ठसा – प्रकाशसिंग बादल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मिस्त्री

राष्ट्रीय राजकारणात, विशेषतः राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पितामह असा लौकिक असलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या रूपाने वाजपेयी सरकारच्या काळातील निष्ठsने नीतिमान राष्ट्रीय राजकारण करणाऱया पिढीतील सर्वात महत्त्वाचा घटक काळाच्या पडद्याआड गेलाय.

प्रकाशसिंग बादल यांचे संपूर्ण कुटुंबच राजकारणात होते. 1959 मध्ये त्यांचे सुरिंदर कौर यांच्याशी लग्न झाले. त्यांना सुखबीरसिंग बादल आणि प्रणित कौर ही दोन मुले होती. परंतु, सुरिंदर कौर यांचे 2011 मध्ये कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. धाकटे भाऊ गुरदाससिंग बादल हेही राजकारणात होते. त्यांचे पुतणे मनप्रीतसिंग बादल पंजाबचे अर्थमंत्री होते. आणीबाणीच्या काळात नागरी स्वातंत्र्य चळवळ केल्याबद्दल त्यांना अटक करून कर्नालच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. नंतर ते अकाली दलाच्या राजकारणात सक्रिय झाले. 1996 ते 2008 पर्यंत ते अकाली दलाचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय राजकारणाच्या इतिहासात काँग्रेसशिवाय राष्ट्रीय राजकारणाची मोट बांधण्याचा इतिहास घडवण्याचा विक्रम प्रकाशसिंग बादल यांच्या नावे जातो. प्रारंभीच्या काळात ते जनता पार्टीसोबत राष्ट्रीय राजकारणात उतरले. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते कृषिमंत्रीही हेते. परंतु, राष्ट्रीय राजकारण त्यांना फारसे रुचले नाही. त्यांनी अडीच महिन्यांत राजीनामा दिला आणि पंजाब राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहिले.

यानंतर भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन अनेक भाजप नेत्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध असल्याकारणाने दहावेळा आमदार व पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या बादल यांनी 1992 मध्ये बाबरी मशिदीच्या पतनानंतर भाजपसोबत राहून भाजपला एक प्रकारे हिंमतच दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी 1996 ते 99 या काळात स्वतः प्रयत्न करून तब्बल 13 प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत आणून ‘एनडीए’ अस्तित्वात आणली.

विशेष म्हणजे भाजप आपल्या स्वभावानुसार पंजाबात त्यांच्याविरोधात होता, तरीही राष्ट्रीय राजकारणात त्यांनी पंजाबातील पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. 1996 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 161 जागा मिळाल्या होत्या, तेव्हा बादल सरळ दिल्लीच्या पंजाब भवनात गेले आणि वाजपेयी यांना भेटून शिरोमणी अकाली दल तुमच्यासोबत आहे, असा शब्द त्यांनी दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी ओमप्रकाश चौटाला यांच्या लोकदलासही भाजपला पाठिंबा द्यायला लावला. शिवसेना तर पहिल्यापासूनच एनडीएची सदस्य होती. परंतु, वाजपेयी यांचे नीतिमान सरकार 13 दिवसांतच कोसळले. यानंतर देवेगौडांचे सरकार आले. परंतु, बादल देवेगौडांसोबत गेले नाहीत. 1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत आलेले सर्व 13 पक्ष एकत्र राहून भाजपच्या नेतृत्वात निवडणूक लढवतील, यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत भाजप 161 वरून 182 वर गेला. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांचे सरकार 13 महिने टिकले, ते केवळ एका मताने पराभूत झाले. 1999 मध्ये पुन्हा एनडीए बहुमतात आले. यावेळी मात्र वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला शह देऊन भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेच्या बरोबरीनेच बादल यांनी केले. त्यामुळे भाजपचा प्रत्येक नेता बादल यांचा अतिशय सन्मान करीत असे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाचे नाते रक्तामांसाचे आहे, असे बादल म्हणत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर बादल यांना हिंदुस्थानचे नेल्सन मंडेलाच म्हणायचे. ‘बादल साहब जैसे लोगों का बस इतना ही गुनाह था, कि सत्ता में बैठे लोगों से उनके किचार अलग थे।’ असे उद्गार नरेंद्र मोदी यांनी एकदा बादल यांच्याविषयी काढले होते. मात्र हेच मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा मोदी व त्यांच्या पक्षाकडून बादल व त्यांच्या शिरोमणी अकाली दलाची अवहेलनाच झाली. वैचारिक मतभेद होताच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दय़ावर बादल यांचा अकाली दल एनडीएतून बाहेर पडला.मोदी सरकारात असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार व त्यांच्या सून हरसिमरत कौर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तथापि रक्तामांसाचे नाते असलेल्या अकाली दलासोबतचे संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्नही नंतर मोदी व भाजपने केले नाहीत. 2022 हे वर्ष बादल यांच्यासाठी व त्यांच्या पक्षासाठी फारसे चांगले ठरले नाही. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, ‘तुम्ही हरलात!’ तेव्हा त्यांचे वक्तव्य त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते हे सांगणारे होते. ते म्हणाले, ‘माझ्या खोलीत तुम्ही युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांचा फोटो लावा. एवढासा त्यांचा देश, परंतु एवढय़ा बलाढय़ रशियाशी अद्यापही तो लढतोय, त्याच्या तुलनेत निवडणुकीतील आपला पराभव म्हणजे काहीच नाही, अशा लढाऊ बाण्याचे हिंदुस्थानच्या राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आता अस्तंगत झाले आहे.