
>>वैश्विक<<
आकाशातील ग्रहांची माहिती देताना ती रंजक करण्याच्या दृष्टीने ग्रहमालेतील काही गमतीजमती सांगाव्या लागतात. युरेनस या शनीपलीकडच्या ग्रहाचं वर्णन करताना ‘युरेनस सूर्याभोवती फिरताना गडगडत’ जातो असं म्हटलं जातं. ‘गडगडत’ म्हणण्याचं कारण असं की, या 84 वर्षांत सूर्यपरिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा अक्ष सुमारे 97 अंशांनी कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला असल्याचं आपणाला ठाऊक आहेच. शुक्र ग्रहाचा अक्ष तर 178 अंशांनी कलल्याने त्यावर सूर्याचा पश्चिमोदय होतो. युरेनसचा अक्ष त्याच्या विषुववृत्ताला समांतर असल्याने त्याची सूर्यप्रदक्षिणा गडगडत होते!
आधुनिक खगोलशास्त्र्ााने ज्या अवकाशस्थ वस्तूंना ‘ग्रह’ म्हणून मान्यता दिलेली आहे, त्यातून आता ‘प्लुटो’ वजा झाला आहे. नेपच्यूनपर्यंतचे आठ पूर्ण ग्रह आणि नवा प्लुटो आता खुजा ग्रह झाला आहे. सतराव्या शतकात दुर्बिणीने अवकाशाचा वेध घ्यायला सुरुवात होईपर्यंत शनीपर्यंतचे सहाच ग्रह ज्ञात होते. अठराव्या शतकात जन्माने जर्मन असलेल्या एका संगीतकाराने इंग्लंडमध्ये येऊन एक क्रांतिकारी खगोलीय शोध लावला. त्याचं नाव विल्यम हर्षेल. 1757 मध्ये इंग्लंडला आलेल्या हर्षेलने 13 मार्च 1781 रोजी स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून एक दूरस्थ धूसर ‘ठिपका’ शोधला. आधी त्याला वाटलं की, तो एखादा धूमकेतू असावा, परंतु सातत्याने निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आलं की, शनीपलीकडच्या वर्तुळाकार कक्षेतून फिरणारा हा ‘ठिपका’ ग्रह असावा. कारण धूमकेतूंची कक्षा बरीच लंबवर्तुळाकार असते. शिवाय तो सूर्याच्या जवळ येतानाही दिसत नव्हता.
यावरून हर्षेलने काढलेला निष्कर्ष सर्वमान्य झाला. त्याच्या नावे युरेनस नावाच्या ग्रहाच्या संशोधनाची नोंद झाली. पृथ्वी सूर्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, तर युरेनस 300 कोटी किलोमीटर अंतरावरून सूर्याभोवती फिरतो. हर्षेलने या ‘नव्या’ ग्रहाचं नाव तिसऱ्या जॉर्ज राजाच्या नावावरून ‘जॉर्जियन स्टार’ असं ठेवलं होतं. मात्र नंतर ग्रीक कथेतील स्वर्गीय कल्पनेवरून त्याला ‘युरेनस’ संबोधलं जाऊ लागलं. हर्षेलला युरेनसचा शोधक म्हटलं गेलं तरी 1690 पासूनच्या किमान 20 तारका-नकाशात त्याची नोंद धूसर तारा अशी होती. हर्षेलने मात्र हा तारा नसून ग्रह असल्याचं पहिल्यांदा सांगितलं हे महत्त्वाचं.
युरेनस स्वतःभोवती साडेसतरा तासांत फिरतो. त्याचा व्यास पृथ्वीच्या चारपट आहे. युरेनसवरून अवकाशात रॉकेट उडवायचं तर त्या उड्डाणाचा वेग सेकंदाला 21 किलोमीटर असावा लागेल. असा हा युरेनस ग्रह आता चर्चेत येण्याचं कारण काय, तर त्याचं ‘गडगडत’ जाणं. म्हणजे 97 अंशात कललेल्या अक्षात स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरणं.
नुकत्याच झालेल्या संशोधनातून युरेनसच्या अक्षाचं हे ‘असं कसं’ झालं ते स्पष्ट होत आहे. शास्त्र्ाज्ञांच्या मते युरेनसवर आपल्या पृथ्वीच्या दुप्पट आकाराच्या एका महापाषाणाने धडक दिली असावी. हा महापाषाण (अशनी) युरेनसवर आदळला, फुटला आणि त्यामध्येच विलीन झाला. या धडकेमुळे युरेनसची कक्षा 90 अंशांवर गेली. युरेनसला पाच मोठे नैसर्गिक उपग्रहसुद्धा आहेत.
व्हॉएजर-2 या यानाने 1986 मध्ये युरेनसची छायाचित्रं घेतली. त्यावरील वातावरणाची साद्यंत माहिती मिळवली. गुरू आणि शनीप्रमाणेच युरेनसवरही 82 टक्के हायड्रोजन आणि 15 टक्के हिलीयन वायू आहेत.) युरेनसला शनीप्रमाणे विरळ कडी असून त्याच्या पाच चंद्रांपैकी अम्ब्रिएल खूप ‘डार्क’ आहे. असं असलं तरी त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश (अल्बिडो) आपल्या चंद्रप्रकाशापेक्षा तीक्र असतो. त्याच्या 470 किलोमीटर व्यासाच्या मिरॅन्डा या उपग्रहावर प्रचंड उल्कापात झाल्याचं जाणवतं.
आपल्या ग्रहमालेतील अशा दूरस्थ ग्रहांची रचना अजूनही आपल्याला पूर्णपणे समजलेली नाही. त्याविषयी संशोधन सुरूच आहे. गेल्या चारशे वर्षांत या ग्रहांचे शोध आणि त्यांचं महत्त्व स्पष्ट होत आहे, त्याचबरोबर त्यांच्याविषयीची ‘कोडी’ उलगडणारी माहितीसुद्धा मिळत आहे. युरेनसच्या ‘गडगडत’ जाणाऱ्या प्रवासाचं कोडं उलगडत असतानाच शनी ग्रहाच्या दुर्बिणीतून अत्यंत सुंदर दिसणाऱ्या ‘कडय़ां’विषयी एक धक्कादायक ‘ब्रेकिंग’ बातमी येतेय ती म्हणजे शनीची ही अद्वितीय कडी अपेक्षेपेक्षा लवकरच अदृश्य होतील की काय? असं घडायला लाखो वर्षे लागतील खरी, पण ही कडी कशी निर्माण झाली आणि का नष्ट होतील किंवा नष्ट होतील का? याविषयी पुढच्या लेखात माहिती घेऊ.

























































