ठसा – रंगनाथ पठारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील प्रख्यात कथा-कादंबरीकार तथा संगमनेर येथील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख प्रा. डॉ. रंगनाथ पठारे यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. ज्याचे वितरण 27 फेब्रुवारी रोजी म्हणजेच मराठी भाषादिनी, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मुंबईत होणार आहे. प्रा. पठारे यांनी राज्य सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्षपद भूषवले असून राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, साहित्य अकादमी, भाषा सल्लागार समितीचे तसेच राज्य पुरस्कार निवड सल्लागार समितीचे तसेच राज्य पुरस्कार निवड समितीचे सदस्यपदही भूषविलेले आहे. विविध शासकीय समितीच्या माध्यमातून त्यांचे कार्य जाणकारांसमोर तर आहेच. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भौतिकशास्त्र्ााचे प्राध्यापक राहिलेले पठारे यांनी मराठी साहित्यात आपल्या कसदार, दमदार लेखनाने स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. त्यामुळे त्यांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्काराने होत असलेला गौरव समस्त मराठी रसिक, प्रेक्षक आणि वाचक यांच्यासाठीही नक्कीच अभिमानास्पद आहे.

मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, समीक्षा अशा वजनदार प्रांतात त्यांनी विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेले आहे. 14 कादंबऱया, 7 कथासंग्रह, 7 समीक्षात्मक लेख संग्रह, दोन अनुवाद अशा वाङ्मय प्रकारातून रंगनाथ पठारे वाचकांना माहीत आहेत. अनेक कादंबऱ्यांचे कन्नड, इंग्रजी, हिंदीमध्ये अनुवाद झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या लेखनावर 9 अभ्यासकांनी पीएच.डी. संपादन केली असून त्यांच्या साहित्यावर आधारित चार पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. विविध वाङ्मयीन नियतकालिकांनीही रंगनाथ पठारे यांच्या समग्र साहित्याचा साक्षेपी आढावा घेणारे विविध विशेषांकही प्रसिद्ध केले आहेत. मुळातच रंगनाथ पठारे यांचा स्वभाव विविध शक्यतांशी खेळणारा आहे. संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले कथालेखन क्षेत्र बहुआयामी केले. कथा म्हणजे एका सत्याचा शोध आणि त्याला समकालीन वास्तवाने दिलेली तीक्र प्रतिक्रिया किंवा एखाद्या भावलेल्या विषयाच्या संदर्भात स्वतःच्या अंतरंगात चाललेली जीवघेणी घालमेल असते. तीच घालमेल पठारे यांच्या अनेक कथांच्या माध्यमातून आलेली आहे आणि हीच घालमेल वाचकांच्या मनास खूप आत घेऊन जाते. अशाच लेखन प्रक्रियेतून ते मराठी लघुकथेला मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात. म्हणूनच आजही त्यांच्या अनेक कथा प्रगल्भ प्रतिभेची साक्ष देतात. पठारे यांची साहित्यसंपदा प्रचंड आहे. यातील पठारे यांची अलीकडील महत्त्वाची बृहद् कादंबरी म्हणजे ‘सातपाटील कलावृत्तांत’ ही गाजत असलेली व वाचकप्रिय ठरलेली कादंबरी होय. 796 पानांची असून ती केवळ आकारमानानेच मोठी नसून त्यात आवाका, काल आणि अवकाशही मोठा आहे. ‘सात पाटील कुलवृत्तांत’मधील कालखंड 1289 पासून सुरू होऊन 2019  मध्ये संपतो. मराठी साहित्याला सकस कथासंग्रह व दर्जेदार कादंबरी देणाऱया पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या कादंबरीचा 1999 साली साहित्य अकादमी पुरस्कारासाठी सन्मान झाला आहे. एखाद्या कथा किंवा कादंबरी लेखनाचा आराखडा निश्चित झाला की, ते त्यांच्या पात्रांना मुक्तपणे वावरू देतात. त्यामुळे साहित्यातील पात्रांचे व्यक्तिमत्त्व वाचकांच्या मनात घर करीत असते. वाचकांना आवडते म्हणून ते लिहीत नाहीत किंवा आपण लिहिलेले वाचकांना आवडलेच पाहिजे असाही त्यांचा आग्रह अजिबात नसतो. हेच तर त्यांच्या लेखनाचे व कार्यशैलीचे वैशिष्टय़ मराठी साहित्यरसिकांना भावत असते. म्हणून त्यांना मिळालेला ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार अधिक महत्त्वाचा वाटतो.

  • प्रशांत गौतम