
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाला देशाच्या तिरंग्याला सलाम करताना गर्व दाटून येतो आणि सैन्यदलात भरती होण्याची सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी येतेच. कॅप्टन सचिन वसंत चव्हाण यांच्या लष्करात जाण्याच्या इच्छेचं बीज अशाच वयात रुजलं गेलं. लष्कराबाबतची मालिका बघताना, बातमी वाचताना त्यांना वेगळाच हुरूप यायचा. लष्करात रुजू होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न त्यांनी मनाशी बाळगलं. त्यादृष्टीने प्रयत्नात सातत्य ठेवलं आणि आज सैन्यदलातील एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहून ते देशसेवा करीत आहेत. सैन्यदलात जाण्यासाठी त्यांनी स्वतŠची मानसिक आणि शारीरिक तयारी केली. कांजूर येथे शालेय शिक्षण घेऊन के. जे. सोमय्या महाविद्यालयात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मर्चंट नेव्ही हे मानसिक आणि शारीरिक क्षमता आजमावणारं क्षेत्र. करीअरच्या दृष्टीने कॅ. सचिन चव्हाण यांनी सुरुवातीला हे क्षेत्र निवडलं. मर्चंट नेव्हीच्या सगळ्या लेखी व तोंडी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत 2008 पासून 2015 पर्यंत फॉरेन गोईंग ऑफिसर पदाच्या सर्व परीक्षा ते उत्तीर्ण झाले. 2015 मध्ये कॅप्टन या परीक्षेमध्ये ते देशात पहिले आले. याकरिता त्यांचा गौरवही करण्यात आला. कॅप्टन सचिन चव्हाण यांच्या या यशाची दखल ‘सेलर टुडे’ या आंतरराष्ट्रीय मासिकानेदेखील घेतली. मात्र भारतीय सैन्यदलात काम करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच दरम्यान 2019 मध्ये सचिन चव्हाण यांनी सैन्यदलाची परीक्षा उत्तीर्ण केली. 2019 च्या तुकडीत सैन्याच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या सर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱया 10 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातून एकमेव कॅप्टन सचिन चव्हाण होते. यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई आणि 172 इन्फन्ट्री मद्रास मुख्य न्यायालय मधून प्रशिक्षण पूर्ण केले. आता ते लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहेत.
मर्चंट नेव्हीतील आपल्या जबाबदारीसोबतच सैन्यदलातही ते महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. अशा प्रकारे कॅप्टन सचिन चव्हाण दोन गणवेशांमध्ये आपली जबाबदारी निभावत आहेत. आपल्या या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत सचिन चव्हाण आपल्या आईचे आभार मानतात. त्यांचे आजोबा मराठा लाइट इन्फट्रीमध्ये होते. त्यांच्या आईच्या प्रेरणेमुळेच ते इथपर्यंत पोहोचू शकले. याबरोबरच ते कर्नल के. एस. जग्गी यांच्या रिटायर्ड यांच्या पुढाकाराने सुरू केलेली संस्था शहीद भगत सिंग इनिशिएटिव्ह या संस्थेत ते कार्यरत आहेत. त्यांना जहाज अल्पकृती, शंख, शिंपले जमा, विविध देशांचे नाणे व अद्वितीय वस्तूंचे संग्रहण करणे, रक्तदान करणे याची आवड असून हिंदुस्थानी सैन्यात इच्छुक असणाऱयांसही मार्गदर्शन करत असतात.































































