
>>माधव डोळे
सर्जनशीलता आणि कल्पकता हे दोन्ही गुण भाऊंमध्ये असल्याने त्यांची शिल्पकला खऱ्या अर्थाने फुलली आणि त्यातूनच साकारले अनेक पुतळे आणि शिल्पे. आदीदैविक, आदीभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांचा त्रिवेणी संगम भाऊंनी साकारलेल्या गांधींच्या पुतळ्यामध्ये दिसून येतो. शिल्पकला हाच भाऊंचा श्वास आहे, तोच त्यांचा आवाज आहे. म्हणून भाऊ शिल्पकलेचे साधकच ठरतात.
कल्याणचा साठेवाडा म्हणजे चित्रकला, संगीत, शिल्पकला, वक्तृत्व, साहित्य याचा अनोखा संगम. अजूनही हा वाडा आपलं ऐतिहासिक वैभव टिकवून आहे. याच वाड्यात सध्या भाऊंचं वास्तव्य आहे. भाऊ म्हणजे सदाशिव दत्तात्रय साठे. आयुष्यभर शिल्पकलेचा ध्यास घेणारे आणि आपल्याकडील शिल्पकारांच्या परंपरेतील एक आघाडीचे नाव. सध्या वयाची नव्वदी ओलांडली असली तरी शिल्पांबाबतचे चिंतन आणि मनन सतत सुरू असते. शिल्प म्हणजे एखाद्या धातूने बनवलेला किंवा दगडात कोरलेला मानवी आकार नसून त्या शिल्पाच्या अंतरंगात शिरून भौतिकतेकडून आदीभौतिकतेकडे करायचा एक प्रवास असतो. भाऊंनी हा प्रवास लहानपणापासूनच सुरू केला. त्यांचे काका हरी रामचंद्र साठे हे मूर्तिकार होते. याच वाडय़ात त्यांचा कारखानादेखील होता. भाऊंच्या मूर्तीकामाचा श्रीगणेशा या वाड्यातून झाला.
1944 साली भाऊंनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टला मॉडेलिंगच्या शिल्प विभागात प्रवेश घेतला आणि खऱया अर्थाने शिल्पकलेचं ऍकॅडमिक शिक्षण सुरू झालं, पण साचेबद्ध शिक्षणात त्यांचं मन रमत नव्हतं. अभ्यासातील त्यांची प्रगती बघून जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे त्यावेळचे डायरेक्टर जिराल यांनी भाऊंची खास मुलाखत घेऊन थेट दुसऱया वर्षात बसण्याची परवानगी दिली. पाच वर्षांचा कोर्स त्यांनी चार वर्षांतच पूर्ण केला. शिल्पकलेतील त्यांची आकलन क्षमता, झोकून देऊन काम करण्याची तयारी तसेच मानवी मूल्यांचा अभ्यास बघून भाऊंना फेलोशिपदेखील मिळाली. सर्जनशीलता आणि कल्पकता हे दोन्ही गुण भाऊंमध्ये असल्याने त्यांची शिल्पकला खऱया अर्थाने फुलली आणि त्यातूनच साकारले अनेक पुतळे आणि शिल्पे. भाऊंनी तयार केलेली शिल्पे, पुतळे पाहताना जणू ती आपल्याशी संवाद साधतात असे वाटते.
गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा फुटी जो पुतळा आपल्याला दिसतो तो भाऊ साठे यांनीच साकारला आहे. दिल्लीतील महात्मा गांधींचा पहिला पुतळा बनविण्याचा मान हादेखील त्यांचाच. इंडिया गेटजवळ हा नऊ फुटी पुतळा असून 1954 साली त्याचे अनावरण झाले. या पुतळ्याच्या उद्घाटनाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतः उपस्थित होते. या पुतळ्याच्या ब्रान्झचे ओतकाम विलेपार्लेतील शिल्पकार म्हात्रे यांच्या फाऊंड्रीत करण्यात आले. राजधानीतील महात्मा गांधींच्या पुतळ्यामुळे भाऊ साठे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. खरे म्हणजे भाऊ हे स्वतः प्रखर संघवादी, पण तरीही गांधीजींवर त्यांची अपार श्रद्धा आणि प्रेम आहे. भाऊंनी गांधीजींच्या अनेक भावमुद्रा तसेच मार्चिंग प्रकारातही पुतळे साकारले. एखादे शिल्प किंवा पुतळा तयार करणे म्हणजे निर्मितीचा लागलेला अनोखा सूर असतो. या सुरात एकरूप होण्याचे भाग्य भाऊंना लाभले.
आदीदैविक, आदीभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांचा उल्लेख समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये केला आहे. भाऊंनी साकारलेल्या गांधींच्या पुतळ्यामध्ये त्याचा त्रिवेणी संगम दिसून येतो. त्यांनी साकारलेले गांधींचे पुतळे केवळ दिल्लीच्या इंडिया गेटवरच‘ नसून सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, बँकॉक, जपान या देशांतही पाहायला मिळतात. गांधी हा त्यांच्या चिंतनशीलतेचा एक भाग असला तरी भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माऊंट बॅटन, स्वातंत्र्यवीर सावरकर, चिंतामणराव देशमुख, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, उद्योगपती रामनाथ गोयंका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पंडित दीनदयाळ उपाध्याय, झाशीची राणी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, विक्रम साराभाई अशा अनेक महापुरुषांचे पुतळे साकारले.
हे पुतळे म्हणजे एका आत्ममग्न, ऋषीतुल्य आणि कलासक्त शिल्पकाराचे जणू जिवंत चरित्रच म्हणावे लागेल. त्यांनी साकारलेल्या विविध शिल्पांच्या कथा ‘आकार’ या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. वयपरत्वे सध्या भाऊंनी शिल्प साकारण्याचे बंद केले असले तरी त्यांच्या मनात सतत विचार सुरू असतो तो शिल्पकलेचाच. भाऊंची पत्नी नेत्रा यादेखील प्रसिद्ध चित्रकार. त्यांनी साकारलेली अनेक चित्रे उपलब्ध आहेत. चित्रकला आणि शिल्पकला याचा अनोखा संगम साठेवाडय़ात झाल्यामुळे हा वाडा जणू इतिहासाचे शिल्प बनले आहे. शिल्पे साकारताना आलेले अनुभव, थोरामोठय़ा व्यक्तींबरोबर जुळलेले ऋणानुबंध, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक घडामोडींवर आधारित आपले आत्मचरित्र भाऊंनी नुकतेच लिहिले आहे. ते प्रकाशित होईल तेव्हा कलेचा मोठा कॅनव्हॉस रसिकांसमोर खुला होईल. त्यांनी ठेवलेला शिल्पांचा व पुतळ्यांचा अनमोल खजिना हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मूल्यवान आहे. शिल्पकला हाच भाऊंचा श्वास आहे, तोच त्यांचा आवाज आहे. म्हणून भाऊ शिल्पकलेचे साधकच ठरतात.
summary- article on sadashiv sathe by madhav dole




























































