाला सापडली असली तरी जीवसृष्टी सापडलेली नाही. याचा अर्थ तशी जीवसृष्टी विश्वात अन्य कोठी नसेलच असे मुळीच नाही. ‘ड्रेक’ यांच्या अनेक निकषांनुसार वसतीयोग्य (हॅबिटेबल) ग्रह कुठल्या ना कुठल्या ताऱयाभोवती फिरत असेल असे मानायला भरपूर वाव आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे आपलंच आपल्या पृथ्वीवरचे अस्तित्व. विराट विश्वाच्या पसाऱयात आपण अस्तित्वात येऊ शकतो तर अन्य कोठे तसेच कुणीतरी नसेलच असे कसे म्हणणार? कदाचित आपले आजचे संशोधन त्याबाबतीत तोकडे पडत असेल, पण शोधाचे प्रयत्न सुरू आहेत. एका तारकासमूहाच्या दिशेने आपण यासंदर्भात एक संदेश पाठवला आहे. त्याविषयी योग्य वेळी माहिती घेऊच.
आजचा विषय आपल्या सूर्यमालेबाहेरच्या सर्वात जवळच्या ताऱयाचा. रात्रीच्या आकाशात आपल्याला ठळकपणे दिसतो तो मृग नक्षत्रातला व्याध तारा. त्यानंतर क्रमांक लागतो तो अगस्तीचा आणि तिसऱया क्रमांकाचा आहे अगदी जवळचा मित्र तारकासमूह. नुसता डोळय़ांनी तारे ठळक किंवा अंधुक दिसतात त्यावरून त्यांच्या अंतराचा अंदाज येत नाही. जवळची गोष्ट मोठी आणि दूरची लहान दिसते याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. ताऱयाची आपल्याला दिसणारी तेजस्विता (ठळकपणा) ही अंतरसापेक्ष असते. कदाचित दूरच्या फिकट वाटणाऱया ताऱयाची निरपेक्ष (म्हणजे प्रत्यक्ष) तेजस्विता आणि आकार आपल्या सूर्याच्या कैक पट मोठा असू शकतो. अशा ताऱयांचीही माहिती लेखनाच्या ओघात येईल.
तर आपला ‘शेजारी’ तारकासमूह आहे सेंटॉरस किंवा नरतुरंग. दक्षिण आकाशात तो मार्च-एप्रिलमध्ये दिसतो. आपल्या सूर्याच्या तुलनेत त्याचं आपल्यापासूनचं अंतर सूर्य-पृथ्वी अंतराच्या 92950 पट आहे. या आकडय़ाला 15 कोटींनी गुणल्यावर किती उत्तर येते पाहा. थोडक्यात अल्फा, बीटा आणि प्रॉक्झिमा सेंटॉरी हे तारे आपल्यापासून 36000 अब्ज किलोमीटर अंतरावर आहेत. अगदी बारकाईने सांगायचं तर 9460,730,472,580,402 इतक्या किलोमीटर अंतरावर हा ‘जवळचा’ मित्र आहे! म्हणूनच अशा संख्या प्रकाशवेगाची मदत घेऊन सांगितल्या जातात. एका सेकंदात प्रकाश 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. या गतीने तो आपल्या एका वर्षात 9460 अब्ज किलोमीटर पळतो. या वेगाने साडेचार वर्षे सतत दौड केली तर ‘मित्र’ ताऱयापर्यंत जाता येईल. जगातलं कोणतंही रॉकेट वेगाच्या बाबतीत या वेगाच्या जवळपासही येणार नाही.
बरं, शेजारी ताऱयाशी ‘मैत्री’ करण्याचा आपला हेतू काय असणार? तर तिथे असलेल्या कोण्या ग्रहावर कोणी सजीव आहे का याचा शोध घेणे, या तीन ताऱयांच्या कुटुंबात ए आणि बी हे जोडतारे परस्परांभोवती फिरतात. तिसरा प्रॉक्जिमा सेन्टॉरी जो आपल्याला अधिक ‘जवळ’ आहे. तो स्वतंत्र आहे. म्हणजे तो आधीच्या दोघांभोवती परिक्रमा करतो ए आणि बी तारे एकमेकांभोवती 80 वर्षांत एक फेरी पूर्ण करतात, तर तिसरा तारा त्यांच्याभोवती 5 लाख वर्षांत फेरी मारतो. हा तिसरा तारा लालखुजा आहे. मुळात जोडतारे आणि तिसऱया ताऱयातलं अंतर आहे सूर्य-पृथ्वी अंतराच्या 13000 पट! म्हणजे आपल्या ग्रहमालेतला शेवटचा ग्रह नेपच्युन सूर्याभोवती जेवढा दूर आहे त्याच्याही 430 पट.
रॉबर्ट इनेस यांना द. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथल्या वेधशाळेतून प्रथम हे तारे दिसले ते 1915 मध्ये. या ताऱयांच्या त्रिकुटात आपल्या ग्रहमालेला सर्वात जवळची ‘दुसरी’ पाच ग्रहांची ग्रहमाला असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी लालखुजा ताऱयाभोवती भ्रमण करणारा ग्रह अलीकडे म्हणजे 2016 मध्ये दिसून आला.
आपल्या ग्रहकुटुंबातील ‘नातेवाईकांची’ भेट घेता घेताच आपली दमछाक होतेय. अवघ्या सात कोटी किलोमीटरवर असलेल्या मंगळाच्या भेटीसाठी जगाचा केवढा आटापिटा चाललाय. तीही सोपी गोष्ट नाही. मग दुसऱया ताऱयाभोवतीच्या ग्रहांवर भर घालणाऱया आणि विश्वाचं विराटरूप क्षणोक्षणी सिद्ध करणाऱया अशा माहितीमधून आपल्याला आपल्या ‘अतिसूक्ष्म’ अस्तित्वाची जाणीव होते आणि या अतिसूक्ष्म मानवी मेंदूला विराट विश्वाचा आवाका अस्तित्वाची जाणीव होते. आणि या अतिसूक्ष्म मानवी मेंदूला विराट विश्वाचा आवाका समजतो हे त्याहूनही विस्मयकारी आहे.


























































