आभाळमाया – सुपर ‘शनी!’

>> वैश्विक

सध्या आकाशदर्शनासाठी मोसम चांगला आहे. अमावस्येच्या आधीचे आणि नंतरचे चार दिवस जमेस धरून किमान नऊ दिवसांची रात्र निरभ्र असल्यास विश्वरूप दाखवत असते. 3 डिसेंबरलाही आम्ही तसाच अनुभव घेतला. शनी-गुरू-मंगळासारखे ग्रह तर फारच छान दिसतायत. छोटीशी चंद्रकोर असेल तर (अमावस्येनंतर अष्टमीपर्यंत) चंद्र प्रकाशाचा फार अडथळा येत नाही. उलट चंद्राच्या उजळलेल्या आणि अंधाऱ्या भागाच्या सीमेवरची चांद्रविवरं दुर्बिणीतून स्पष्ट दिसतात. अवकाश न्याहाळण्याची आणि विश्व जाणून घेण्याची ओढ तरुण वर्गाला तरी असायला हवी. त्याचा मुख्य फायदा म्हणजे विराट विश्वातलं आपलं सूक्ष्म किंवा नगण्य अस्तित्व आणि तरीही विश्व जाणण्याची आपल्या मेंदूची क्षमता या दोन्हींचा वैज्ञानिक ‘साक्षात्कार’ झाल्याने मनाला उदात्तता प्राप्त होते. त्याचबरोबर ‘स्पेस सायन्स’ची वेगाने होत असलेली प्रगती विज्ञानाचाच नव्हे तर इतर अभ्यासकांनाही आर्थिकदृष्टय़ा प्रगतीपथावर नेणारी आहे. समजा उद्या चंद्रावर वसाहत शक्य झाली तर शेतीपासून ते कलाक्षेत्रापर्यंत सर्व गोष्टींची गरज चांद्रवासीयांना भासणार. सध्या तरी हे स्वप्नरंजन वाटलं तरी 1969 मध्ये माणूस थेट चंद्रावर जाईल हे तरी कोणी स्वप्नात पाहिलं होतं का? वैज्ञानिक ‘चमत्कार’ ते हेच. ते पूर्ण अभ्यासांती घडवता येतात. छा… छू करून नव्हे.

…तर सुंदर कडी (रिंग) असलेला शनी हा गॅस-जायंट म्हणजे वायुरूप ग्रह आपल्या ग्रहसंकुलामधला दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह. पहिला अर्थातच गुरू. शनीच्या कडय़ांचा विस्तार, हा कडय़ांमधली ‘कॅसिनी गॅप’ वगैरेवर आता खूप संशोधन झालंय आणि ‘कॅसिनी’ यान तर त्यामधून पसार होऊन थेट शनीमध्ये विलीन झालंय. असाच एक प्रचंड ‘शनी’ पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून ठळकपणे दिसणाऱ्या नरतुरंग म्हणजेच सेन्टॉरस या तारकासमूहात सापडला आहे. तशी त्याच्या अस्तित्वाची चर्चा 2012 पासूनच होतेय, पण आता त्याबाबत काही सुस्पष्ट गोष्टी समजत आहेत. त्याला शनी म्हणायचं, कारण मुळात त्या ग्रहमालेतल्या ग्रहांना नावंच नाहीत. कारण तिथे मानवासारखा विचार करू शकणारा प्राणीच नाही. सूक्ष्मजीव आहेत की नाहीत ते ठाऊक नाही, परंतु त्याचा अतिप्रचंड म्हणजे गुरूच्या 200 पट आणि ‘आपल्या’ सुमारे शनीच्या 300 पट असलेला आकार तसंच त्याच्या सुमारे तीस कडय़ांचा विस्तार याचा अभ्यास आता वेग घेत असून आपल्या आकाशगंगेतल्या एखाद्या तारकासमूहात आपल्या सूर्यासारखे किंवा वेगळे तारे आणि त्यांच्या भोवती फिरणारे ग्रह (असले तर) याचा जोरदार अभ्यास सुरू आहे. या ‘एक्झो प्लॅनेट्स’ किंवा परताऱ्याभोवतीच्या ग्रहांचा मागोवा घेण्याच्या ध्यासातूनच हा ‘सुपर सॅटर्न’ नरतुरंग तारकासमूहातील एका ताऱ्याभोवती फिरत असल्याचं लक्षात आलंय.

त्याची माहिती घेण्यापूर्वी थोडं ‘नरतुरग’ या तारकासूमहाविषयी जाणून घेऊ या. ‘नर’ म्हणजे माणूस आणि ‘तुरग’ म्हणजे घोडा. अशा एका अश्वमुखी मानवी आकृतीची कल्पना करून या तारकासूमहाला नाव देण्यात आलंय. ग्रीक भाषेत अशा प्राण्याला सेन्टॉर म्हणतात. (दुसरा सेन्टॉर धनु राशीत दिसतो.) यावरून त्याचं नाव खरं तर ‘नरतुरग’ असं हवं.
आपण महाराष्ट्रातून आकाशदर्शन करतो तेव्हा 18 ते 21 उत्तर अक्षांशामधून कुठून तरी आकाश पाहत असतो. त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातले काही तारकासमूह हेसुद्धा स्पष्ट दिसतात. त्यातही ‘नरतुरग’ हा एक विशाल तारकासमूह आहे. (त्याने आपल्या दृष्टीने) दक्षिण आकाशातील 1060 चौरस अंश इतका भाग व्यापलेला असून तो नवव्या क्रमांकाचा तारकासमूह मानला जातो.

याच तारकासमूहात आपल्या सूर्याला सर्वात जवळचा असलेला ‘मित्र’ किंवा अल्फा सेन्टॉरी हा तारा केवळ 4.3 प्रकाश वर्षे अंतरावर आहे. सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने 9460 गुणिले 4 अब्ज वर्षे प्रवास केला की, आलाच आपला ‘मित्र’ तारा! यातला विस्मय जाऊ द्या, पण हा तारा हे तीन ताऱ्यांचं परस्परांभोवती फिरणारं ‘त्रिकूट’ आहे. म्हणून त्याला ‘त्रैती’ असं म्हटलं जातं. आता याच तारकासमूहात पृथ्वीपासून सुमारे 438 प्रकाशवर्षे अंतरावर हा ‘सुपर सॅटर्न’ एका ताऱ्याभोवती फिरताना शोधला तो अमेरिकेतील राचेस्टर विद्यापीठाचे एरिक मॅमॅजेक आणि नेदरलॅण्डच्या लेडन वेधशाळेतील त्यांचे सहकारी मॅथ्यू केनवर्दी यांनी. अशा काही विशाल ‘शनी’ नरतुरग ऊर्फ सेन्टॉरस तारकासमूहात असल्याचा शोध त्यांना त्याचं निरीक्षण करताना लागला. या महाग्रहाने त्याच्या जनक ताऱ्याला अनेक आठवडे ‘ग्रहण’ लावलं होतं, पण त्याच्या कडय़ांमधील जागेमधून झिरपणारा प्रकाश दिसत होता. त्या वेळी हा त्या ग्रहाभोवती फिरणारा ‘ब्राऊन ड्वार्फ’ किंवा ‘तपकिरी खुजा’ ग्रह आहे असं वाटलं, परंतु तो ग्रहच आहे. कारण त्याच्या गाभ्यात हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होण्याइतकं त्याचं वस्तुमान नाही, परंतु त्याचा आकार गुरू-शनी यांच्या 200 पट आहे. त्याची कडी 12 कोटी किलोमीटर म्हणजे जवळपास सूर्य-पृथ्वी अंतराइतकी पसरलेली आहे. त्याच्या महाकाय अस्तित्वाने त्याच्या ताऱ्याचा 95 टक्के प्रकाश अडवला गेला असून या सुपर शनीची कडी कालांतराने कमी होत जातील, असं म्हटलं जातं. त्यातच शेकडो ‘चंद्रां’चाही समावेश आहे.

गुरू ग्रहाच्या 10 ते 40 पट वस्तुमानाचा हा सुपर शनी आपल्या शनीच्या जागी आणला, तर रोज रात्री पौणिमेच्या चंद्रापेक्षा लख्ख प्रकाश पडेल. त्यामुळे पृथ्वीवरून करता येणारं आकाशदर्शन शक्य होणार नाही आणि इथल्या सूक्ष्म जीवसृष्टीवर, वनस्पतींवरही विपरित परिणाम होईल. तेव्हा तो सेन्टॉरसमध्ये आहे तिथेच बरा!

[email protected]