राम मंदिर हेच राष्ट्रमंदिर

>> विलास पंढरी

 हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमी या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या प्रभू रामांचा जन्म झाला म्हणून हा दिवस देशभरात दरवर्षी  रामनवमी (रामजन्मोत्सव) म्हणून साजरा करतात.  संशोधक असे सांगतात की, रामाचा जन्म इसवी सनपूर्व 5114 साली 10 जानेवारी रोजी झाला होता. याचा अर्थ असा की,  7135 वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्र जन्माला आले होते. हा शोध ‘वाल्मीकी रामायणा’त उल्लेखित ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि संपूर्ण भारतवर्षात सापडलेल्या पुरातात्त्विक अवशेषांच्या आधारावर करण्यात आला आहे. म्हणजे तारखेप्रमाणे विचार केल्यास गेल्या 10 जानेवारी 2021 रोजी प्रभू रामचंद्रांची 7135 वी जयंती होती असे म्हणावे लागेल. अर्थात देवदेवतांची जयंती आपण तिथीनुसार साजरी करत असल्याने आज आपण रामजन्मोत्सव साजरा करीत आहोत.

यंदाच्या 15 जानेवारी ते 25 फेब्रुवारी असे 44 दिवस राममंदिर ट्रस्टने अयोध्येतील भव्य राममंदिर निर्मितीसाठी निधी संकलन अभियान चालवले.लक्ष्यित रक्कम(टार्गेटेड अमाऊंट ) अकराशे कोटी रुपये ठरवण्यात आली होती. विशेष म्हणजे देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी या देणगी संकलनाला एवढा भरभरून प्रतिसाद दिला की, अडीच हजार कोटी रुपये जमा झाले. या सर्वधर्मीय प्रतिसादाने श्रीराम हे सर्व धर्मीयांचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. मोठय़ा उत्साहाने आणि आनंदाने लोक प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिर निर्माणासाठी हिंदुस्थानातील सर्व धर्मीयांनी आर्थिक सहभाग दिला  आहे. तशातच यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाचा प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला होता.

राममंदिर न्यासामार्फत राबवलेल्या समर्पण निधी अभियानाला अपेक्षेपेक्षा भरघोस प्रतिसाद मिळाला. अडीच हजार कोटी रुपयांचा निधी जमा केला. यावर उर्वरित पैशांमधून संपूर्ण अयोध्या शहराचा विकास करावा असा सल्ला काही संतांनी दिला आहे, तर तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी सीतामाईच्या नावानं अयोध्येत संस्कृत विद्यापीठ सुरू करावं असं सुचवलं आहे.

शहरात प्रत्येकाला मोफत दूध देता यावं यासाठी गोशाळा स्थापन करावी असंही परमहंस दास यांनी म्हटलं आहे. निर्मोही आखाडय़ाचे महंत धनेंद्र दास यांनी अयोध्येतल्या अन्य मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी वापरला जावा अशी सूचना केली आहे. समाजातील अनेक लोकांना अजूनही यात खारीचा वाटा उचलण्याची इच्छा असल्याचे अनेकांशी चर्चा करताना आढळून आले. मंदिर बांधून झाले म्हणजे हे राष्ट्र निर्माणाचे कार्य संपले असे नाही. राममंदिर न्यासाकडे पैशांची कमी आहे असेही अजिबात नाही, पण भविष्यातील नैमित्तिक कार्ये, भाविकांना देण्यात येणारा प्रसाद, भोजन, न्यासामार्फत केली जाणारी राष्ट्र व समाजोपयोगी कार्ये यासाठीही भाविक देणगी देऊ शकतात. डोनेशन विंडो ओपन केल्यावर मंदिर निर्माण, अन्नदान, आरती, भोग प्रसाद आणि शृंगार यापैकी कशासाठी दान करायचे ते ठरवता येते. याचाच अर्थ ‘समर्पण निधी’ ही आता कायम सुरू असणारी प्रक्रिया असणार आहे.

अयोध्येतील भव्य राममंदिर उभारणी म्हणजेच राष्ट्रमंदिर निर्माण होत असताना चांगल्या कामाला प्रतिसाद देण्याची हिंदुस्थानींची असलेली मूलभूत वृत्तीही अधोरेखित झाली आहे. पाचशे वर्षांच्या लढय़ानंतर  आता रामजन्मभूमी कायदेशीररीत्या मुक्त झाल्याने कोरोना साथीच्या प्रकोपाने गेल्या वर्षीप्रमाणेच रामजन्म आनंदोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करता येत नसला तरी सर्वांच्या मनामनात आनंद तर आहेच.

आपली प्रतिक्रिया द्या